मराठी रंगभूमीवर संपूर्ण नाटक तुरुंग वा पोलीस स्टेशनमध्ये घडलंय असं सहसा झालेलं नाही. श्रीचिंतामणी निर्मित, संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘मायलेकी’मध्ये ते पाहायला मिळतं. ‘मायलेकी’ची नायिका माधवी सावंत हीच मूळात तुरुंग अधीक्षिका असल्यानं तिच्याभोवतीच फिरणारं कथानक स्वाभाविकपणे तुरुंग परिसरातच घडतं. स्त्रीचं पराकोटीचं शोषण आणि तिचं सामथ्र्य यांचं स्तिमित करणारं दर्शन या नाटकात घडतं.
माधवी सावंत ही मुंबईतल्या क्वार्टर रोड तुरुंगाची अधीक्षिका. स्वच्छ, प्रामाणिक, कठोर शिस्तीची आणि कणखर प्रशासक अशी तिची प्रतिमा आहे. अशा कर्तव्यदक्ष तुरुंगाधिकाऱ्याला पोलीस यंत्रणेतील भ्रष्ट सहकारी आणि राजकारणात बरबटलेले वरिष्ठ कसे कोंडीत पकडू पाहतात; त्याचबरोबर तुरुंगातलं सडलेलं, किडलेलं वातावरण, माफिया कैद्यांचं भयावह साम्राज्य, तुरुंगातूनही चालणाऱ्या त्यांच्या कारवाया आणि भ्रष्ट पोलिसांची त्यांना मिळणारी साथ या साऱ्याचं भीषण, विदारक दर्शन ‘मायलेकी’त घडतं.
माधवी तिची आई शेवंताक्का हिच्यासोबत ऑफिसशेजारच्याच क्वार्टर्समध्ये राहते. काही वर्षांमागे कोल्हापुरातील सर्जेराव पाटलाशी तिचं लग्न झालेलं असतं. परंतु गुंड प्रवृत्तीच्या, पैशांचा प्रचंड माज असलेल्या, असंस्कृत, पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या सर्जेरावाचा मानसिक-शारीरिक छळ असह्य़ होऊन ती घर सोडते आणि शिक्षण पूर्ण करून पोलीस सेवेत भरती होते. फॅमिली कोर्टात तिनं सर्जेरावविरुद्ध घटस्फोटासाठी अर्ज केलेला असला तरी अद्यापि तिला घटस्फोट मिळालेला नाही. कारण सर्जेराव कोर्टाच्या नोटिसांना भीक घालत नाही. पण एकतर्फी घटस्फोटाची शेवटची नोटीस जेव्हा त्याच्या हाती पडते, तेव्हा मात्र चवताळून तो माधवीला भेटायला येतो. ‘पुरुषानं स्त्रीला सोडचिठ्ठी द्यायची पद्धत आमच्यात आहे. स्त्री पुरुषाला सोडचिठ्ठी देऊ शकत नाही!’- असं म्हणत तो माधवीला धमकावतो की, ‘तसा प्रयत्न करशील तर तुझी भररस्त्यात मी नग्न धिंड काढेन.’ त्यावर माधवीही त्याला ठणकावून सांगते की, ‘आता कोर्टातच याचा काय तो निकाल लागेल.’ तेव्हा पाय आपटत सर्जेराव निघून जातो.
दुसरीकडे तुरुंगातील गुंडांच्या हाणामाऱ्यांनीही ती संत्रस्त असते. अपुऱ्या कर्मचाऱ्यांनिशी ही अराजकसदृश्य परिस्थिती हाताळणं तिला जड जात असतं. तिनं जादा कर्मचाऱ्यांची मागणी करूनही डीआयजी सुदामराव जाधव तिच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावतात. वर- तुरुंगातील कैद्यांमधील बेबनावाला तिचं पक्षपाती वर्तनच कारणीभूत असल्याचा ठपका ते तिच्यावर ठेवतात. तुरुंगात अशांतता निर्माण करणाऱ्या काही कैद्यांना, त्याचबरोबर काही कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्यांचाच आशीर्वाद असल्याचा माधवीला रास्त संशय असतो. ती तसं बोलूनही दाखवते. परंतु वरिष्ठ असल्याचा फायदा घेत ते तिला उडवून लावतात. तीही कच्च्या गुरूची चेली नसते. तिनंही त्यांच्या कारनाम्यांची फाइल तयार केलेली असतेच. तुरुंगातल्या कैद्यांना हाताशी धरून ते एका निरपराध कैद्याला बेदम मारहाण करवतात आणि त्या प्रकरणात गोवून माधवीविरुद्ध ते खात्यांतर्गत चौकशीचा ससेमिरा लावतात आणि तिच्या निलंबनाचीही तजवीज करतात.
