अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी जरी त्यांच्या नात्याबाबत अद्याप जाहीर कबुली दिली नसली तरी सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाविषयी जोरदार चर्चा होत आहे. येत्या १९ एप्रिलला मलायका-अर्जुन विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत ख्रिश्चन पद्धतीने हे दोघं लग्न करणार असल्याचं कळतंय. या सर्व चर्चांवर मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानला एका कार्यक्रमात त्याची प्रतिक्रिया विचारली गेली.
मलायकानं २०१७ मध्ये अरबाजसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर ती अर्जुनला डेट करू लागली. २०१८ मध्ये मलायका आणि अर्जुनचे मिलानमधले फोटो इंटरनेटवर लीक झाले होते. मिलानच्या रस्त्यावर हातात हात घालून फिरणाऱ्या या जोडप्याची तेव्हापासून चर्चा होती.
मलायका-अर्जुनच्या लग्नाबाबत अरबाजला प्रश्न विचारला असता त्याने जोरात हसत त्यावर उत्तर देणं टाळलं. अरबाज मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत असल्याचीही चर्चा आहे.
मलायका आणि अर्जुन दोघंही अनेकदा एकत्र पहायला मिळतात मात्र या दोघांनी कधीही आपल्या नात्याची कबुली दिली नाही. ही जोडी १९ एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकणार अशी चर्चा असली तरी दोघांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.