हृतिकचा बहुचर्चित असा ‘सुपर ३०’ चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार होता मात्र प्रदर्शनाला अवघे दोन आठवडे उरले असतानाही या चित्रपटाचा पत्ताच नाही. ‘सुपर ३०’ कंगनाच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ चित्रपटासोबत २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. पण, अजूनही या चित्रपटाचा ट्रेलर किंवा टिझर समोर आलेला नाही. या चित्रपटातील काही दृश्य चित्रीत व्हायची आहेत म्हणूनच चित्रपटाच्या प्रदर्शनास विलंब होत असल्याचं समजत आहे.
यापूर्वी ‘मी टु’ मोहीमेमुळे ‘सुपर ३०’ चे दिग्दर्शक विकास बहल वादत सापडले होते. विकास बहलवर अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. त्यामुळे काही काळ चित्रपटाचं चित्रीकरण लांबलं होतं मात्र आता आणखी एका महत्त्वाच्या कारणामुळे ‘सुपर ३०’ चं प्रदर्शन पुढे ढकललं असल्याचं समजत आहे. ‘सुपर ३०’ हा आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. ‘सुपर ३०’ साठी यापूर्वी चित्रीत करण्यात आलेली दृश्ये ही समाधानकारक नसल्याचं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे.
आनंद कुमार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात याव्यात असं दिग्दर्शकांना वाटत आहे. त्यामुळे ऐनवेळी काही दृश्य चित्रपटात घेण्यात आली आहे या सर्वकारणामुळे चित्रपटाला उशीर होत आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होईल असं म्हटलं जात आहे मात्र चित्रीकरणामुळे कदाचित ‘सुपर ३०’ च्या चित्रीकरणाला दिरंगाई होऊ शकते. मात्र यासंबधीची कोणतीही अधिकृत घोषणा अजून चित्रपटाच्या निर्मात्यांकडून करण्यात आलेली नाही.