यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा विजेत्यांमुळे किंवा ग्लॅमरमुळे गाजला नाही, तर एका अशा गोष्टीमुळे गाजला जिची चर्चा सध्या जगभरात होत आहे. अभिनेता विल स्मिथने सोहळ्याच्या निवेदक ख्रिस रॉकला भर कार्यक्रमात जागतिक मंचावर कानशिलात लगावली. यावरून जगभरात प्रतिक्रिया उमटत आहेत. ख्रिस रॉकने जेव्हा विलच्या पत्नीवर विनोद केला, त्यानंतर विलने त्याच्या कानशिलात लगावली. पण ही घटना घडल्यावर जिच्यासाठी हे रामायण घडली, ती विलची पत्नी जाडा हिची काय प्रतिक्रिया होती?
ऑस्करसारख्या जागतिक मंचावर आपल्या पतीने आपल्यासाठी एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली, हे पाहिल्यानंतर जाडाने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्कर २०२२ सोहळ्याच्या समोर आलेल्या व्हिडीओमधून हे दिसून येत आहे की ज्यावेळी विल स्मिथ ख्रिस रॉकला कानशिलात लगावत होता त्यावेळी जाडा हसत होती. हा व्हिडीओ स्टेजच्या जवळच बसलेल्या एका व्यक्तीने शूट केला आहे.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की विल स्मिथ ख्रिस रॉकला कानशिलात लगावून परत आपल्या जागेवर येऊन बसला, त्यानंतर जेव्हा ख्रिस रॉकने त्यावर प्रतिक्रिया दिली तेव्हा जाडा अगदी मोठ्याने हसताना दिसली.
या घटनेनंतर विल स्मिथने आपल्या कृत्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. विल स्मिथने अवघ्या काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे विल स्मिथने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. यावर विल स्मिथ म्हणाला, “कोणत्याही स्वरूपात होणारी हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातील मी केलेले वर्तन हे पूर्णपणे अस्वीकार्य आणि अक्षम्य होते. माझी मस्करी करणं किंवा माझ्या कामाची खिल्ली उडवणं ठीक होतं पण जॅडाच्या वैद्यकीय स्थितीची खिल्ली उडवल्यानंतर सहनशक्तीचा अंत झाला आणि मी भावनेच्या भरात ते पाऊल उचलले.”