‘तेरे बिन लादेन’ या विनोदी चित्रपटाच्या यशानंतर ‘तेरे बिन लादेन-डेड ऑर अलाईव्ह’ हा सिक्वल प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सिक्वलमध्ये अभिनेता मनिष पॉल दिसणार असून, यात ओसामा बिन लादेनसह यंदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचाही बहुरूपी झळकणार आहे. चित्रपटात बराक ओबामांच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड कशी करण्यात आली याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी नुकतेच चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमात प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
चित्रपटात बराक ओबामा यांची भूमिका अभिनेता इमान क्रोशन साकारणार आहे. इमान क्रोशन हा युट्युबवर चांगलाच लोकप्रिय विनोदी कलाकार आहे. इमानची चेहरेपट्टीदेखील ओबामा यांच्याशी मिळतीजुळती आहे. खुद्द बराक ओबामा यांनीही इमानला दोनदा व्हाईट हाऊसमध्ये निमंत्रित करून त्याच्या कामाचे कौतुक केले होते, असे दिग्दर्शक अभिषेक शर्माने यावेळी सांगितले. ई-मेलद्वारे इमान क्रोशनशी संपर्क साधून चित्रपटात बराक ओबामांच्या भूमिकेसाठी विचारणा केली. त्यास इमानने त्वरित होकार कळवला आणि काही काळ सराव केल्यानंतर इमानची चित्रपटासाठीची निवड निश्चित करण्यात आली, असेही शर्मा पुढे म्हणाले.
‘तेरे बिन लादेन’चा हा सिक्वल येत्या २६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मनिष पॉलसह, सिकंदर खेर आणि प्रधुम्न सिंग यांच्याही भूमिका आहेत.