बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘हिरोपंती २’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री तारा सुतारियासोबत दिसणार आहे. टायगर श्रॉफचा अॅक्शन अवतार पुन्हा एकदा या चित्रपटात देखील पाहायला मिळणार असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत बरीच उत्सुकता आहे. सध्या दोन्ही कलाकार चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहेत. अशातच टायगर श्रॉफचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये टायगरची चाहती बेशुद्ध झाल्याचं दिसत आहे.
टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांनी नुकतंच त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन मुंबईमध्ये केलं. त्यावेळी या दोघांना भेटण्यासाठी अनेक चाहते प्रमोशनच्या ठिकाणी पोहोचले होते. त्यावेळी टायगरची एक चाहती त्याला पाहून अचानक बेशुद्ध झाली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात काही लोक त्या मुलीला आधार देताना आणि पाणी प्यायला देताना दिसत आहेत. त्यानंतर टायगर स्वतः तिला स्टेजवर बोलवलं. व्हिडीओमध्ये तो तिच्या डोक्यावर हात फिरवून तिची आपुलकीनं चौकशी करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ बराच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर अनेक युजर्सनी त्यावर कमेंट केल्या आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओनंतर टायगर श्रॉफवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पण काही युजर्स मात्र या व्हिडीओवर मजेदार कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये ‘बच्ची हो क्या’ हा टायगर श्रॉफचा डायलॉग लिहिला आहे. तर काही युजर्सनी ‘सेलिब्रेटींना भेटण्याची निंजा टेक्निक’ असं म्हणत त्या मुलीची खिल्ली उडवली आहे.
आणखी वाचा- यशला KGF करायचा नव्हता हिंदी भाषेत प्रदर्शित पण… वाचा नेमकं काय घडलं
दरम्यान टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती’ हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटातून त्यानं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता त्याचा ‘हिरोपंती २’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ तारा सुतारिया यांच्यासोबतच नवाझुद्दीन सिद्दीकी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.