२०१६ हे वर्ष बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी जितक्या आनंदाचे होते तितकेच काही थक्क करणाऱ्या घटनाही बी टाऊनमध्ये घडल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या वर्षी अनेक कलाकार जोडप्यांनी विवाहबद्ध होत त्यांच्या जीवनातील नव्या प्रवासाला सुरुवात केली, तर काहीजणांनी नात्यातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अशाच जोडप्यांपैकी एक म्हणजे अरबाज खान आणि मलायका अरोरा. बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा खान यांनी जेव्हा वेगळे राहणे सुरु केले, तेव्हाच त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांना उधाण आले होते. त्यानंतर मलायका अरोरा आणि अरबाज खानच्या घटस्फोटाची चर्चा रंगली. अखेर तब्बल १८ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या पुढील सुनावणीसाठी मलायका आणि अरबाज यांनी न्यायालयात हजेरी लावली तेव्हा मलायकाने घटस्फोटातील पोटगीच्या रकमेसाठी जवळपास १० ते १५ कोटी रुपयांची मागणी केल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. मात्र, काहीच सत्य नसल्याचा खुलासा बॉलीवूड लाइफ या संकेतस्थळाने केला आहे.
बॉलीवूड लाइफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटामध्ये क्लिष्ट वळण आल्याच्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही. हे दोघेही एकमेकांशी व्यवस्थित चर्चा करून त्यांच्या अटींवर संगनमताने घटस्फोट घेण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच, मलायकाने पोटगीत १०-१५ कोटी रुपयांची मागणी केली होती आणि अरबाजनेही पैसे देण्यास होकार दिल्याचे म्हटले जात होते. मात्र, असे काहीच घडले नसून अद्याप मलायकाने पोटगीची मागणी केलेली नसल्याचे बॉलीवूड लाइफने म्हटले आहे.
मलायका आणि अरबाजने गोव्यात एकत्र नवीन वर्षाचे स्वागत केले होते. त्यामुळे त्यांचा घटस्फोट जरी होत असला तरी त्यांच्यात मैत्रीचे संबंध राहतील हे दिसून येते. मलायकाची बहिण अमृता अरोरा हिने इन्स्टाग्रावर पार्टीचे फोटो शेअर केले होते. त्यात मलायका आणि अरबाजही दिसला होता. दरम्यान, अरबाज आणि मलायका विभक्त होण्याच्या निर्णयामध्ये अरबाज-मलायकामध्ये तिसरा व्यक्ती आल्याची चर्चादेखील रंगल्या होत्या. बॉलिवूडची जोडी फुटण्यामागे अर्जुन कपूर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अर्जुन आणि मलायका अरोरा खानमधील वाढत्या मैत्रीमुळे ती अरबाजपासून दूर होत असल्याचे वृत्त चर्चेत होते. त्यासोबतच असेही म्हटले जातेय की, अरबाज खानच्या आयुष्यातही ‘ती’चे आगमन झाले आहे. पण, अरबाजच्या आयुष्यातील ‘ती’ नेमकी आहे तरी कोण यावरुन अद्यापही पडदा उठला नाहीये.