खरं तर आपल्या नेहमीच्या गरजांचाही स्तर वाढला आहे. आणि मग त्या वाढीव स्तरांतील गरजा पूर्ण करणं हेच अनेकांच्या आयुष्याचं स्वप्न होऊन जातं. त्या स्वप्नांच्या पाठी धावताना आशा-निराशा, संकटं-आनंद, कधी हुलकावणी हा प्रवास आज प्रत्येकाच्या आयुष्यात थोडय़ाफार फरकाने तसाच असतो. तरीही प्रवासाला निघताना जसं, अरे! गाणी ऐकत जाऊया तेवढीच मजा येईल, अशा तयारीने आपण निघतो. त्याच भावनेने जगण्याच्या प्रवासात कष्टपूर्वक, कुठलीही लबाडी न करता पुढे जाणाऱ्यांनाही यश मिळतं आहे याची जाणीव जेव्हा इतरांच्या अनुभवातून मिळते तेव्हा एक नवं बळ आणि ऊर्जा आपल्याला मिळते. ही ऊर्जा देण्याचं काम अमित आणि मंजिरी नाईक या जोडप्याच्या ‘डबल सीट’ने केलं आहे. ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात आल्यावर दिग्दर्शक समीर विद्वांस, अभिनेता अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे, वंदना गुप्ते आणि निर्माते निखिल साने यांनी पुन्हा पुन्हा या आपल्या माणसांच्या गोष्टीवर भर दिला आहे.
प्रत्येक माणूस हा मध्यमवर्गीयच असतो. आपण कुठून तरी खालच्या स्तरापासून प्रयत्न करतो आणि मग वर चढत जातो. पण, तुम्ही कितीही उंच स्तरावर गेलात तरी तुम्हाला आणखी पुढे जायची इच्छा असते. त्यामुळे इथे मध्यमवर्गीय म्हणजे ज्याला नेहमीच वरच्या वर्गात जायची इच्छा असते असा अर्थ घ्यायला हवा. ही त्या माणसांची गोष्ट आहे. जी माणसं स्वप्न बघतात, एखादी इच्छा व्यक्त करतात. एखादं ध्येय समोर ठेवून पुढे जायचा प्रयत्न करतात त्यांची ही गोष्ट आहे.  ‘डबल सीट’ चित्रपटात अमित नाईकची जी कथा आहे ती मीही अनुभवली आहे. मी लालबाग-परळ भागात, चाळीतच लहानाचा मोठा झालो. तेव्हापासून ते आत्ताचं जे यश इथवरचा प्रवास हा अमितच्या कथेसारखाच होता. पण, आत्तापर्यंत मी जे अनुभवलं त्याला मी ‘संघर्ष’ म्हणत नाही. मी नेहमी आत्ता काय करायचं आहे याचा विचार करतो. वर्तमानात जगणं, आत्ता माझ्या कुटुंबाला मला काय द्यायचं आहे हे अमितच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तेच माझंही आहे. समीरने ‘डबल सीट’ चित्रपटाविषयी सांगितलं. काहीतरी वेगळं आहे याची जाणीव झाली. त्यांनी कथा ऐकवल्यावर ती अप्रतिम होती.  क्षितिज पटवर्धन आणि समीर विद्वांस या दोघांचाही लिखाणाच्या बाबतीत हातखंडा आहे. म्हणजे त्यांची कथा ऐकल्यानंतर माणूस त्या कथेच्या प्रेमातच पडतो. तो नाही म्हणू शकत नाही. मला धोका पत्करणं गरजेचं होतं. एकतर मराठी प्रेक्षकांना चांगली गोष्ट आवडते. आमच्या चित्रपटाची गोष्टच ‘हिरो’ आहे. त्यामुळे ती प्रेक्षकांना आवडणार याची खात्री झाल्यानंतर मला कुठलीच अडचण नव्हती. मग त्यात मुक्ता, वंदना गुप्ते आणि विद्याधरसारखी अभिनयातली ‘बाप’ मंडळी बरोबर असल्यावर मला वाटतं माझ्यासाठी म्हणून हा धोका फायदेशीरच ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Those who fight for improvment they are middle class