त्याचवेळी सर्जेराव तिनं पोटगीदाखल मागितलेल्या इस्टेटीतील अध्र्या वाटय़ामुळे हिरवापिवळा होऊन तिला जाब विचारायला येतो. अर्वाच्य शिवीगाळ करून तो तिला मारहाण करतो. या अश्लाघ्य प्रकारानं तळपायाची आग मस्तकाला गेलेली शेवंताक्का सर्जेरावला माधवीच्या पिस्तुलनं गोळ्या घालते..  
माधवीच्या आयुष्याशीच समांतर असं तिची मैत्रीण रुक्साना हिचंही दु:सह वैवाहिक आयुष्य आहे. रुक्सानाची सासू तिच्या मुलाला तिच्यापासून तोडू बघतेय. नवरा अस्लम त्याबद्दल ब्र काढत नाही. तो बाहेर बारबालेवर पैसे उधळत असो. त्याचवेळी तो देशद्रोही कारवायांमध्येही गुंतला असल्याचा रुक्सानाला संशय असतो. ती याबद्दल अस्लमला खडसावून विचारते. तेव्हा तो तिच्या अंगावर धावून येतो आणि तिला मारझोड करतो. त्याच्या तावडीतून सोडवून गर्भार रुक्सानाला माधवी आणि शांताक्का तिला आपल्या घरात आश्रय देतात. तिचं बाळंतपण करतात.
शांताक्काचीही एक व्यथावेदनांनी भरलेली कहाणी आहे. नवऱ्यापश्चात तिच्या वाईट दिवसांत रुक्सानाचे प्रेमळ आई-वडीलच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकलेले असतात. त्यातूनच रुक्साना त्यांच्या घरातलीच एक झालेली असते.
लेखक संजय कृष्णाजी पाटील यांनी दोन पातळ्यांवर नाटकाचं कथानक खेळवलं आहे. माधवीला एकीकडे आपल्या नोकरीतले भ्रष्ट सहकारी तसंच वरिष्ठ अधिकारी, शासन-प्रशासनातील गलिच्छ राजकारण, तुरुंगातील अव्यवस्था, अपुरे मनुष्यबळ, माफिया गुंडांची शिरजोरी, त्यांचा उपद्रव आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची त्यांना असलेली साथ- या सगळ्याला तोडं द्यावं लागतं; तर दुसरीकडे तिला सर्जेरावसारख्या माजलेल्या डुकराशी दोन हात करावे लागतात. साधारण हेच प्राक्तन रुक्सानाच्याही वाटय़ाला आलेलं आहे. अशी दोन भिन्न आशयकेंद्रं असलेलं नाटक लिहिताना लेखकाला चांगलीच कसरत करावी लागते. त्यात आणखीन त्यात स्त्रीवादी विचारांचं आरोपण करायचं! एकाच वेळी हे सारं साधताना संजय पाटील यांना नक्कीच प्रयास पडले आहेत. सिनेमातंत्रात ते सहज शक्य होतं. परंतु नाटकात स्थल-कालाच्या मर्यादेमुळे ते अवघड होतं.
राजन भिसे यांच्या लवचिक नेपथ्याने काही अंशी हा प्रश्न सोडवला असला तरी माधवीच्या संदर्भातले व्यक्तिगत प्रसंगही तिच्या कार्यालयातच घडत असल्यानं ते खटकत राहतं. शेवंताक्का आणि रुक्सानाचा माधवीच्या कार्यालयातला घरगुती वावरही न पटणाराच. असो. मात्र, नाटकातल्या सर्वच व्यक्तिरेखा अत्यंत ठाशीव आणि सुस्पष्ट उतरल्या आहेत. सुरुवातीला ‘रुक्साना प्रकरणा’चा नीट अर्थबोध होत नसला तरी पुढे तो गुंता आकळतो. अस्लमचे बाहेरचे ‘धंदे’ संदिग्ध ठेवले असले तरी तो देशविघातक कृत्यामध्ये गुंतला असावा असं सूचित केलेलं आहे. त्याचबरोबर तुरुंगातील भिन्नधर्मीय कैद्यांमधील तेढही अशीच सूचकतेनं दाखवली आहे. त्यामागचं प्रयोजन कळत नाही. स्त्रीवादी दृष्टिकोनातून यातल्या स्त्रियांच्या व्यथा-वेदना लेखकानं रेखाटल्या आहेत. हाच ‘फोकस’ नाटकाच्या रचनेतही आढळतो. डीआयजी जाधवांच्या वागण्यातही पुरुषी उन्माद जाणवतो. तो ठेचण्याचा माधवीचा इरादा गैर नाही. शेवंताक्काची कहाणी सांगण्यासाठी लेखकाला घ्यावा लागलेला निवेदनाचा आधार योग्य नाही. ते ठिगळासारखं येतं. सर्जेरावची अर्वाच्य आणि शेवंताक्काची म्हणीयुक्त कोल्हापुरी बोली, त्यांचं उच्चारण, त्यातला ठोसपणा, तसंच अस्लमची रांगडी भाषा यांतली सूक्ष्मता संजय पाटील यांनी उत्तमरीत्या पेलली आहे.  
दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी ‘मायलेकी’ची स्त्रीवादी मांडणी समजून घेत त्याचं रंगमंचीय सादरीकरण केलं आहे. ठसठशीत व्यक्तिरेखाटन हा या नाटकाचा विशेष आहे. घटना-प्रसंगांमधलं ‘नाटय़’ अत्यंत टोकदारपणे बाहेर काढण्यात लेखकाला यश आलं आहे. डीआयजी जाधव आणि माधवी यांच्यातलं वाक्युद्ध मात्र काही प्रसंगी ‘काळ्या-पांढऱ्या’त जमा होणारं असलं तरी ते परिणामकारकरीत्या मंचित होतं. प्रकाशयोजनेद्वारे सोहोनींनी ते अधिक दुधारी केलं आहे. काही प्रसंगांत पात्रांची भाऊगर्दी आशय पोचवण्यात अडथळा आणते. विशेषत: कैद्यांच्या प्रसंगांत! लेखकाला जे बरंच काय काय म्हणायचंय ते रंगमंचीय अवकाशात साकारण्याची दिग्दर्शकानं शर्थ केली आहे. राहुल रानडे यांच्या पाश्र्वसंगीताने नाटकाच्या परिणामकारकतेत मोलाची भर घातली आहे. अमिता खोपकर यांची वेशभूषा आणि सचिन जाधव यांच्या रंगभूषेनं पात्रांना त्याचं त्याचं असं विशिष्ट ‘व्यक्तिमत्त्व’ बहाल केलं आहे.
शर्मिष्ठा राऊत-निपाणकर यांनी धारदार संवादोच्चार आणि तीक्ष्ण मुद्राभिनयातून माधवीचं निर्धारी, कणखर रूप यथार्थतेनं उभं केलं आहे. सर्जेरावबरोबरच्या काही प्रसंगांतली तिची हतबलता मात्र खटकते. माधवीचं कैद्यांना केलेली मारहाण मात्र शर्मिष्ठा राऊत यांची नाजूक शरीरयष्टी पाहता हास्यास्पद वाटते.
त्याऐवजी त्यांनी नुसत्या शब्दांच्या जरबेत त्यांना रोखलं तर ते समजू शकतं. डीआयजी जाधव एकदा तिच्यावर व्यक्तिगत जीवनातील वैफल्याचा राग ती कैद्यांवर काढत असल्याचा आरोप करतात. एका बेभान क्षणी माधवी तो खरा ठरवते. किरण माने यांचा सर्जेराव अस्सल, रांगडा कोल्हापुरी गडी आहे. पैसा आणि सत्तेने माजलेला, पुरुषप्रधान मानसिकतेचा अर्क असलेला, असंस्कृत, गावठी गुंड त्यांनी जोशपूर्ण वठवला आहे. किरण खोजे यांनी रुक्सानाची तडफड, तिची व्यथा आणि सात्विक संताप आतडय़ातून व्यक्त केला आहे. अमिता खोपकर यांनी बोचरी नजर आणि चपखल, अर्थवाही गावरान म्हणींशिवाय एक वाक्यही न उच्चारणारी शेवंताक्का भक्कमपणे उभी केली आहे. डॉ. विलास उजवणे डीआयजी जाधवांच्या भूमिकेत एकदम फिट्ट आहेत. हृदयनाथ जाधव यांनी वाममार्गी अस्लम त्याच्या उपद्रवमूल्यांसह चोख रंगवला आहे. अन्य कलाकारांनीही आपली कामं यथास्थित केली आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा