अमेरिकेतील प्रदर्शनाआधीच अनुराग कश्यपने बॉलीवूडला ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ दाखवला
हॉलीवूडपट आणि हॉलीवूड अभिनेते हा भारतातील दिग्दर्शकांच्या प्रेमाचा, औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे रॉबर्ट डी निरोसारखा दिग्गज कलाकार असेल नाही तर जॅकमनसारखा या पिढीचा कलाकार.. ही मंडळी भारतात येणार असतील तर त्यांच्यासाठी बॉलीवूडकडून नेहमीच ‘रेड कार्पेट’ अंथरले जाते. विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमुळे अंतरही कमी होत आहे. एकमेकांच्या कामाची वारंवार दखलही घेतली जाऊ लागली आहे. म्हणूनच ऑस्कर विजेता दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसे यांचा ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ अजून अमेरिकेतही झळकला नसताना त्यांचा चाहता असलेल्या दिग्दर्शक अनुराग कश्यपने सहकाऱ्यांसाठी या चित्रपटाचा खास शो आयोजित केला.
‘मार्टिन आणि माझ्यात एकमेकांच्या कामाबद्दल चांगली समजही आहे तसेच आम्हाला एकमेकांबद्दल कौतुकही आहे. गेली कित्येक वर्षे त्याला आदर्श मानून मी माझी कारकीर्द घडवली आहे. त्यामुळे त्याचा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित व्हायच्या आधीच इथे प्रदर्शित करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे,’ असे अनुरागने सांगितले. मार्टिनचा ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ हा चित्रपट मी मरक्केशमध्ये महोत्सवात पाहिला होता. चित्रपट मला इतका आवडला की, भारतात तो सगळ्यांना नक्की दाखवेन, असे आश्वासन मी मार्टिनला दिले होते आणि म्हणूनच सगळ्यांसाठी खास शो आयोजित केल्याचे अनुरागने सांगितले.
मार्टिनचे दिग्दर्शन, लिओनार्दोची मुख्य भूमिका आणि वॉल स्ट्रीटवरच्या खऱ्या शेअर ब्रोकरची कहाणी असा त्रिवेणी संगम या चित्रपटात असल्याने बॉलीवूडनेही ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’च्या या शोला एकच गर्दी केली होती. अनुरागच्या या खास शोसाठी किरण राव, अर्जुन कपूर, अनुष्का शर्मा, अयान मुखर्जी, इम्तियाज अली, अभिनव कश्यप, नसीरुद्दीन शहा यांच्यासह बॉलीवूडची प्रसिद्ध जोडी रणबीर क पूर आणि कतरिना कैफही एकत्र उपस्थित राहिले होते. ‘मार्टिन स्कॉर्सेस आणि लिओनार्दो एकत्र आलेत म्हणजे पडद्यावर कमाल असणार त्यामुळे अशी सुवर्णसंधी मी चुकवलीच नसती,’ असे दिग्दर्शक इम्तियाज अलीने सांगितले, तर अयान मुखर्जीनेही या चित्रपटाचा ट्रेलर आवडल्यामुळेच शोसाठी हजर झाल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The wolf of wall street shown in bollywood by anurag kashyap
Show comments