थिएटर मर चुका है!’ असं पं. सत्यदेव दुबे यांनी वीसेक वर्षांपूर्वीच ‘ऐलान’ करून टाकलं असलं तरी त्यानतंरही दुबेजी थिएटर करत राहिलेच. मग रंगभूमीच्या मृत्यूची घोषणा करून त्यांनी काय साधलं, कुणास ठाऊक! कदाचित इलेक्ट्रॉनिक मीडिया, इंटरनेट, मोबाइल क्रांतीमुळे रंगभूमीवर येऊ घातलेल्या संकटाचे भयसूचक संकेत देण्यासाठी तर त्यांनी हे केलं नसावं? त्या वेळचा त्यांचा हा त्रागा प्रेक्षकांच्या अल्प प्रतिसादातून त्यांनी व्यक्त केला होता. खरं तर दुबेंनी प्रेक्षकांची कधीच तमा बाळगली नाही. त्यांनी थिएटर केलं ते ‘स्वान्त सुखाय:’!अर्थात त्यांना आपलं नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक येऊ नयेत असं अजिबातच वाटत नव्हतं. अन्यथा कारण नसताना किंवा आशयाची निकड नसतानाही बऱ्याचदा त्यांनी आपल्या नाटकांतून लोकप्रिय हिंदी चित्रपट गीते पेरली नसती. (याबद्दल त्यांच्यावर टीकाही होत असे. पण त्यांनी तिला कधी भीक घातली नाही.) पण त्यांना प्रेक्षकांनी आपल्या नाटकाला यावं ते अपाल्या शर्तीवर अशी त्यांची अपेक्षा असे. तर ते असो.

दुबेजींच्या थिएटरसंबंधीच्या उपरोक्त विधानाची आता आठवण होण्याचं कारण म्हणजे सध्या देशभरात सुरू असलेल्या आठव्या थिएटर ऑलिम्पिकमध्ये सेमिनारचा ठेवला गेलेला एक विषय : ‘माझ्या रंगभूमीचा संकोच कोणी केला?’ (हु थ्रिंक्स माय थिएटर?) याचा धांडोळा या थिएटर ऑलिम्पिकच्या निमित्ताने घेतला जात आहे. खरं तर देशभरात १६ ठिकाणी सुरू असलेल्या या थिएटर ऑलिम्पिकमध्ये साडेचारशेहून अधिक देशविदेशातील नाटके सादर होत आहेत. त्यात पाचएक हजार रंगकर्मी सहभागी होत आहेत. त्याखेरीज रस्तानाटय़े, लोककला सादरीकरणे, चर्चासत्रे, दिग्गज रंगकर्मीच्या प्रकट मुलाखती, रंगकार्याशी निगडित कार्यशाळा, रंगभूमीचे अभ्यासक, समीक्षक, नाटय़शास्त्राचे विद्यार्थी आदी मिळून हा आकडा आणखी काही हजारांनी वृद्धिंगत होतो. सबंध देश या थिएटर ऑलिम्पिक्सने ढवळून निघत असताना रंगभूमीच्या आक्रसण्याबद्दल चर्चा घडवून आणण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. परंतु ज्या अर्थी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर त्यावर विचारमंथन घडवून आणलं जातंय त्या अर्थी या भीतीत काहीतरी तथ्य हे नक्कीच असणार! आणि तसं ते आहेही!!

मुंबईत या विषयावर दोन दवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक आणि थिएटर ऑलिम्पिक्सचा घाट घालणारे प्रा. वामन केंद्रे यांनी या चर्चासत्रात बीजभाषण केलं. रंगभूमीसमोरील अनेक प्रश्न आणि समस्यांचा ऊहापोह त्यांनी आपल्या भाषणात केला. अत्यंत गांभीर्याने आणि अंतर्मुख होऊन त्यांनी केलेली मांडणी निश्चितच विचारप्रवृत्त करणारी होती.

‘रंगभूमी खरोखरीच आक्रसत चाललीय का? की तो केवळ एक भास आहे? आणि खरंच जर तिचा संकोच होत चालला असेल तर तो कुणी केला? मी स्वत:? की इतर कुणी? रंगभूमी संकुचित होण्याला जर इतर कुणी कारण असेल तर मग मी रंगकर्मी म्हणून तेव्हा काय करत होतो? मी गाफील राहिलो का? की या सगळ्या प्रकाराबद्दल मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो? काय, नेमकं काय घडलं?’ असे प्रश्न उपस्थित करत प्रा. केंद्रे यांनी त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही आपल्या भाषणात केला.

‘माझं थिएटर ही माझी अभिव्यक्ती आहे. ‘स्वान्त सुखाय:’ मी ते करतो. मला प्रेक्षकांची गरज नाही,’ असं जर कुणी म्हणत असेल तर ते संपूर्णत: चुकीचं आहे. ‘जिंदगी की शेअरिंग’ म्हणजे थिएटर होय. त्यामुळे प्रेक्षकाअभावी थिएटर होऊच शकत नाही. रंगकार्य ही समूहकला आहे. ती सादर करणारे आणि तिचा आस्वाद घेणारे यांच्यातील संवदाखेरीज तिला पूर्णत्व येत नाही. याचा अर्थ प्रेक्षकांचा अनुनय करणं गरजेचं आहे किंवा त्यांच्या आहारी जाणं आवश्यक आहे असं नाही. रंगकर्मीना आपली अभिव्यक्ती आपल्या शर्तीवर प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता आणि कुवत बाळगायला हवी. त्यासाठी स्वत:वर आणि अभिव्यक्तीवर पुरेपूर विश्वास असायला हवा. ‘त्याचबरोबर मी करतो तेच थिएटर आणि मला जे माहीत आहे तेच थिएटर’ हा अहंगंड आणि हट्टाग्रहही दूर सारायला हवा. दुसऱ्याचं थिएटरही समजून घ्यायला हवं.. पाहायला हवं. दुसऱ्यांची प्रयोगशीलताही जाणून घ्यायला हवी. तिचं स्वागत करायला हवं. आस्वाद घ्यायला हवा.

छबिलदास चळवळीत जितकं नाटक क्लिष्ट, प्रेक्षकाला न कळणारं, तितकं ते चांगलं अशी समजूत काही रंगककर्मीनी करून घेतली होती. जास्त प्रेक्षक म्हणजे वाईट नाटक असं त्यांना वाटत असे. प्रेक्षकाला कमी लेखण्याच्या या वृत्तीमुळे  प्रेक्षक नाटकापासून दुरावला गेला; जो अजूनही प्रायोगिक आणि समांतर नाटकांपासून अंतर राखून आहे. हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे. शिवाजी मंदिरच्या नाटकाला या भरती-ओहोटीशी काहीही देणंघेणं नाही. कारण तिथे प्रेक्षकाला विचारात घेऊनच व्यावसायिक गणिते आखली जातात. सबब तिथे प्रयोगशीलतेला खूपच मर्यादा येतात.

आज बाजारपेठेने रंगभूमीचा कब्जा केला आहे. जागतिकीकरणाच्या परिणामी दूरचित्रवाहिन्या, इंटरनेट, मोबाइल, मल्टिप्लेक्स यांनी रंगभूमीचा अवकाश व्यापून टाकला. टीव्हीवरील करमणूक फुकट असल्याचा समज करून घेऊन नाटकाचा प्रेक्षक त्याकडे वळला.  स्वस्त आणि सवंगतेच्या विळख्यात आज प्रेक्षक सापडला आहे. सामान्य कुवतीच्या माणसांच्या हातात ही माध्यमे असल्याने तिथे सर्जनशील असं काही घडणेच दुरापास्त झाले आहे. कलेत काही प्रयोग करू इच्छिणाऱ्यांना  तिथे स्थान नाही. तंत्रज्ञानाने आणलेल्या या नव्या माध्यमांचे आव्हान रंगकर्मीनी वेळीच ओळखले नाही. बाजारपेठीय शक्तींनी नियंत्रित केलेल्या या माध्यमांत नवं काही घडणं/ घडवणं अवघड आहे. दूरचित्रवाणीवरील चमकणाऱ्या चेहऱ्यांना घेऊन केलेलं ‘ग्लॅमरस थिएटर’ हे काही खरं थिएटर नव्हे. रंगभूमी नेहमी काळाबरोबर राहिली आहे असे जे आपण म्हणतो ते यामुळे खोटं ठरत आहे. तसं असतं तर या नवीन आव्हानांची वेळीच दखल घेऊन रंगभूमीने त्याचा सामना करण्यासाठी आयुधं परजली असती. आज जी अरण्यरुदनाची वेळ आली आहे ती खचितच आली नसती.

