जगातील सर्वात श्रीमंत कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी ‘द वॉल्ट डिस्ने’ गेल्या काही वर्षांत आपल्या आर्थिक हालचालींमुळे सातत्याने जगाला आश्चर्यचकित करते आहे. अगदी कालपरवाची गोष्ट आहे, त्यांनी एका वर्षांत एक हजार कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या चित्रपटांची नावं जाहीर के ली. या यादीत ‘टॉय स्टोरी-४’, ‘कॅप्टन माव्‍‌र्हल’, ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’, ‘द लायन किंग’ आणि ‘अल्लाउदीन’ असे एकूण पाच चित्रपट आहेत. आजवर वॉर्नर ब्रदर्स, सोनी पिक्चर्स, पॅरामाऊंट पिक्चर्स यांसारख्या अनेक कंपन्यांनी एक हजार कोटींचा पल्ला गाठण्याची किमया करून दाखवली आहे खरी, परंतु एका वर्षांत सलग पाच चित्रपट हजार कोटींच्या घरात नेऊन बसवण्याचा करिश्मा वॉल्ट डिस्नेव्यतिरिक्त अद्याप कोणीही करून दाखवलेला नाही; परंतु या नव्या विक्रमामुळे आता प्रश्न असा पडतो की, एक कार्टून बनवणारी कंपनी खरंच इतके पैसे मिळवते का? आणि या प्रश्नाचे उत्तर हो असे असेल, तर मग कसे?

‘द वॉल्ट डिस्ने’ने अचाट करणारी आर्थिक प्रगती केली आहे. त्यांनी हजारो कोटी रुपये खर्च करून मनोरंजन क्षेत्रातील बलाढय़ समजल्या जाणाऱ्या ‘ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स’, ‘एबीसी टेलिव्हिजन ग्रुप’, ‘लुकास फिल्म लिमिटेड’, ‘माव्‍‌र्हल एन्टरटेन्मेंट’ यांसारख्या अनेक कंपन्यांना अक्षरश: गिळंकृत करत आपले मार्गक्रमण आता एकाधिकारशाहीच्या दिशेने सुरू केले आहे; परंतु कार्टून व लहान मुलांची खेळणी तयार करणाऱ्या या कंपनीकडे इतका पैसा येतो कुठून? त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे? अर्थात हे समजण्यासाठी आधी आपल्याला एक चित्रपट पैसे कसे मिळवतो हे समजायला हवे. त्याशिवाय वॉल्ट डिस्नेचा अजस्र आर्थिक खेळ लक्षात येणार नाही.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

कोणताही चित्रपट डेव्हलपमेंट, प्री-प्रॉडक्शन, प्रॉडक्शन आणि पोस्ट-प्रॉडक्शन अशा एकूण चार भागांत तयार केला जातो.

  • डेव्हलपमेंट – या पहिल्या स्तरावर चित्रपटाची संहिता, कथानक व चित्रपटाचे नाव यांसारख्या गोष्टींवर काम केले जाते.
  • प्री-प्रॉडक्शन – दुसऱ्या भागात चित्रपटातील कलाकार, चित्रीकरणाचे ठिकाण, चित्रीकरणासाठी लागणारे साहित्य व इतर कर्मचारी यांचे नियोजन केले जाते.
  • प्रॉडक्शन – तिसऱ्या भागात केलेल्या नियोजनाप्रमाणे प्रत्यक्ष चित्रपटाचे चित्रीकरण केले जाते.
  • पोस्ट-प्रॉडक्शन – चौथ्या भागात एडिटिंग, साऊंड इफेक्ट व इतर तांत्रिक बाबींवर काम करून चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सज्ज केला जातो.

या संपूर्ण प्रक्रियेत जो व्यक्ती पैसे खर्च करतो त्याला निर्माता असे म्हटले जाते. साधारणपणे दोन प्रकारचे निर्माते असतात. पहिल्या प्रकारातील निर्माते चित्रपट तयार करून तो चित्रपटांचे वितरण करणाऱ्या कंपन्यांना विकतात. या विक्रीत त्यांना नफा मिळतो. म्हणजेच चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या प्रकारच्या निर्मात्यांनी अपेक्षित नफा मिळवलेला असतो. दुसऱ्या प्रकारचे निर्माते चित्रपट तयार करून त्याचे वितरणदेखील स्वत:च करतात.

