मुंबईतील अंधेरी परिसरातून एका ॲडल्ट फिल्मचे शूटिंग आणि त्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या तीन कलाकारांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन अभिनेत्री आणि एका अभिनेत्याचा समावेश आहे. हे कलाकार ‘पिहू’ नावाच्या ॲपसाठी ॲडल्ट फिल्मचे लाईव्ह स्ट्रीमिंग करत होते. कारवाईनंतर पोलिसांनी हे ॲप प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहे.
हेही वाचा- “२४ तासांच्या आत…”, रश्मिका, कतरिनाच्या डीपफेक व्हायरलनंतर केंद्राचे सोशल मीडियाला आदेश!
वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये अनुक्रमे २० आणि ३४ वर्ष वयोगटातील दोन अभिनेत्री आणि २७ वर्ष वयोगटातील एका अभिनेत्याचा समावेश आहे. हे तिघे ‘पिहू’ या सबस्क्रिप्शनवर आधारित ॲपवर अश्लील व्हिडिओचे लाईव्ह स्ट्रीमिंग करत होते. तसेच त्यांचे अश्लील ऑडिओ आणि व्हिडिओ पोस्टही करत होते.
काही आठवड्यांपूर्वी अंधेरी पश्चिम परिसरात या ॲपवर आक्षेपार्ह व्हिडीओचे शूटिंग आणि लाइव्ह स्ट्रिमिंग दाखवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी पोलिसांनी अंधेरेतील चार बंगला परिसरात छापा टाकत आरोपींना रंगेहात पकडले.
ॲपच्या वापरकर्त्यांना इंस्टाग्रामवर मेसेजद्वारे या लाईव्ह स्ट्रीमिंगची माहिती दिली जात होती. याशिवाय वापरकर्त्यांना ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलसारख्या सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यासाठी युजर्सना नोंदणी शुल्कासह ७५०० रुपये जमा करायला सांगण्यात आले होते. तसेच प्रत्येक व्ह्यूसाठी, ऑडिओ कॉल आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी त्यांना आगाऊ पैसे द्यावे लागतील असे सांगण्यात आले होते.