दुसरीकडे रंगभूमीने प्रसारमाध्यमांतील आपले दखलपात्र स्थानही गमावले आहे. आज मुंबईसारख्या महानगरात थिएटर ऑलिम्पिक्ससारखे अपूर्व घटित घडते आहे; परंतु प्रसारमाध्यमांमध्ये त्याचं फारसं प्रतिबिंब उमटताना दिसत नाही. किमान मुंबईतल्या रंगकर्मीमध्ये तरी त्याबद्दल उत्साह आणि कुतूहल असायला हवं होतं. पण तिथेही कानठळ्या बसवणारी भीषण शांतता आहे. सगळ्याच गोष्टींकडे उदासीन वृत्तीने पाहण्याची सवय लोकांच्या अंगी मुरली आहे. त्यामुळे थिएटरचा अवकाश संकोचत गेल्यास त्याबद्दल आश्चर्य वाटायला नको. ७रंगभूमी किंवा कुठलीही कला ही माणसाच्या प्राधान्यक्रमांत सर्वात शेवटी असते हे जरी खरं असलं तरी माणसाला ‘माणूस’ बनविण्यात कलांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे हे कदापि विसरून चालणार नाही. मात्र, आज लोकांना नाटक पाहावंसं वाटेनासं झालं आहे. समाजाला थिएटरचं महत्त्व आणि निकड समजावून देण्यात रंगकर्मी कमी पडताहेत का, हाही प्रश्न यानिमित्ताने पुढे येतो. भारतात महाराष्ट्र आणि प. बंगाल आणि दक्षिणेतील काही प्रांत वगळता सक्रिय रंगभूमी नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. या थिएटर ऑलिम्पिकच्या निमित्ताने किमान शहरांतून तरी रंगभूमीची चळवळ रुजली तरी बरंच काही साध्य होऊ शकेल. नव्या, तरुण पिढीला रंगभूमीकडे आकर्षित करण्याचे प्रचंड कठीण आव्हान आज उभे आहे. मल्टिप्लेक्सकडून तरुणाईला थिएटरकडे वळवण्याचे हे आव्हान रंगकर्मीनी स्वीकारायला हवे. त्यासाठी नवी रंगभाषा, सादरीकरणाची नवनवी तंत्रे अंगीकारून  तरुणांना भावणारे आणि त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय नाटकाने हाताळायला हवेत. रंगभूमीचं महत्त्व त्यांना पटायला हवं, तरच थिएटरला काही भवितव्य असेल.

दुसरीकडे सरकार, शासनकर्ते आणि व्यवस्था यांना कायमच थिएटरची  दहशत वाटत आलेली आहे. कारण रंगभूमी त्यांच्यासमोर कायम आरसा धरण्याचं काम करत आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून रंगभूमीला काही पाठबळ मिळेल ही शक्यताच नाही. ते अनुदाने, बक्षिसे वगैरेंच्या रूपात तोंडदेखली कलेची भलामण करतात खरे; पण ती तितपतच. फारच क्वचित शासनकर्ते आणि व्यवस्था थिएटरच्या बाजूने उभी राहिलेली दिसते.

तशात आता समाजातील निरनिराळ्या घटकांच्या भावनाही खूपच हुळहुळ्या झाल्या आहेत. एवढय़ा तेवढय़ा गोष्टींनी त्या दुखावल्या जातात. मग ती जातीय, धार्मिक, प्रांतिक, भाषिक अस्मिता असो; वा अशा अस्मितांचे राजकारण करणाऱ्यांच्या नादी लागून रस्त्यावर उतरून हिंसाचार करणारे असोत. ही एक समांतर दडपशाही व्यवस्था आज थिएटरच्या मुळावर उठली आहे. त्यामुळे थिएटरचा सर्जनशील अवकाश संकोचत चालला आहे. या सगळ्याचा मुकाबला करायचा तर रंगकर्मीनी एक होऊन त्या विरोधात उभं ठाकायला हवं. पण तिथंही बोंबच आहे. आपापले हितसंबंध, व्यवस्थेचं लांगूलचालन करून मिळवावयाचे लाभ, स्वाभिमानाचा अभाव आणि भीतीमुळे रंगकर्मीचा सामूहिक दबावगटही अस्तित्वात नाही; जो या गटातटांत विखुरलेल्या, कणाहीन रंगकर्मीची दखल शासनकर्ते आणि व्यवस्थाही का घेईल?

थिएटर संकुचित होत जाण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे कुठलीच गोष्ट आता अज्ञात वा अस्पर्श राहिलेली नाही. जगात कुठंही जरा खुट्ट झालं तरी जगाच्या कानाकोपऱ्यात ती माहिती तंत्रज्ञानामुळे काही क्षणांत पोहोचते. त्यावर विचार करायला, त्याची सर्वस्पर्शी समज यायला आणि त्याचं सर्जनात्मक विश्लेषण, अभिव्यक्ती करायला आवश्यक तो काळच आज उपलब्ध होत नसल्याने क्षणात ती गोष्ट शिळी होऊन जाते. त्यामुळे त्यावरील कलात्मक अभिव्यक्तीही लगेचच कालबाह्य़ ठरते. थिएटर ही ठहरावाची मागणी करणारी गोष्ट आहे. आजच्या गतिमान आणि धकाधकीच्या जगात या ठाय लयीला कोणतेच स्थान नाही. मग नवं थिएटर, नवं नाटक निर्माण होणार तरी कसं?

