प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण काय? ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ या ठिकाणी गळफास घेऊन घेऊन नितीन चंद्रकांत देसाईंनी आयुष्य संपवलं आहे. बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा डौलाने फडकत ठेवणाऱ्या या कला दिग्दर्शकाच्या आयुष्याचा असा शेवट झाल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोक कळा पसरली आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आठवणी अनेक कलाकार सांगत आहेत. अशात नितीन चंद्रकांत देसाईंच्या शेवटच्या फेसबुक पोस्टनेही लक्ष वेधलं आहे.
काय आहे नितीन देसाईंची शेवटची फेसबुक पोस्ट?
मिट्टी से जुडे हैं.. मिट्टी के लिये लडे थे.. देखिये महाराणा प्रताप की असीम बहादुरी की कहानी असं म्हणत हॉटस्टारवर येणाऱ्या आणि महाराणा प्रताप यांच्यावरील वेब सीरिजचा टिझर नितीन देसाई यांनी २६ जानेवारी रोजी पोस्ट केला होता. त्यानंतर त्यांनी कुठलीही पोस्ट त्यांच्या फेसबुकवर केलेली नाही. आज त्यांच्या मृत्यूचं वृत्त समोर आलं. त्यामुळे हीच त्यांची शेवटची फेसबुक पोस्ट ठरली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांशी नितीन देसाई यांचे चांगले संबंध होते. नितीन देसाई हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. ८० च्या दशकात नितीन देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. पुढे अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं.
नितीन देसाई यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं त्यांनी त्यांचं स्वप्न साकार केलं होतं. कला दिग्दर्शन सारख्या वेगळ्या क्षेत्रात नितीन देसाई यांनी मोलाचं काम केलं आहे. गेल्या ३० वर्षांतल्या अनेक सिनेमांच्या कलादिग्दर्शनाची धुरा नितीन देसाई यांनी सांभाळली आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे त्यांनी केले आहेत. कला दिग्दर्शन या क्षेत्राला ग्लॅमर मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
ऐतिहासिक चित्रपट आणि मालिका म्हणजे नितीन देसाई यांचे कला दिग्दर्शन आणि भव्य सेट्स हे समीकरणच बनले होते. पुढे हेच ऐतिहासिक सेट्स आणि कलात्मक वस्तू एकत्र करत त्यांनी २००५ मध्ये कर्जत येथे भव्यदिव्य एन. डी. स्टुडिओ उभारला. चित्रपटातील भव्य दिव्य सेट्सची ही अद्भुत दुनिया एन. डी. स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी सर्व सामान्यांनाही खुली करून दिली होती. चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरलेल्या नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांसारख्या मातब्बर दिग्दर्शकाबरोबर काम केले होते. राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकेबरोबरच बालगंधर्व या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती.