मराठी चित्रपटांमध्ये निरनिराळ्या चित्रपट प्रकारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचे उदाहरण म्हणून ‘टाइम बरा वाईट’ हा चित्रपट म्हणता येईल. परंतु, मूळ जर्मन चित्रपटावरून बेतलेल्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या दिग्दर्शकावरील प्रभावामुळे हा चित्रपट थोडा बरा आणि बराच वाईट ठरतो. मध्यांतरानंतर घटनाप्रसंगाची उकल होताना चित्रपट वेगाने जात असताना मध्यांतरापूर्वीच्या घटनांचा अर्थ समजत जातो. मात्र मध्यांतरापूर्वी प्रेक्षकाला खिळवून ठेवता येईल असा प्रयत्न सादरीकरणात करण्यात दिग्दर्शक अयशस्वी ठरला आहे. किमान माफक मनोरंजन चित्रपटाच्या उत्तरार्धातील घटनाप्रसंगामुळे होते. मात्र या चित्रपट प्रकाराचा उत्तम सिनेमा बनविण्याची संधी चित्रपटकर्त्यांनी गमावली याची खंतही वाटत राहते.
‘काळ आला होता, पण.. वेळ आली नव्हती.’ अशी उक्ती आहे. शीर्षकावरूनच चित्रपटात माणसाच्या आयुष्यात वेळ चांगली-वाईट असते. जेव्हा ती वाईट असते तेव्हा सगळी संकटं समोर उभी राहतात आणि मार्ग काढता येत नाही. जेव्हा अनपेक्षित घटनांमुळे माणसाची परिस्थिती बदलते किंवा सुधारते तेव्हा एखाद्याच्या आयुष्यात बरे दिवस येऊ शकतात हे चित्रपट सुचवितो. मूळ जर्मन चित्रपटाच्या मध्यवर्ती संकल्पनेतून प्रेरित झालेल्या दक्षिण भारतीय चित्रपटावर मराठीत चित्रपट करताना चित्रपटकर्त्यांनी दाक्षिणात्य तोंडवळा तसाच ठेवला आहे. त्यामुळे यातील प्रमुख व्यक्तिरेखांपैकी काही व्यक्तिरेखा तद्दन दाक्षिणात्य चित्रपटातील आहेत त्या मराठी नाहीत हे प्रेक्षकाला लगेच समजते. टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी डब आवृत्ती पाहण्याची सवय प्रेक्षकाला जडली आहे हे चित्रपटकर्ते कदाचित विसरले असावेत.
नोकरीच्या शोधात असलेला राहुल हा या चित्रपटाचा नायक आहे. पहिल्याच चित्रचौकटीत राहुल आपला ‘टाइम’ कसा वाईट चाललाय याचे कथन करतो. अनुभवाअभावी नोकरी मिळत नसल्याने बहिणीच्या विवाहासाठी तो भाईराजा नावाच्या चिरकुट गुंडाकडून कर्ज काढतो आणि त्यात बहिणीचे लग्न लावून देतो. राहुलचा मित्र आशू याच्या मदतीने कर्ज मिळते आणि त्याच्याच मदतीने दरमहा कर्ज परतफेड राहुल करत असतो. शेवटच्या हप्त्याचे मुद्दलासहित पैसे राहुल मित्राकडून घेतो आणि भाईराजाला देण्यासाठी निघतो आणि अनपेक्षित घटना घडतात. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत काहीही झाले तरी ५० हजार रुपये मिळालेच पाहिजेत असा दम भाईराजा देतो. संध्याकाळी पाच वाजण्याची डेडलाइन नायकाचे आयुष्य बदलून टाकते.
कशाचेही सोंग आणता येते, पण पैशाचे सोंग आणता येत नाही हे आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना पुरते कळून चुकलेले सत्य हाच खरे तर या चित्रपटातील महत्त्वाचा मुद्दा आहे. संध्याकाळी पाच वाजण्याच्या डेडलाइनच्या आधी आणि नंतर घडणाऱ्या घटनांमध्ये दडलेले कुतूहल यामुळे हा चित्रपट रंजक ठरतो. मात्र, मध्यांतरापूर्वी राहुल, त्याची प्रेयसी प्रिया, तिचे वडील जोशी, भाईराजा, पोलीस इन्स्पेक्टर विठू पोपट अशा सगळ्या व्यक्तिरेखा, घटना प्रसंग यांची मांडणी खूप कंटाळवाणी झाली आहे. मध्यांतरानंतर मात्र चित्रपट वेग घेतो. मध्यांतरापूर्वीच्या प्रसंगांचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतानाही काही काही ठिकाणी फ्लॅशबॅक तंत्राचा अतिवापर दिग्दर्शकाने केला आहे. उत्तम संकलकाने प्रथमच दिग्दर्शनात पाऊल ठेवताना विषयाची निवड निश्चितच चांगली केली असली तरी दिग्दर्शनाचा अभाव आणि मूळ चित्रपटापेक्षा त्याच्या दाक्षिणात्य आवृत्तीचा प्रभाव या चित्रपटाला मारक ठरला आहे. भाईराजा या व्यक्तिरेखेतील सतीश राजवाडे आणि पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेतील हृषीकेश जोशी यांनी धमाल केली आहे. भूषण प्रधानने राहुल ही नायकाची भूमिका बेतास बात साकारली आहे.
टाइम बरा वाईट
निर्माता – विजय गुट्टे
दिग्दर्शक – संकलक – राहुल भातणकर
कथा – पटकथा – अल्फान्सो पुत्रण, राहुल भातणकर
संवाद – राजेश कोळंबकर, राहुल भातणकर
संगीत – अजित-समीर
कलावंत – भूषण प्रधान, संजय मोने, सतीश राजवाडे, निधी ओझा, आनंद इंगळे, नूपुर दुधवडकर, राजेश भोसले, हृषीकेश जोशी, भाऊ कदम, सिद्धार्थ बोडके, विश्वजीत प्रधान, सुनील पेंडुरकर व अन्य.
माफक मनोरंजन
मराठी चित्रपटांमध्ये निरनिराळ्या चित्रपट प्रकारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचे उदाहरण म्हणून ‘टाइम बरा वाईट’ हा चित्रपट म्हणता येईल.
First published on: 21-06-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Time bara vait movie review