Bigg Boss Marathi रिअॅलिटी शो आणि वादग्रस्त कार्यक्रमांच्या यादीत अग्रस्थानी येणारं नाव म्हणजे बिग बॉस. कार्यक्रमाचं स्वरुप, त्यात सहभागी होणारे स्पर्धक आणि त्या नंतर स्पर्धकांमध्ये होणारा कायापालट ही या कार्यक्रमाची मुख्य वैशिष्ठ्य. हिंदी बिग बॉसमध्ये आजवर बऱ्याच सेलिब्रिटींचा सहभाग पाहायला मिळाला. अगदी सर्वसामान्य चेहऱ्यांनाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाशझोतात येण्याची संधी मिळाली. त्याच धर्तीवर मराठी कलाविश्वातही या रिअॅलिटी शोचा शिरकाव झाला. काही महिन्यांपूर्वी बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रसिद्ध, तुलनेने कमी प्रसिद्ध अशा काही चेहऱ्यांची या घरात वर्णी लागली.

अनिल थत्ते, भूषण कडू, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, जुई गडकरी, राजेश श्रुंगारपुरे, रेशम टीपणीस या कलाकार मंडळींनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. प्रत्येक दिवशी या घरात वाद झाले, मतभेद झाले. विविध टास्कदरम्यान अनेकांनी मर्यादागही ओलांडल्या या साऱ्यामध्ये आपल्याच रणनितीने पुढे जात राहिली ती म्हणजे मेघा धाडे. हे नाव तस फार प्रचलित नाही. पण बिग बॉसच्या घरात तिचा वावर आणि खेळण्याची पद्धत पाहता तिला विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानलं जाऊ लागलं. बिग बॉसच्या निमित्ताने असे काही चेहरे प्रसिद्धीझोतात आले, ज्यांना फारसी लोकप्रियताही प्राप्त नव्हती.

Bigg Boss Marathi : मेघा, पुष्कर की सई; कोण ठरणार विजेता?

आजच्या घडीला सोशल मीडियावर मेघा धाडे, सई लोकूर, अनिल थत्ते, नंदकिशोर चौगुले ही नावं बरीच चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री करत आलेल्या नंदकिशोरला एका टास्कमुळे जे काही प्रकाशझोतात आणलं त्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ‘हुकूमशहा’ या टास्कमध्ये त्याने या घरात गाजवलेली हुकूमशाही चर्चेचा विषय ठरली आणि अनेकांच्या रोषाचाही. अशा या घरात आल्यामुळे स्मिता गोंदकरही बऱ्याच कारणांनी प्रकाशझोतात आली होती.

एकंदर काय, तर खेळ कसाही असो आणि तो कोणीही कसाही खेळलेला असो. पण, खऱ्या अर्थाने काही कलाकार मंडळींच्या कारकिर्दीला कलाटणी देण्यासाठी बिग बॉस मराठीचा हातभार लागला आहे हे मात्र खरं.

Story img Loader