‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. यंदा हे गाणं भारताला ऑस्कर मिळवून देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं आहे. अशातच या गाण्याबद्दल आणखी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हे गाणं राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव यांच्याबरोबर ऑस्करच्या मंचावर लाइव्ह सादर केलं जाईल, असं अकादमीने स्पष्ट केलं आहे.
याबरोबरच ऑस्कर सोहळ्यात दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर हे ‘नाटू नाटू’ या गाण्यावर थिरकणार असल्याची बातमी समोर आली होती. पण नुकतंच याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता या दोघांऐवजी हॉलिवूड लॉरेन गॉटलिब थिरकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. लॉरेन गॉटलिब ही ‘झलक दीखला जा’ या कार्यक्रमातून लोकांसमोर आली. ती १२ मार्चला होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर नृत्य सादर करणार आहे.
आणखी वाचा : ‘तू झूठी मैं मक्कार’ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; चार दिवसांत कमाईचा ‘हा’ टप्पा केला पार
लॉरेनने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबद्दल फोटो पोस्ट करत खुलासा केला आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, “खास बातमी… ऑस्कर २०२३ च्या पुरस्कार सोहळ्यात मी ‘नाटू नाटू’ या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित मंचावर भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे”.
लॉरेन याआधी रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी’ या चित्रपटात झळकली होती. तिच्या मोहक अदांचे भरपूर लोक चाहते आहेत. ‘नाटू नाटू’ या गाण्याला मिळालेले पुरस्कार आणि एकूणच या चित्रपटाला ज्यापद्धतीने बाहेरील देशात डोक्यावर घेतलं जात आहे ते पाहता या गाण्याला ऑस्कर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘आरआरआर’च्या टीमने अमेरिकेत सोहळ्यासाठी हजेरी लावली आहे. या गाण्याला ऑस्कर मिळावा यासाठी प्रत्येक भारतीय प्रार्थना करत आहे.