महाराष्ट्राच्या हास्याच्या परंपरेत एका ऐतिहासिक आणि मानाच्या क्षणाची नोंद लवकरच होणार आहे. येत्या ९ मे २०२५ रोजी, विदर्भातील ( नागपूर ) नेहा ठोंबरे, जिला अवघा महाराष्ट्र ‘ठोंबरे बाई’ या नावाने म्हणून ओळखतो, ती लंडनच्या प्रतिष्ठित रंगमंचावर आपल्या विनोदी शैलीने आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.
१ मे रोजी असलेल्या महाराष्ट्र दिनाच्या आणि ४ मे रोजीच्या जागतिक हास्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी महाराष्ट्रासाठी अधिकच आनंददायी आणि गौरवाची आहे. महाराष्ट्रातील पहिली महिला विनोदी कलाकार म्हणून लंडनमध्ये परफॉर्म करण्याची नेहाला मिळालेली ही संधी संपूर्ण भारतीय कलाविश्वासाठी अभिमानास्पद आहे.
नेहा ठोंबरेने आपल्या खास विदर्भीय ढंगातील आणि अस्सल विनोदी अंदाजाने महाराष्ट्रातील प्रत्येक घरात हक्काचं स्थान मिळवलं आहे. सामाजिक विषयांवरील तिचं मार्मिक आणि खुमासदार भाष्य, तसेच दैनंदिन जीवनातील गमती जमतींना सहज सोप्या भाषेत विनोदी अंदाजात सादर करण्याची तिची कला रसिकांना नेहमीच आवडली आहे. ‘ठोंबरे बाई’ याच नावाने नेहा अधिक लोकप्रिय आहे.
या ऐतिहासिक संधीबद्दल बोलताना नेहा सांगते, “लंडनमध्ये परफॉर्म करणं हे माझं स्वप्न होतं आणि ते आता प्रत्यक्षात उतरत आहे याचा मला खूप आनंद आहे. माझ्या महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील आणि नागपूरमधील माझ्या तमाम रसिक मायबापांनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिलं आणि त्यांच्या याच पाठिंब्यामुळे आज मी हे यश मिळवू शकले आहे. लंडनच्या रंगमंचावर मी माझ्या महाराष्ट्राची आणि भारतीय विनोदाची पताका फडकवणार आहे. ‘ठोंबरे बाई’ म्हणून मला तिथेही तेवढंच प्रेम मिळेल, अशी माझी नम्र अपेक्षा आहे.”
९ मे २०२५ रोजी लंडनमधील एका नामांकित नाट्यगृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून, लंडनमधील मराठी बांधवांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण आहे. नेहा ठोंबरे ( ठोंबरे बाई ) हिने आपल्या अनोख्या हास्यशैलीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेलं हे यश खरंच कौतुकास्पद आहे.