सोशल मीडियावर फन बास्केट भार्गव या नावाने प्रसिद्ध असलेल्या टिकटॉक स्टारला अटक करण्यात आली आहे. भार्गवने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर येत आहे.

आंध्र प्रदेश पोलिसांनी भार्गववर कारवाई केली आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भार्गवचे मूळ नाव चिप्पाडा भार्गव असं आहे. भार्गवने पीडित मुलीला तिचे टिकटॉक व्हिडिओ पाहून तिला प्रपोज केलं. मात्र तिने त्याचा प्रस्ताव धुडकावला होता. भार्गवने तुझे आक्षेपार्ह व्हिडिओ माझ्याकडे आहेत असं सांगून तिला ब्लॅकमेल केलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेम काजल यांनी दिली.

पीडित मुलीच्या पालकांनी विशाखापट्टणममधल्या पेंढुर्ती पोलीस स्थानकात भार्गवविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. ही पीडित मुलगी १४ वर्षांची असून आता चार महिन्यांची गरोदर आहे.

ओ माय गॉड गर्लसोबतचे त्याचे व्हिडिओ प्रसिद्ध आहेत. ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत असतात. त्याचे भरपूर फॉलोवर्स आहेत. भार्गवला ३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची कार आणि मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्याचबरोबर पीडितेचे फोटो सोशल मीडियावर वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

Story img Loader