मी या इंडस्ट्रीत नवी होते, अनेकदा मला भूमिका मिळेल असं वाटायचं आणि ती भूमिका मिळायची नाही. तो काळ संघर्षाचा होता. त्याच काळात मीदेखील अनेक रात्री रडत घालवल्या आहेत असं अभिनेत्री विद्या बालनने म्हटले आहे. विद्या बालनची भूमिका असलेला मिशन मंगल हा सिनेमा १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आज विद्या बालन ही हिंदी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री आहे. मात्र आपल्या सिनेसृष्टीतल्या आणि मालिका विश्वातल्या प्रवासाबाबत तिने तिची मतं व्यक्त केली.

 

 

सिनेमाची परंपरा असलेल्या कोणत्याही घरातून मी आले नाही. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीची तीन वर्षे माझ्यासाठी वाईट म्हणावी अशीच होती. मी त्यावेळी रडायचे, झोपायचे आणि या आशेवर उठायचे आणि दिवसाला सुरुवात करायचे की चला आज काहीतरी चांगले होईल. त्यानंतर मी परिणिता सिनेमा केला. परिणिताने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली असंही विद्या सांगते. मिशन मंगलमध्ये विद्या बालन तारा नावाच्या महिलेची भूमिका करते आहे. तारामध्ये आणि माझ्यामध्ये काही समान गोष्टी आहेत. जेव्हा संकटांना मी सामोरी जाते तेव्हा डगमगून जात नाही. हिंमत हरत नाही हाच गुण मला तारामध्येही आढळतो असेही विद्याने म्हटले आहे.