वितरण करणाऱ्या कंपन्या चित्रपटाची जाहिरात, प्रसिद्धी आणि चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत लागणारा उर्वरित सर्व खर्च करतात. दरम्यान, त्या चित्रपटासाठी त्यांना प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. आजच्या काळात खरं तर निर्मितीपेक्षा चित्रपट वितरणावरच जास्त पैसा खर्च केला जातो. मग वितरक आपला नफा कसा मिळवतात? वितरण व्यवसायात बरेच आर्थिक धोके आहेत; परंतु हाच व्यवसाय आर्थिक नफ्याचे चक्र फिरवतो आणि एकदा या चक्राला गती मिळाली की कल्पना करता येणार नाही इतका पैसा या कंपन्यांना मिळवता येतो.

वितरक कंपन्या सर्वात प्रथम चित्रपटाचे सॅटेलाइट व संगीत यांचे हक्क विकतात. सॅटेलाइट हक्क म्हणजे चित्रपट टीव्ही वाहिन्यांवर प्रदर्शित करण्याचे अधिकार. या विक्रीतून वितरक कंपन्यांना बऱ्यापैकी नफा मिळवता येतो. त्यानंतर मुख्य काम म्हणजे चित्रपट प्रदर्शित करणे. वितरक चित्रपटाच्या कॉपीज त्यांच्या खालील वितरक कंपन्यांना देतात. या कंपन्या प्रत्येक शहरातील प्रत्येक सिनेमागृहात या कॉपीज पोहोचवतात. या सिनेमागृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित केला जातो. हा संपूर्ण व्यवहार भागीदारीत केला जातो. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्व प्रकारचे कर भरून तिकिटविक्रीतून मिळणाऱ्या नफ्याला एकूण उत्पन्न असे म्हटले जाते. या नफ्याचा ७५ टक्के भाग सिनेमागृहांना व २५ टक्के  भाग वितरकांना मिळतो. हे गणित आठवडय़ागणिक बदलत जाते. चित्रपटाला दुसऱ्या आठवडय़ातही अपेक्षित प्रतिसाद मिळत असेल तर हे प्रमाण ७०-३० असे विभागले जाते आणि तिसऱ्या आठवडय़ात ६०-४० या प्रमाणात नफा विभागला जातो. वरकरणी पाहता सिनेमागृहांच्या तुलनेत वितरकांना मिळणारा २५ टक्के नफा किरकोळ वाटतो, परंतु भारतात बहुपडदा व एकपडदा चित्रपटगृहे असे मिळून जवळपास ६ हजार सिनेमागृहे आहेत. उदा. एखाद्या चित्रपटाने एका आठवडय़ात १ लाख रुपयांची कमाई केली तर त्यातील २५ हजार रुपये वितरकांना मिळतात व ७५ हजार रुपये सिनेमागृहांच्या मालकांना मिळतात. याच अनुषंगाने विचार करता समजा, हा चित्रपट एकाच वेळी २०० सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला तर २५-७५ या कराराप्रमाणे वितरकांना ५० लाख रुपयांचा नफा होतो आणि हा लाखांचा खेळ जेव्हा कोटींमध्ये जातो तेव्हा मिळणारा नफादेखील शेकडो कोटींमध्ये मिळतो. ‘द वॉल्ट डिस्ने’ कंपनी अशा दोन्ही प्रकारच्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करते. ते स्वत:चे चित्रपट तयार करून त्यांचे वितरण करतातच, पण त्याचबरोबर इतर निर्मात्यांचे चित्रपट विकत घेऊ न त्यांचेदेखील वितरण करतात. या व्यवसायातून त्यांना भरपूर नफा मिळतो; परंतु जगभरात वॉर्नर ब्रदर्स, सोनी पिक्चर्स, पॅरामाऊंट पिक्चर्स अशा अनेक मोठय़ा कंपन्या आहेत, ज्या डिस्नेप्रमाणेच दोन्ही प्रकारच्या व्यवसायांत गुंतवणूक करतात. मग ते आर्थिक प्रगतीच्या बाबतीत डिस्नेच्या आसपासदेखील का नाहीत?

