अणूबॉम्बचा जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा जे रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर बेतलेला ‘ओपनहायमर’ हा चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला अन् याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. सुप्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. नोलनच्या इतर चित्रपटांप्रमाणेच ‘ओपनहायमर’देखील तितकाच गुंतागुंतीचा आणि सामान्य प्रेक्षकांना त्यांच्या मेंदू चालवायला लावणारा चित्रपट होता.
तंत्रज्ञानाची एवढी माहिती असलेला आणि त्याचा पुरेपूर वापर करून उत्तमोत्तम चित्रपट करणारा नोलन मात्र स्वतः तंत्रज्ञानापासून दूर आहे हे आपल्याला ठाऊक असेलच. नोलनकडे अजूनही स्मार्टफोन नाही, इतकंच काय तर त्याचा स्वतःचा इमेल आयडीदेखील नाही. या सगळ्या गोष्टींनी लक्ष विचलित होतं असं नोलनचं म्हणणं आहे आणि म्हणूनच तो या सगळ्या साधनांपासून लांब आहे, पण तुम्हाला माहितीये का नोलनच्या सेटवर काम करताना कलाकार आणि तंत्रज्ञांनाही त्यांचे हे जगावेगळे नियम पाळावे लागतात. चित्रपट करताना नोलनच्या सेटवर हे ३ नियम अगदी सगळ्यांना लागू असतात.
१. स्मार्टफोन्सवर बंधन:
फोनबाबतीत नोलनचं नेमकं काय मत आहे ते आपल्याला ठाऊक आहेच. त्यामुळेच त्याच्या सेटवरदेखील मोबाइल फोन्सना प्रवेश नसतो. त्याच्या सेटवर कुणीच मोबाइल किंवा स्मार्टफोन्स वापरत नाही. इतकंच के नोलनचा इमेल आयडीदेखील नाही त्यामुळे चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवण्यासाठीसुद्धा नोलन प्रत्येक कलाकाराला प्रत्यक्ष जाऊन भेटतो. ‘ओपनहायमर’चं स्क्रिप्ट देण्यासाठी नोलन स्वतः आयरलॅंडला जाऊन सिलियन मर्फीला भेटला होता. यामुळेच कदाचित त्याचे चित्रपट इतके उत्कृष्ट असतात.
आणखी वाचा : शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये काम करण्याआधी रणबीर कपूरने घातल्या ‘या’ अटी
२. बसायला खुर्ची नाही :
नोलनच्या सेटवरील आणखी एक सर्वात मोठा नियम म्हणजे ‘नो चेअर पॉलिसी’. त्याच्या सेटवर बसण्यासाठी कुणालाच खुर्ची दिली जात नाही. यामुळे सेटवरील प्रत्येक कलाकार समोर चाललेल्या कामात सक्रिय सहभाग घेतो. दिग्दर्शकासाठी जेव्हा अभिनेता खुर्चीत बसलेला असतो तेव्हा तो काम करत नसतो. यामुळेच नोलन त्याच्या सेटवर कुणालाच खुर्चीवर बसायची परवानगी देत नाही.
३. लघुशंकेसाठी ठरवलेली वेळ :
हा नोलनच्या सेटवरील सर्वात विचित्र नियम आहे. नोलनच्या सेटवर टॉयलेट ब्रेकदेखील ठरलेलेच असतात. सकाळी ११ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता अशा दोन वेळा लोकांच्या रेस्टरुम ब्रेकसाठी ठरलेले आहेत. यावरुन आपल्या कामाप्रती दिग्दर्शक किती गंभीर आहे हे स्पष्ट होतं. त्यामुळे जरी ही नैसर्गिक क्रिया असली तरी नोलनच्या सेटवर तुम्हाला वाटेल तेव्हा टॉयलेट ब्रेक तुम्हाला घेता येत नाही. बऱ्याच कलाकारांना सुरुवातीला हे फार विचित्र वाटायचं पण नंतर नोलनबरोबर काम केल्यावर त्यांना त्यामागील गांभीर्य ध्यानात आलं.