सोशल मीडियावर तरुणाईमध्ये टिकटॉक व्हिडिओची फार क्रेझ आहे. अभिनयाचे, डान्सचे किंवा इतर व्हिडिओ टिकटॉकच्या अॅपवर पब्लिश केले जातात. याच टिकटॉक व्हिडिओमुळे प्रकाशझोतात आलेली मृणालिनी रवी हिला आता एका चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. दाक्षिणात्य चित्रपट ‘सुपर डिलक्स’मध्ये तिला मुख्य भूमिकेची ऑफर मिळाली असून हरीश शंकर दिग्दर्शित ‘वाल्मिकी’ चित्रपटातही ही मुख्य भूमिका साकारणार आहे.
‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार, अनेक मुलींचं ऑडिशन या भूमिकेसाठी घेण्यात आलं होतं. या चित्रपटासाठी बऱ्याच तेलुगू लघुपटांतील अभिनेत्रींचंही ऑडिशन घेण्यात आलं होतं. पण अखेर मृणालिनीला ही भूमिका मिळाली. चित्रपटात ती लक्ष्मी मेनन यांची भूमिका साकारणार आहे आणि यासाठी निर्मात्यांना त्यांच्यासारखी थोडीफार दिसणारी अभिनेत्री हवी होती. या चित्रपटातून मृणालिनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
‘टिकटॉक’वर मृणालिनीचे व्हिडिओ फार प्रसिद्ध आहेत. तिच्या व्हिडिओजना भरभरून लाइक्स आणि कमेंट्स मिळतात. तर टिकटॉक अॅपवर तिच्या फॉलोअर्सची संख्यासुद्धा जास्त आहे.