‘वेळ कोणासाठी थांबत नाही’ तसेच ‘गेलेली वेळ परत कधीच येत नाही’ म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या आपल्या सगळ्यांनाच कधी चांगल्या तर कधी वाईट वेळेशी सामना करावा लागला आहे. वेळ चुकली की पुढच्या सगळ्या गोष्टी विस्कळीत होतात हा आत्तापर्यंतचा बहुदा सगळ्यांनीच घेतलेला अनुभव… हाच विषय थोड्या हटक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक राहुल भातणकर यांनी केला आहे.
भन्नाट व्यक्तिरेखा, रोमांचकारी स्टंटस, प्रेमकहाणी आणि विनोदाचा मनोरंजक तडका असा सगळा मसाला असणारा ‘टाईम बरा वाईट’ हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. चित्रपटातील नायक राहुल आणि नायिका प्रिया यांच्याभोवती गुंफण्यात आलेली ही कथा एका वेळेवर येऊन थांबते. संध्याकाळी पाच वाजता नक्की काय होणार आहे…? नेमकं कोणतं रहस्य या वेळेत दडलंय…? आणि मुख्य म्हणजे ही वेळ कोणासाठी चांगली व कोणासाठी वाईट असणार…? हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. संकलक म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या राहुल भातणकर यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा असून त्यांनी या चित्रपटाचे वेगवान संकलनही केले आहे. या चित्रपटात भूषण प्रधान, संजय मोने, आनंद इंगळे, सतीश राजवाडे,ऋषिकेश जोशी, सिद्धार्थ बोडके, विश्वजीत प्रधान, सुनील पेंडुरकर, नुपूर दुधवडकर, राजेश भोसले आदी कलाकारांसोबतच दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्री निधी ओझा हीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
‘टाईम बरा वाईट’मध्ये एकूण चार गाणी असून साऊथच्या तडक-भडक बिट्सचा आनंद मराठी रसिकांना याद्वारे घेता येईल.चित्रपटात ‘कादल स्नेहम मोहोब्बत’, ‘दौडा दौडा’, ‘तूतिया’ आणि ‘वाऱ्याचे गुणगुणतो गाणे’ यांसारखीविविध धाटणींची गाणी असून मंदार चोळकर आणि अभिषेक खानकर लिखित या गीतांना हृषीकेश रानडे, अजित परब आणि आदर्श शिंदे यांचा स्वर लाभला आहे. फाईटमास्टर प्रद्युम्न कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवान कथानकाला साजेशी साह्स्दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत.  वी. आर. जी. मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत’टाईम बरा वाईट’ हा नवा थ्रिलर अॅक्शनपट येत्या १९ जूनला प्रदर्शित होत आहे.

Story img Loader