९० च्या दशकात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन अधिक वैविध्यपूर्ण चित्रपटांचे प्रयोग करत होते. त्यावेळी तमिळ चित्रपटविश्व त्यांच्या पुढील सुपरस्टारच्या शोधात होते. अरविंद स्वामीपासून थलपथी विजयपर्यंत अनेक तरुण अभिनेते यांची नावं समोर येत होती. यापैकीच आणखी एक असं नाव होतं ज्याच्या नशिबी सगळं होतं यशस्वी चित्रपट, मोठे दिग्दर्शक अन् मोठा चाहतावर्ग तरी या अभिनेत्याला मात्र ही लोकप्रियता फार काळ टिकवता आली नाही.
अवघ्या ३० व्या वर्षी चित्रपटसृष्टीतील पुढील सुपरस्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या या अभिनेत्याने दिवाळखोरी जाहीर केली. यानंतर त्याने चित्रपटविश्वाला कायमचा राम राम ठोकला. नंतर पोटापाण्यासाठी टॅक्सी चालवण्यापासून शौचालय साफ करण्यापर्यंत पडेल ती कामं केली. कोण होता तो अभिनेता? चला तर जाणून घेऊया.
आणखी वाचा : विमानतळावरील लाऊंजमध्ये प्रवेश नाकारल्याबद्दल नीना गुप्तांनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या “मी VIP नाही…”
हा सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे मिर्झा अब्बास अली. १९९६ च्या ‘कढल देसम’ या चित्रपटाने अब्बासला रातोरात स्टार बनवलं. अब्बासचे पुढील चित्रपट फ्लॉप होते पण लगेच त्याने रजनीकांत यांच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली, तसेच कमल हासन यांच्या ‘हे राम’ चित्रपटातही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली. यानंतर अब्बासने ऐश्वर्या राय, तब्बू व अजित यांच्या ‘कंदुकोंडाईन कंदुकोंडाईन’ या चित्रपटातही मुख्य भूमिका निभावली.
२००२ नंतर मात्र अब्बासच्या करिअरला उतरती कळा लागली, त्याचे बरेच चित्रपट डब्यात गेले, त्यानंतर त्याने टेलिव्हिजनमध्येही नशीब आजमावलं. मीडिया रीपोर्टनुसार त्याच्या काही आर्थिक निर्णयांमुळे तो दिवाळखोर झाला. यानंतर चित्रपटसृष्टीला राम राम ठोकत तो न्यूझीलँडमध्ये आला. पोट भरण्यासाठी त्याने अगदी पडेल ते काम केलं. मीडिया रीपोर्टनुसार अब्बासने टॅक्सी चालवणे, मेकॅनिकपासून शौचालय स्वच्छ करण्यापर्यंत सगळी कामं केली.
आणखी वाचा : फेसबुक, इंस्टाग्रामच्या जमान्यातसुद्धा ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटीज सोशल मीडियापासून आहेत कोसो दूर
सध्या अब्बास मोटीवेशनल स्पीकर म्हणून काम करतो. ‘बिग बॉस तमिळ’च्या सातव्या सीझनमुळे अब्बास सध्या चर्चेत आला आहे. या नव्या सीझनमधून अब्बास पुन्हा मनोरंजनविश्वात कमबॅक करणार आहे अशी चर्चा सुरू आहे. अद्याप याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण अब्बासच्या कमबॅकसाठी त्याचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत.