मुष्टियुद्ध जागतिक स्पर्धेतील अव्वल दर्जाची एकमेव भारतीय महिला खेळाडू मेरी कोम यांच्या आजवरच्या कारकीर्दीवरील ‘मेरी कोम’ हा चित्रपट म्हणजे एका जिद्दी खेळाडूची संघर्षमय, रोमहर्षक कहाणी तर आहेच, पण त्याचबरोबर मुष्टियुद्धासारख्या अनेक खेळांबाबतची देशातील क्रीडा महासंघांच्या प्रशासकीय व्यवस्थेला एक जबरदस्त ठोसा देखील लगावला आहे.
मेरी कोम यांचे मुष्टियुद्ध खेळावरील प्रेम, देशप्रेम, प्रापंचिक जबाबदाऱ्यांतून खेळासाठी घेतलेली मेहनत, ईशान्य भारतातील खेळाडूंना मिळणारी सापत्न वागणूक, तेथील सामाजिक परिस्थिती यावरही दिग्दर्शकाने मार्मिक भाष्य करण्याचा यशस्वी प्रयत्न या चित्रपटातून दिग्दर्शकाने केला आहे. मेरी कोम यांची महानता, त्यांची जिगरबाज वृत्ती चित्रपटांतून दाखवून प्रेक्षकांना त्यांची महत्ता सांगण्याचा उत्तम प्रयत्न या चित्रपटाने केला आहे. प्रियांका चोप्राने मेरी कोम ही प्रमुख व्यक्तिरेखा ताकदीने साकारली आहे.   
मेरी कोम यांना लहानपणी सापडलेल्या मुष्टीयुद्धाच्या एका ग्लोव्हज्मुळे निर्माण झालेली मुष्टीयुद्धाची आवड, वडीलांचा तीव्र विरोध, तरीदेखील एक क्रीडा प्रकार म्हणून योग्य ते प्रशिक्षण घेऊन जगज्जते होणे, त्यासाठी अखंड मेहनत घेणं आणि मांगते चूंगनेईजांग मेरी कोम ते  मेरी कोम होण्याचा तिचा प्रवास योग्य प्रकारे रेखाटला आहेच, पण त्यापेक्षाही विवाहानंतर त्यांच्या कारकिर्दीला मिळालेली कलाटणी आणि जिद्द खूप काही सांगणारी आहे. मेरी कोम यांचे पती ओन्लेर कोम यांचा पाठिंबा, मातृत्वानंतर पुन्हा एकदा मुष्टियुद्ध स्पर्धेत सहभागी होऊन विजयी ठरण्यापर्यंत प्रत्येक क्षणी ओन्लेर कोम यांनी दिलेला सक्रिय सहभाग, दोन्ही मुलांना सांभाळण्याची पेललेली जबाबदारी आणि अर्थातच त्या सर्वाला जिद्दीने प्रचंड मेहनत घेऊन मेरी कोमने दिलेला यथोचित न्याय आधिक प्रभावीपणे जाणवतो. किंबहुना खेळाडूच्या अंगी असणारी विजीगुषी वृत्ती त्यातून अधोरेखित झाली आहे. प्रशिक्षक एम. नरजित सिंग आणि पती ओन्लेर कोम या दोघांच्या पाठिंब्यामुळे खेळातील तिचे स्थान परत मिळवणे हे खेळाप्रती असणारे तिचे ‘पॅशन’ दाखवते.
दर्शन कुमार या अभिनेत्याने ओन्लेर कोम ही व्यक्तिरेखा अतिशय उत्कृष्ट साकारली आहे. प्रियांका चोप्राने मुष्टियुद्ध खेळाडू साकारण्यासाठी केलेली मेहनत, सराव चित्रपट पाहताना निश्चितपणे जाणवत असला तरी विशेषत: मध्यांतरापर्यंत ती मेरी कोम न वाटता प्रियांका चोप्राच अधिक वाटते हेही नमूद केले पाहिजे. मातृत्वानंतर पुन्हा एकदा मुष्टियुद्ध खेळण्यास सज्ज झाल्यावर प्रशिक्षक नरजिंत सिंग यांनी दिलेले खडतर प्रशिक्षण पाहताना प्रियांका चोप्राचे अभिनेत्री म्हणून असलेले सामथ्र्य जाणवते. एका गाण्याच्या पाश्र्वभूमीवर खडतर सराव करतानाचे प्रसंग पडद्यावर दिसतात. त्याचे उत्तम चित्रण छायालेखकाने केले असून केवळ  पाच मिनिटांच्या कालावधीत पुन्हा एकदा मुष्टियुद्ध खेळात आणि स्पर्धेसाठी सज्ज होण्याची तयारी दिग्दर्शकाने अचूक पद्धतीने दाखवली आहे.
चित्रपटातील काही प्रसंगातून मुष्यियुद्ध महासंघाच्या पदाधिकारीपदावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून खेळाडूंना मिळणारी वागणूक, त्यातले राजकारण, सत्ताकारण, पैसे कमाविण्याची वृत्ती आणि त्यांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा सगळ्या नकारात्मक बाजू दाखवून दिग्दर्शकाने एक या प्रवृत्तीला एक जबरदस्त ठोसा लगावला आहे. अतिलोकप्रिय खेळांच्या व्यतिरिक्त अन्य खेळांच्या बाबत असलेली भारतीयांची उदासीनता आणि त्यामुळेच गुणवत्ता असूनही अनेक चांगले खेळाडू अप्रकाशित राहतात तसेच जगज्जेते ठरू शकत नाहीत यामागची कारणे दिग्दर्शकाने थोडक्यात पण प्रभावीपणे मांडली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे काही चित्रपट अशा इतर खेळांवर बेतले होते. ‘भाग मिल्खा भाग’ या यशस्वी चरित्रपटानंतर असे विषय हातळले जाणे स्वाभाविक आहे आणि त्याची तुलना याच्याशी होऊ शकते. मात्र चरित्रपट आणि यशोगाथा या दोन्ही वेगळ्या अंगानेच येणार हे लक्षात घ्यावे लागेल.
प्रियांका चोप्राबरोबरच मुष्टियुद्ध प्रशिक्षकाच्या भूमिकेतील सुनील थापा आणि मेरी कोम यांचे पती ओन्लेर कोम यांच्या भूमिकेतील दर्शन कुमार यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. दर्शन कुमारने आपल्या अभिनयाची चुणूक त्याच्या वाटेला आलेल्या प्रत्येक प्रसंगातून प्रकर्षांने दाखवून दिली आहे.
मेरी कोम
निर्माते – वायकॉम१८ मोशन पिक्चर्स, संजय लीला भन्साळी
दिग्दर्शक – ओमंग कुमार
कथा-पटकथा – सायविन क्वाड्रास
संवाद – करणसिंग राठोड, रामेंद्र वशिष्ठ
छायालेखक – केईको नाकाहारा
संगीत – शशी-शिवम्म
कलावंत – प्रियांका चोप्रा, सुनील थापा, दर्शन कुमार, मीनाक्षी कालित्ता, झेचारी कॉफिन, बंदारी राघवेंद्र, शिशिर शर्मा व अन्य.