याच जागतिकीकरणाने जग हे एक ‘ग्लोबल व्हिलेज’ झाल्याने पूर्वीचं भौगोलिक, सांस्कृतिक, लोकजीवनातील वैविध्य नष्ट होत नाही. जग सांस्कृतिकदृष्टय़ाही एकरेषीय होत आहे. त्याचं वेगाने सपाटीकरण होत आहे. अशा आवर्तात आपलं सर्जनात्मक वेगळेपण, आपली अस्मिता, तिची स्वतंत्र ओळख आणि स्थान कसं टिकवून ठेवायचं, ही एक अक्राळविक्राळ समस्या सर्जनशील कलावंतांसमोर उभी ठाकली आहे. ज्याचं उत्तर त्यांच्यापाशी नाही.

अशा अनेकानेक गोष्टींनी थिएटरचं अवकाश आज व्यापलं आहे. काळ तर मोठा कठीण आला आहे. त्याला पुरून उरून थिएटरला पुढं जायचं आहे.

प्रा. वामन केंद्रे यांनी बीजभाषणात केलेली ही मांडणी शंभर टक्के खरी आहे. त्याला धरूनच या चर्चासत्रात सहभागी रंगककर्मीनी मत-मतांतरे व्यक्त करणे अपेक्षित होते. परंतु दुर्दैवानं ही अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. पुरुषोत्तम बेर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुसऱ्या सत्रात जर्मनीच्या इना रॉस यांनी जर्मनीतील थिएटरची सद्य:स्थिती मांडली. तिथे शासकीय अर्थसाहाय्य, सुसज्ज थिएटर्स, आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध असूनही प्रेक्षकांअभावी रंगभूमी उपेक्षिली जात असल्याचं सांगितलं. प्रौढ तसेच वृद्ध प्रेक्षक त्यातही महिलांचं प्रमाण प्रेक्षकांत जास्त आहे. तरुण वर्ग मात्र नाटकाकडे येत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राहुल डाकुन्हा यांनी भारतातील इंग्रजी रंगभूमीचं चित्र विशद करून सांगितलं. १९८० ते २००० सालापर्यंत पाश्चात्त्य  नाटकांवर अवलंबून असलेली इथली इंग्रजी रंगभूमी नाटककारांअभावी अद्यापि आपली मुळं रुजवू शकलेली नाही अशी कबुली त्यांनी दिली. मध्यंतरीच्या काळात शेक्सपीअरन रंगभूमीचं जोखड फेकून देऊन ‘हिंग्लिश’ रंगभूमीच्या झालेल्या उदयाने काहीएक सकारात्मक गोष्ट घडली असली तरी ती पुरेशी नाहीए याची त्यांना कल्पना आहे. प्रेक्षकांचा अभाव ही रड आहेच. पण त्याला ‘डिजिटल प्ले’चा पर्याय स्वीकारावा का, असा प्रश्न डाकुन्हा यांना पडल्याचं त्यांनी सांगितलं. इटलीतील दिग्दर्शिका – अभिनेत्री असलेल्या अ‍ॅना डोरा डोरना यांनी आपल्या रंगभूमीचं आख्यान लावून मूळ विषयाला स्पर्शच केला नाही. पुरुषोत्तम बेर्डे यांनी रंगभूमीचा संकोच होत असल्याचेच अमान्य करत आपल्याला असा काही अनुभव आलेला नाही असे सांगितले.

दुसऱ्या सत्रातही इटालियन रंगकर्मी निकोला पिआनझोला यांनी आपल्या इम्प्रोव्हायझेशन तंत्राचं चऱ्हाट लावून मूळ विषय बाजूलाच सारला. मात्र, असिफ अली हैदर खान यांनी काही वेगळे मुद्दे मांडले. जागतिकीकरणामुळे परिघावरच्या गोष्टी, समाजघटक केंद्रस्थानी आले आणि केंद्रस्थनीचे घटक परिघाकडे फेकले गेल्याचं सांगून, हे थिएटरबाबतीतही घडलं हे निदर्शनास आणून दिलं. थिएटरमधील मक्तेदारी संपून परिघावरचे विषय, उपेक्षित, शोषित, वंचित लोक आज थिएटरच्या केंद्रस्थानी आल्याचे ते म्हणाले. नाटकावरील लेखक – दिग्दर्शकाची सत्ता संपुष्टात येऊन ते सर्वाच्या सहकार्याने सादर होऊ लागले आहे. बाजारपेठीय शक्ती थिएटरची दिशा ठरवू लागल्या आहेत. मानवी संबंधातही हे दिसू लागलं आहे; ज्याचं प्रतिबिंब आजच्या नाटकांतून पाहायला मिळतं. असिफ अली हैदर यांची ही मांडणी निश्चितच वेगळी आहे.

Story img Loader