मल्टीस्टारर चित्रपट हे बॉलिवूडचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. अनेक दिग्गज कलाकारांना एकाच वेळी रुपेरी पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरते. अशाच एका मल्टीस्टारर चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘जी ले जरा’. एक दोन नव्हे तर तब्बल तीन अभिनेत्री या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची घोषणा मागच्या वर्षी करण्यात आली होती. मात्र आता या चित्रपटाबाबत एक नवा खुलासा करण्यात आला आहे.
‘जी ले जरा’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट या तीन दिग्गज अभिनेत्रींची मुख्य भूमिका असणार आहे. या तीन नायिकांची मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटात नायक कोण असणार? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. याबद्दलच एक नवी चर्चा आता सुरू झाली आहे.
आणखी वाचा – निक जोनसने प्रियांकाला दिले हटके टोपणनाव, फोटो शेअर करत म्हणाला…
प्रियांका, आलिया आणि कतरिना या तीन अभिनेत्रींसोबत अभिनेता ईशान खट्टर ‘जी ले जरा’मध्ये झळकणार आहे. एका न्यूज पोर्टलच्या रिपोर्टनुसार ईशानची खूप दिवस आधीच या चित्रपटासाठी निवड झाली आहे. पण चित्रपटाचे निर्माते याबाबत घोषणा करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान आलिया गरोदर असल्याने या चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी करण्यात येणार असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले. या चित्रपटाची घोषणा करताना प्रियांका चोप्राने हिंदी चित्रपटात काम करण्याची तिची इच्छा व्यक्त केली होती. मोठ्या कालावधीनंतर प्रियांका चोप्रा हिंदी चित्रपटात दिसणार असल्याने, तिचे चाहते उत्सुक आहेत.
आणखी वाचा – “मी १०० वर्षांची होईपर्यंत काम करेन…” गरदोरपणाबद्दलच्या प्रश्नावर आलिया भट्टचे सडेतोड उत्तर
दरम्यान ईशान खट्टर लवकरच ‘कॉफी विथ करण ७’मध्ये उपस्थित राहणार आहे. याबाबत त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे या कार्यक्रमात ईशान आगामी चित्रपटाबद्दल काही बोलणार का? याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.