मोहन जोशी – अमोल कोल्हे अभिनय जुगलबंदी
मराठी व्यावसायिक रंगभूमीमधील नटमंडळी, रंगभूषा, कपडेपट, बॅकस्टेज कामगार यांच्यापासून ते दिग्दर्शक, नाटककार, निर्माते, व्यवस्थापक आदींना रंगकर्मी या एकाच नावाने ओळखले जाते. याच रंगकर्मीविषयी सांगणारा ‘रंगकर्मी’ याच नावाचा सिनेमा दिग्दर्शक संजीव कोलते करीत असून त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.
मराठी व्यावसायिक रंगभूमी, तिची प्रदीर्घ परंपरा, जीवनाचे ध्येय म्हणून रंगभूमीशी निगडित वेगवेगळ्या विभागांत प्रदीर्घ काळापासून कार्यरत असलेले शेकडो-हजारो रंगकर्मी ही जगाच्या पाठीवरची अद्भुत बाब आहे. अन्य माध्यमांमध्ये काम करायचे नाकारून केवळ रंगभूमीशी एकनिष्ठ राहिलेले अनेक तत्त्वनिष्ठ रंगकर्मी याची ओळख आणि झलक जगाला करून देण्यासाठी ‘रंगकर्मी’ हा सिनेमा दिग्दर्शित करीत आहोत, अशी माहिती लेखक-दिग्दर्शक आणि मूळचे रंगकर्मी असलेले संजीव कोलते यांनी दिली.
रंगभूषाकार द्वारकानाथ कांबळी या भूमिकेत मोहन जोशी असून त्यांना गुरू मानून केशव इनामदार हा अभिनयाची कारकीर्द सुरू करतो. केशव इनामदार ही व्यक्तिरेखा डॉ. अमोल कोल्हे साकारतोय. गुरू-शिष्यांमधील संघर्षांद्वारे रंगभूमीची मूल्ये सांगणारे कथानक गुंफण्यात आले आहे, असे संजीव कोलते यांनी सांगितले.
‘रंगकर्मी’ या सिनेमाचा मुहूर्त नुकताच झाला. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ नाटय़ निर्माते सुधीर भट, ज्येष्ठ नाटय़ निर्मात्या लता नार्वेकर, ज्येष्ठ नाटय़कर्मी कमलाकर सोनटक्के, ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर, दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. कोलतेंनी दिग्दर्शित केलेला ‘तानी’ हा सिनेमा खूप आवडला.
हिंदी मालिकांची निर्मिती करण्याबरोबरच सशक्त कथानक असलेला मराठी सिनेमा करण्याचा विचार केला म्हणूनच ‘रंगकर्मी’ची निर्मिती करीत असल्याचे शशी सुस्मित प्रॉडक्शनचे सुमित आणि शशी मित्तल यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा