‘शक्तिमान’ आणि ‘महाभारत’मधील भीष्म पितामह यांची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले अभिनेते मुकेश खन्ना यांनी अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रूल’ चित्रपट त्यांना कसा वाटला हे सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर या चित्रपटाबद्दल आपली मते व्यक्त केली आहेत. दिग्दर्शक सुकुमार यांनी या चित्रपटाला दिलेल्या भव्यतेचे मुकेश खन्ना यांनी कौतुक केले आहे.
‘पुष्पा २’बाबत मुकेश खन्नांचे मत
‘पुष्पा २’च्याबाबत मुकेश खन्ना म्हणाले, “कुठलाही चित्रपट केवळ पैशांनी बनत नाही, त्यासाठी योग्य नियोजन असावे लागते. ‘पुष्पा २’ तयार करण्यासाठी लावलेला प्रत्येक पैसा पडद्यावर दिसतो. चित्रपटातील भव्य दृश्य प्रेक्षकांवर प्रभाव टाकतात. जसे मनमोहन देसाई यांनी ‘अमर अकबर अँथनी’ मध्ये प्रेक्षकांमध्ये अविश्वसनीयतेची भावना निर्माण केली होती, तसेच काहीसे सुकुमार यांनी या चित्रपटात केले आहे.”
अल्लू अर्जुन शक्तिमानची भूमिका साकारू शकतो
मुकेश खन्ना यांनी अल्लू अर्जुनला ‘पुष्पा २’ साठी १० पैकी ८ ते ९ गुण दिले आहेत. त्यांनी असेही म्हटले की, “अल्लू अर्जुन ‘शक्तिमान’ची भूमिका निभावू शकतो, कारण त्याच्यात ती पात्रता आहे.”
बॉलीवूडवर टीका
यावेळी मुकेश खन्ना यांनी बॉलीवूडवरही टीका केली. त्यांनी साऊथ सिनेमाच्या संस्कृती आणि धार्मिक भावना सन्मानाने हाताळण्याच्या दृष्टिकोनाची तुलना बॉलीवूडशी केली. ते म्हणाले, “साऊथचे दिग्दर्शक धर्माचा सन्मान करतात, तर बॉलीवूड वादग्रस्त गोष्टी करून लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी धर्माचा उपहास करतो.”
‘पुष्पा २’मधील नकारात्मक बाबी
मुकेश खन्ना यांनी ‘पुष्पा २’ मध्ये तस्करी आणि कायदा व सुव्यवस्थेची अवहेलना केल्याबद्दल टीका केली. ते म्हणाले, “तस्करीचे उदात्तीकरण केले गेले आणि पोलीस यंत्रणेचा अनादर केला गेला. आपण जगाला हेच दाखवू इच्छितो का?” त्यांनी निर्मात्यांना नकारात्मक गोष्टींना प्रोत्साहन न देण्याचे आणि योग्य कंटेंट तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा…ना शाहरुख ना सलमान…; या भारतीय सेलेब्रिटींना जगभरातील लोकांनी Google वर केलं सर्वाधिक सर्च
लेखकांच्या मेहनतीची दखल
मुकेश खन्ना यांनी लेखकांना चांगले मानधन देण्यावर भर दिला. ते म्हणाले, “जर चित्रपट अपयशी ठरले तर हे अभिनेते स्वतःची फी कमी करतील का? लेखन करणाऱ्या लेखकांना त्यांचे योग्य मानधन द्यावे.”
हेही वाचा…Allu Arjun : अल्लू अर्जुन राजकारणात प्रवेश करणार का? चर्चांवर अभिनेत्याच्या टीमने दिलं स्पष्टीकरण
‘पुष्पा २’ची यशस्वी घौडदौड
‘पुष्पा २’ ने रिलीजच्या अवघ्या ६ दिवसांत १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करून मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे आणि अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे.