मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या सामान्य माणसाने उभ्या केलेल्या संघर्षाचं माध्यमांवरून होणारं चित्रण आणि प्रत्यक्ष या लढ्यामागचा उद्देश यांत खूप अंतर आहे. आरक्षणाची गरज दिसणं, व्याख्या समजणं आणि त्याचबरोबर गेल्या शंभर वर्षांत वेगवेगळ्या नेतृत्वाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा कसा उभा राहिला हे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आम्ही चित्रपटाची तयारी केली, असे सांगणाऱ्या दिग्दर्शक योगेश भोसले यांचा ‘आम्ही जरांगे झ्र गरजवंत मराठ्यांचा लढा’ हा चित्रपट सध्या सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. एकाच विषयावरील दोन चित्रपटांचे प्रदर्शन एकत्र नको म्हणून पुढे गेलेले प्रदर्शन आणि त्यानंतर सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी करावी लागलेली प्रतीक्षा हे सगळे अडथळे ओलांडून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते डॉ. दत्ता मोरे, दिग्दर्शक योगेश भोसले आणि अभिनेता मकरंद देशपांडे, अजय पूरकर यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळ्या गप्पा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून जरांगे पाटील यांच्या भूमिकेतील अभिनेते मकरंद देशपांडे यांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या भूमिकेसाठी मकरंद देशपांडे यांची निवड करण्याचा विचार कसा सुचला? याबद्दल बोलताना भावनाट्य सहजअभिनयातून रंगवण्याची ताकद त्यांच्याकडे असल्याने पहिल्यापासून त्यांचंच नाव डोळ्यासमोर होते, असं योगेश भोसले यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला लढा, त्यांचा संघर्ष मांडताना त्या लढ्यामागची गरज, जनमानसाच्या भावना या विचारावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं होतं. त्यामुळे हा भावनालेख अभिनयातून मांडू शकेल अशा ताकदीचा कलाकार असणं गरजेचं होतं. मी स्वत: मकरंद देशपांडे यांचे चित्रपट पाहिलेले आहेत, त्यांचे डोळे बोलके आहेत, नजरेतून ते बोलतात. त्यामुळे या चित्रपटात मनोज जरांगेंच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी दोन-तीन कलाकारांची नावं समोर ठेवली होती, मात्र ही भूमिका मकरंद देशपांडेच करू शकतील या विचारावर मी ठाम होतो. त्यानुसार त्यांनाच या भूमिकेसाठी आम्ही विचारणा केली, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा >>>गुडन्यूज दिल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध फॅशन डिझायनरने पहिल्यांदाच शेअर केले बेबी बंपचे फोटो; म्हणाली, “अजूनही थोडं…”

शब्द पाळण्यासाठी मृत्यूलाही निडरपणे सामोरे जाणारे अण्णासाहेब…

आत्तापर्यंत विविध ऐतिहासिक चरित्रनायकांच्या भूमिकांमधून प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या अभिनेता अजय पूरकर यांनी या चित्रपटात मराठा आरक्षणाचे प्रणेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका केली आहे. ‘माझ्याकडे जेव्हा ही भूमिका आली तेव्हा मला वैयक्तिक त्यांच्याविषयी काहीच माहिती नव्हती, पण मी त्यांचं जे व्यक्तिमत्त्व होतं त्याच्या प्रेमात पडलो. दिलेल्या शब्दासाठी स्वत:चा जीवही क्षुल्लक मानणारा हा माणूस आहे, त्यांची हीच गोष्ट मला भारी वाटली आणि आपोआप त्यांची व्यक्तिरेखा मला सापडली’, असं अजय पूरकर यांनी सांगितलं. ही भूमिका करत असतानाचा अनुभव अविस्मरणीय असेल असं सांगताना त्यामागचं कारणही त्यांनी उलगडलं, ‘अण्णासाहेब पूर्वी माथाडी कामगार होते, माथाडी कामगारांची व्यथा, त्यांची परिस्थिती त्यांना समजत गेली तसं त्यांनी कामगारांना संघटित करायला सुरुवात केली. मग पुढे ते आमदार झाले आणि त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा कशा पद्धतीने सुरू केला हा सगळा प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला आहे. आम्ही पुणे मार्केटयार्डात प्रत्यक्ष माथाडी कामगारांबरोबर चित्रीकरण केलं आहे. त्या कामगारांची आकडी लावून पोती उचलायची एक पद्धत असते, ती पद्धत आत्मसात करत प्रत्यक्ष ५० किलो कांद्यांचं पोतं मी उचललं, कारण तेव्हाच त्याचा भार आपसूक तुमच्या देहबोलीतून लक्षात येतो. अशा सहज पद्धतीने भूमिका करण्यावर माझा भर असतो, कुठलीही भूमिका उसनं अवसान आणून जिवंत करता येत नाही, असं मला वाटतं. तर अशा वास्तव पद्धतीने चित्रीकरण करताना मला अण्णासाहेब पाटील सहज गवसत गेले’, असं अजय पूरकर म्हणाले.

