हे वर्ष कलाविश्वातील मंडळींसाठी लग्नसराईचं ठरलं. सोनम कपूर- आनंद अहुजा, रणवीर सिंग- दीपिका पदुकोण, कपिल शर्मा- गिन्नी छत्रथ अशा बऱ्याच सेलिब्रिटींची लग्न पार पडली. या विवाहसोहळ्यांपाठोपाठ रिसेप्शन पार्ट्या आणि त्यातील धमाल गमतीजमती चर्चेचा विषय ठरले. कॉमेडीचा बादशहा कपिल शर्माने प्रेयसी गिन्नीशी १२ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. त्यानंतर नुकतंच मुंबईत त्याने एका रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधील मित्रमंडळींसाठी कपिलने मुंबईत दुसऱ्या रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शनला रेखा, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण असे मोठेमोठे कलाकार उपस्थित राहिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कपिलच्या रिसेप्शन पार्टीत एका दुसऱ्याच जोडीला सरप्राइज मिळालं. ही जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. दीपिका आणि कपिलची खास मैत्री सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती नेहमी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावायची. त्यामुळे मित्राच्या रिसेप्शनलाही ती पतीसह आवर्जून उपस्थित राहिली.

वाचा : ‘ठाकरे’ चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात

या पार्टीत रणवीर- दीपिकासाठी कपिलने खास केक ठेवला होता आणि तो केक कापण्यासाठी त्याने दोघांनाही विनंती केली. स्वत:च्या रिसेप्शन पार्टीत आमच्यासाठी केक ठेवल्याने रणवीरनेही त्याने मन:पूर्वक आभार मानले. दीप-वीर केक कापताना गायक मिका सिंगने रणवीरचं प्रसिद्ध ‘खलीबली’ हे गाणं गायलं.

Story img Loader