‘बोलणाऱ्याचे शेणही विकले जाते, पण न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही’, असे म्हटले जाते. हे बोलणे म्हणजे अर्थातच जाहिरात. नाटय़निर्मात्यांनीही आपले नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी जाहिरात या पासष्टाव्या कलेचा अभिनव वापर केल्याचे दिसून येते. बदलत्या काळानुसार नाटकांसाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्येही अभिनव प्रयोग केले जात आहेत. या जाहिरातींमुळे दर्जेदार नाटकाला थोडा तरी फायदा होतोच, पण तद्दन टाकाऊ नाटकही जाहिरातीच्या जोरावर काही काळ तग धरू शकते. नाटकांच्या बदलत गेलेल्या या जाहिरात कलेचा आढावा..
जाहिरातीचे हे तंत्र मराठी नाटय़निर्माते आणि नाटय़संस्थांनी चांगल्या प्रकारे आत्मसात केले आहे. वृत्तपत्रात नाटकांच्या येणाऱ्या जाहिरातींवर सहज नजर टाकली तरी ते दिसून येते. प्रत्येक नाटय़निर्माता आपापल्या परीने नाटकाची जाहिरात अधिकाधिक आकर्षक आणि लक्षवेधक कशी होईल याची काळजी घेत असतो. काहीजण नाटकाच्या जाहिरातीसाठीही वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. ‘टूरटूर’ हे नाटक १९८३ मध्ये रंगभूमीवर सादर झाले. या नाटकाची जाहिरात एका दिवशी वेगळ्या पद्धतीने केली होती. ‘नाटकाच्या आजच्या दिवसाच्या जाहिरातीचे कात्रण कापून ते दिवसभर पाण्यात भिजवून ठेवा. असे केल्यानंतर संध्याकाळी ती जाहिरात रंगीत झालेली पाहायला मिळेल,’ असे त्यात म्हटले होते. काही जणांनी तसे करूनही पाहिले. पण नंतर लक्षात आले की त्या दिवसाची तारीख ‘१ एप्रिल’ होती.
संजय पवार लिखित-दिग्दर्शित ‘ठष्ठ’ या नाटकाची जाहिरातही लक्ष वेधून घेणारी होती. नाटकाच्या नावाचे कुतूहल निर्माण करण्यात ही जाहिरात यशस्वी झाली होती. पुढे नंतर ‘ठरलेले लग्न मोडलेल्या मुलीची गोष्ट’ अशी ओळ ‘ठष्ठ’नाटकाच्या जाहिरातीत येऊ लागली. किरण पोत्रेकर लिखित-दिग्दर्शित ‘कळा या लागल्या जिवा’ हे नाटक पहिल्यांदा लता नार्वेकर यांच्या ‘श्री चिंतामणी’ संस्थेतर्फे सादर झाले होते. या संस्थेने नाटकाचे काही प्रयोग केले. मात्र प्रतिसादाअभावी त्यांनी हे नाटक थांबविले. त्यानंतर ‘अनामिका’ नाटय़संस्थेचे दिनेश पेडणेकर यांनी एक चांगले नाटक बंद पडू नये म्हणून ते मी माझ्या संस्थेतर्फे चालवितो, अशी विनंती लता नार्वेकर यांना केली. नार्वेकर यांनी पेडणेकर यांना नाटक करण्यास परवानगी दिली. पेडणेकर यांनी जाहिरातीच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारे हे नाटक लोकांच्या मनावर ठसवले. चक्क ‘बेस्ट’बसवरही नाटकाची जाहिरात करून ते सतत प्रेक्षकांसमोर राहील, याची काळजी घेतली.
नाटय़निर्मात्या लता नार्वेकर, नाटय़निर्माते मोहन वाघ, सुधीर भट, ‘सिंफनी’संस्थेचे वसंत खेर आणि अन्य मंडळींनी वेगळ्या प्रकारे जाहिराती केल्या. खेर यांच्या ‘ला शलाका’ संस्थेने केलेल्या ‘आमच्या या घरात’, ‘पार्टनर’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘फक्त एकच कारण’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ या नाटकांच्या जाहिराती वेगळ्या ठरल्या होत्या. ‘झालाच पाहिजे’ या नाटकाने वृत्तपत्रातून पहिल्या पानावर पूर्ण पान जाहिरात देऊन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या सुरू असलेल्या ‘प्रपोझल’ या नाटकाची जाहिरातही गाजली होती. नाटकाच्या जाहिरातीमुळे नाटक चालू शकते हे ‘काचेचा चंद्र’ या नाटकामुळे पाहायला मिळाले होते. डॉ. श्रीराम लागू हे अभिनेत्री भावना यांना खांद्यावर उचलून घेऊन जात आहेत अशा प्रकारे नाटकाची जाहिरात केली गेली होती. ‘सखाराम बाईंडर’ या नाटकाच्या जाहिरातीत निळू फुले यांनी लालन सारंग यांना आपल्या मांडीवर खेचले आहे, असे दृश्य जाहिरातीत होते. नाटय़निर्मात्या लता नार्वेकर यांच्या जाहिरातीमधून शाब्दिक कोटय़ा, ज्वलंत सामाजिक विषयावरील भाष्य तर कधी अन्य निर्माते, नाटक यांच्यावर केलेली टिप्पणीही असते. त्यांच्या ‘चारचौघी’, ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘सही रे सही’ या नाटकांच्या जाहिराती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या. मराठी संस्कृती आणि माणसांसाठी जे मानबिंदू आहेत, त्यांचे छायाचित्र अशोक हांडे आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या जाहिरातींमध्ये वापरत असतात.
नाटकाची जाहिरात ही आकर्षक आणि प्रेक्षकांना नाटकाकडे आकृष्ट करून घेणारी असली पाहिजे, यावर अनेकांचा भर असतो. काही वेळेस जाहिरातीमधून त्या नाटकाविषयीचे कुतुहूल चाळविले जाते. मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटय़निर्मात्यांबरोबरच नव्याने या क्षेत्रात आलेल्या मंडळींनीही आपल्या नाटकाच्या जाहिराती वेगळ्या प्रकारे केलेल्या दिसून आले आहे. काहींनी फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.
पासष्टावी कला
‘बोलणाऱ्याचे शेणही विकले जाते, पण न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही’, असे म्हटले जाते. हे बोलणे म्हणजे अर्थातच जाहिरात.
आणखी वाचा
First published on: 22-06-2014 at 03:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theater to take help of advertising industry for endorsement