हिंदी चित्रपटांप्रमाणे लोकप्रिय प्रीक्वेलच्या पुण्याईवर अवलंबून आखीव-रेखीव गणित मांडून सीक्वेल काढणे आणि तो हमखास यशस्वी होणे हा प्रकार मराठी चित्रपटांमध्ये आलेला नाही. ‘टाइमपास २’ या चित्रपटाद्वारे चित्रपटकर्त्यांनी सीक्वेल काढून प्रीक्वेलची पुण्याई गल्लापेटीवर पुन्हा एकदा हमखास यशस्वी ठरेल हा होरा ठेवूनच सीक्वेलची निर्मिती केली आहे. त्यासाठी लेखक-दिग्दर्शकांनी सावधगिरी बाळगून गल्लापेटीवर लक्ष ठेवून दिग्दर्शन केले आहे. दगडू आणि प्राजक्ता या नव्या चित्रपटात मोठे झाले असले तरी लहानपणीच्या दगडू-प्राजक्ता यांना पुन्हा पाचारण करून पहिल्या चित्रपटाची लोकप्रियता ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेमकथापटांमध्ये भारतीय प्रेक्षकांना प्रेमी जिवांची कहाणी अधुरी राहिलेली रुचत नाही. हे गृहीतक मान्य केले तर अधुरी कहाणी पूर्ण करण्यासाठी चित्रपटकर्त्यांनी सीक्वेल केला आहे. प्रमुख कलावंतांची उत्तम निवड, उत्तम चित्रीकरण यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.
दगडू-प्राजक्ताचे प्रेम पहिल्या चित्रपटात शाकालमुळे अयशस्वी ठरले होते. सीक्वेलमध्ये मोठे झालेले दगडू आणि प्राजक्ता दोघांचेही विश्व पूर्णपणे निराळे आणि दोघे एकमेकांपासून खूप दूर गेलेले आहेत. दरम्यान वस्तीत सगळ्यांचा लाडका बनलेल्या, परोपकारी दगडूच्या मनातून प्राजक्ता दूर गेलेली नाही. दगडूच्या वाढदिवशी समुद्रकिनाऱ्यावर बसून मित्रांसोबत पार्टी करताना मलेरिया, कोंबडय़ा आणि युवकभारती दगडूला त्याच्या ‘पराजू’ अर्थात प्राजक्ताची आठवण करून देतात. तरीपण मोठा दगडू ‘सीरियस’ होत नाही. म्हणून चित्रपटकर्त्यांनी छोटा दगडू याला पाचारण करून छोटा दगडू मोठय़ा दगडूला प्राजक्ताची आठवण करून देतो आणि तिला पुन्हा भेटून अपूर्ण राहिलेले प्रेम त्याच्यात जागे करतो, अशी क्लृप्ती केली आहे.
मग काय एकदा दगडूला प्राजक्ताचे स्मरण झाल्यावर तिला भेटण्याची, प्रेम व्यक्त करण्याची त्याला ओढ लागते आणि मग आपल्या मित्रांसमवेत तो नवीन शक्कल लढवितो. प्राजक्ताचे बाबा अर्थात शाकालला शोधण्यापासून त्याचे मन जिंकण्यात दगडू यशस्वी होईल का, या प्रश्नाभोवती सिनेमा फिरतो. वारंवार छोटा दगडू ज्याला या चित्रपटातला मोठा दगडू कायम ‘चड्डी’ म्हणतो तो आणि मोठय़ा दगडूच्या मनात कायम राहिलेली छोटय़ा प्राजक्ताची प्रतिमा याचा मेळ साधून पटकथेची भट्टी उत्तम जमवली आहे.
पहिल्या चित्रपटातील मूळ व्यक्तिरेखांचे स्मरण प्रेक्षकांना प्रत्येक चित्रचौकटीतून देत आणि ‘मला वेड लागले’ या गाण्याची धून सारखी पाश्र्वभूमीला वाजवत चित्रपटकर्त्यांनी प्रेक्षकाला भावनिक केले असून मध्यांतरानंतर भावनिक प्रसंग मांडले आहेत. शाकाल हा खलनायक नाही, तर तो केवळ प्राजक्ताचा बाप आहे, त्याचे म्हणणे रास्त होते, आहे असे ठसविण्याचाही प्रयत्न चित्रपट करतो.
‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मध्येही शेवटपर्यंत काजोलचे वडील अमरिश पुरी शाहरूखच्या हातात आपल्या मुलीचा हात द्यायला तयार नसतात. हा प्रसंग प्रचंड लोकप्रिय ठरला. प्रेमकथापट यशस्वी करण्यासाठी याचा वापर अनेकदा केला गेला असून त्याची पुनरावृत्ती चित्रपटकर्त्यांनी केली आहे. अधुरी राहिलेली प्रेमकहाणी परिपूर्ण व्हायलाच हवी ही प्रेक्षकांची समजूत हे गृहीतक मानून पटकथा, मांडणी करण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे.
मोठय़ा दगडूच्या भूमिकेतील प्रियदर्शन जाधवने छोटय़ा दगडूची प्रतिमा सांभाळून भूमिकेला उत्तमपैकी न्याय दिला आहे. प्रिया बापटनेही प्राजक्ता ही भूमिका समरसून साकारली आहे. शाकाल ऊर्फ माधवराव लेले ही व्यक्तिरेखा पुन्हा सीक्वेलपटातून साकारत वैभव मांगलेने आपल्या लाजवाब अभिनयाची झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवली आहे.
मलेरिया, युवक भारती आणि कोंबडय़ा या दगडूच्या मित्रांच्या माध्यमातून अधिक विनोद घडविता आला असता आणि आणखी धमाल करता आली असती असे प्रेक्षकांना वाटत राहते. आकर्षक संवादांच्या जोरावर सुपरहिट ठरलेला प्रीक्वेल असूनही सीक्वेलमध्ये मात्र विनोद आणि खटकेबाज संवाद मर्यादितच आहेत याची रुखरुख प्रेक्षकाला वाटू शकते. मध्यांतरापूर्वीचा बाज आणि मध्यांतरानंतर भावनिक प्रसंगांची मालिका अशा दोन भागांत सीक्वेल झाला आहे. प्रीक्वेलची पूर्वपुण्याई सीक्वेलला नक्कीच तारून नेऊ शकेल हे मात्र खरे. निखळ, बिनडोक करमणूक करण्यात चित्रपट निश्चितच यशस्वी ठरतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाइमपास २
निर्माते – अथांश कम्युनिकेशन्स, एस्सेल व्हिजन
कथा-दिग्दर्शन – रवी जाधव
पटकथा – संवाद – प्रियदर्शन जाधव, क्षितिज पटवर्धन, रवी जाधव.
छायालेखन – वासुदेव राणे
संगीत – चिनार-महेश
संकलन – जयंत जठार
कलावंत – प्रियदर्शन जाधव, प्रिया बापट, वैभव मांगले, भालचंद्र कदम, आरती वडगबाळकर, नयन जाधव, समीर खांडेकर, संदीप पाठक, चिन्मय केळकर, भूषण प्रधान, उर्मिला कानेटकर, सुप्रिया पाठारे, क्षिती जोग, प्रथमेश परब, केतकी माटेगांवकर व अन्य.

टाइमपास २
निर्माते – अथांश कम्युनिकेशन्स, एस्सेल व्हिजन
कथा-दिग्दर्शन – रवी जाधव
पटकथा – संवाद – प्रियदर्शन जाधव, क्षितिज पटवर्धन, रवी जाधव.
छायालेखन – वासुदेव राणे
संगीत – चिनार-महेश
संकलन – जयंत जठार
कलावंत – प्रियदर्शन जाधव, प्रिया बापट, वैभव मांगले, भालचंद्र कदम, आरती वडगबाळकर, नयन जाधव, समीर खांडेकर, संदीप पाठक, चिन्मय केळकर, भूषण प्रधान, उर्मिला कानेटकर, सुप्रिया पाठारे, क्षिती जोग, प्रथमेश परब, केतकी माटेगांवकर व अन्य.