‘डिस्ने’च्या आर्थिक प्रगतीचे रहस्य त्यांच्या गुंतवणुकीत दडले आहे. इतर कंपन्या चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळणारा नफा खिशात ठेवून त्या पुढील चित्रपटावर लक्ष केंद्रित करतात; परंतु डिस्ने असे करत नाही. जोपर्यंत चित्रपट पार जुना होत नाही, तोपर्यंत त्यातून ते नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात. २०१४ च्या आकडेवारीनुसार जगभरात जवळपास ४० हजार १७४ सिनेमागृहे आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे त्यातील १ हजार ६७८ सिनेमागृहांची मालकी डिस्नेकडे आहे. म्हणजे त्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाची संपूर्ण कमाई डिस्नेच्या खिशात जाते. सिनेमागृहानंतर चित्रपट टीव्ही वाहिन्यांवर प्रदर्शित केला जातो. येथेही डिस्नेने आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. जगभरातील तब्बल २५ टक्के टीव्ही नेटवर्क डिस्नेच्या हातात आहेत. त्यामुळे टीव्हीवर चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर त्यादरम्यान दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून मिळणारा सर्व पैसा पुन्हा एकदा डिस्नेच्याच खात्यात जातो. त्यानंतर चित्रपटाच्या सीडी तयार करून विकल्या जातात; परंतु इंटरनेटचा वापर वाढल्यापासून सीडी विकत घेऊ न चित्रपट पाहणारे प्रेक्षक आता कमी होऊ  लागले आहेत. यावर पर्याय म्हणून डिस्नेने ‘व्हिडीओ ऑन डिमांड’सारखी कल्पना राबवली. या प्रकारात ग्राहक सीडीऐवजी इंटरनेटच्या माध्यमातून चित्रपट विकत घेऊ  शकतात. या नव्या प्रकारात नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, यूटय़ूब यांसारख्या अनेक मोठय़ा वेब कंपन्यांनी उडय़ा मारल्या, परंतु येथेही डिस्नेनेच आघाडी मिळवली आहे. त्यानंतर मर्चेडाइजिंग हे क्षेत्रदेखील त्यांनी व्यापून टाकले आहे. या दुकानदारीच्या क्षेत्रात ते कपडे, लहान मुलांची खेळणी, शाळेची बॅग, कंपासपेटी, पाण्याची बॉटल आणि इतर अनेक गोष्टी विकतात. विक्रीस ठेवलेल्या या वस्तूंवर त्यांच्या चित्रपटांचा प्रभाव असतो. त्यामुळे या वस्तू भराभर विकल्या जातात.  या वस्तूंच्या माध्यमातून त्यांच्या चित्रपटाची जाहिरातदेखील होते. जगभरात एकूण ३८७ डिस्नेची अधिकृत दुकाने आहेत. या व्यवसायातून डिस्ने कंपनी महिन्याला सरासरी ५४५ कोटी रुपयांचा नफा मिळवते. याशिवाय डिस्नेकडे स्वत:चे थीम पार्कदेखील आहेत. त्यांना आपण ‘डिस्नेलँड’ या नावाने ओखळतो. अत्याधुनिक यंत्रे आणि अद्ययावत सोयींनी भरलेल्या या डिस्ने पार्कमध्ये आपल्याला त्यांच्या सर्व कार्टून व्यक्तिरेखा पाहता येतात; किंबहुना या व्यक्तिरेखांच्या आधारावरच या पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. या पार्कमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एका दिवसाला ७ हजार ८०० रुपये मोजावे लागतात. वर्षांला जवळपास १८ लाख पर्यटक या डिस्नेलँडला भेट देतात. या व्यवसायातून वर्षांला सरासरी १ हजार कोटी रुपयांची कमाई डिस्ने कंपनी करते. इतक्या विविध प्रकारच्या गुंतवणुकींतून डिस्ने कंपनी वर्षांला सरासरी ८० हजार कोटी रुपयांचा नफा मिळवते आणि या पैशांच्या जोरावरच त्यांनी मनोरंजन क्षेत्रात आपली मक्तेदारी निर्माण करायला सुरुवात केली आहे.

हा सारा डोलारा लक्षात घेण्याचे कारण म्हणजे कार्टून, अ‍ॅनिमेटेड चित्रपट, लाइव्ह अ‍ॅक्शन चित्रपट अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या डिस्नेसारख्या कंपन्यांची आर्थिक उलाढाल ही तितकीच रंजक आणि समजून घेण्याची गोष्ट आहे. हॉलीवूडमध्ये दबदबा असलेल्या या कंपन्यांचा इतिहास हा अशा रंजक, थरारक घडामोडींनी भरलेला आहे.