राजकीय अनास्था, स्वार्थामुळे या लढ्याला वेगळा रंग दिला गेला आहे. आरक्षणाचा लढा हा सामाजिक आहे, त्याला ज्वलंत स्वरूप विविध राजकीय पक्षांच्या उदासीनतेमुळे मिळालं आहे, असं निर्माते डॉ. दत्ता मोरे यांनी स्पष्ट केलं.

‘१९०२ साली छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात त्या त्या समाजाला योग्य तो न्याय मिळावा म्हणून ९० टक्के आरक्षण दिलं होतं. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आरक्षणाची संकल्पना मांडून दीनदुबळ्यांना आरक्षण मिळवून दिलं. दुर्दैवाने मराठ्यांमध्ये कुणबी आणि मराठा एकच जात असून त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार आहे. पण तरीही कुणबींना ओबीसीमध्ये आरक्षण मिळालं तर मराठा समाज अजूनही खुल्या प्रवर्गात गणला जातो. हा लढा तेव्हापासून सुरू आहे, पण राजकीय पक्षांनी सातत्याने याबद्दल अनास्था दाखवली. आरक्षणाचे प्रणेते अण्णासाहेब पाटील हे काँग्रेसचे आमदार होते आणि तरीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली. त्यांनी सुरू केलेल्या जनचळवळीला आंदोलनाचं स्वरूप मनोज जरांगे यांच्या लढ्यामुळे मिळालं आहे. आजही हा समाज आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासच आहे, मात्र या सामाजिक लढ्याला मिळालेला राजकीय रंग हा विविध पक्षांनी त्यांच्या स्वार्थासाठी दिलेला आहे’, अशी खंतही मोरे यांनी व्यक्त केली.

डॅडी जरांगे होताहेत...

चटकन ओळखूही येऊ नये इतक्या बेमालूमपणे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखं दिसणं, तसाच वावर ही किमया कशी साधली? याबद्दल अभिनेता मकरंद देशपांडे यांनी सविस्तर माहिती दिली. ‘गेले दहा-बारा महिने सातत्याने आपण मनोज जरांगे यांना दूरचित्रवाहिनीवर पाहतो आहोत, ऐकतो आहोत, त्यामुळे त्यांच्याविषयी सगळं माहिती झालं आहे. मीच ही भूमिका करावी, हे ठामपणे योगेशने सांगितल्यानंतर मी त्याच्याकडे दोन महिने मागितले. या दोन महिन्यांत न कंटाळता, सातत्याने योगेश फोनवर चित्रपटाविषयी बोलत राहिला. मीसुद्धा जाणीवपूर्वक जरांगेंची भाषणं ऐकायला सुरुवात केली. दुसरीकडे वेगवेगळे विग घालून मी त्यांच्यासारखा दिसू शकतो का? हे पडताळण्याचे माझे प्रयत्न मी सुरू केले. त्याने तारखा निश्चित केल्या आणि माझ्याकडे आत्ताच्या लुकचं छायाचित्र मागितलं. मी त्याला म्हणालो, सगळं देतो तुला… मी तिथेच येतो आहे. परभणीत चित्रीकरणस्थळी जात असताना एका स्थानिक केशकर्तनालयात मी थांबलो. माझ्या रंगभूषाकाराला बॅगेतून आणलेला विग लावायला सांगितला. तोवर तिथे माणसं जमायला लागली होती. ती मला ‘डॅडी’ म्हणून ओळखत होती. आणि मी काय करतो आहे हे त्यांच्या लक्षात येईना… हळूहळू डॅडी आता जरांगे होताहेेत… अशी वार्ता या लोकांकडून थेट निर्मात्यांपर्यंत पोहोचली. तोवर जरांगेंच्या छोट्या छोट्या लकबी, माईक पकडण्याची त्यांची विशिष्ट शैली, बोलताना चटकन केसात हात फिरवायची त्यांची सवय हे आपसूक माझ्याकडून होत गेलं’, अशा शब्दांत त्यांनी हा परकाया प्रवेशाचा अनुभव सांगितला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The team of the film amhi jarange garajvant marathyacha ladha at the office of loksatta amy
Show comments