विषय वैविध्य, उत्तम कलावंत, श्रवणीय संगीत आणि वेगळी दिग्दर्शकीय मांडणी असलेल्या काही चित्रपटांकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा असतात. अमुक-तमुक दिग्दर्शक, चांगले कलावंत असले की त्यांच्याकडे पाहून प्रेक्षक हमखास चित्रपट पाहायला जातात. चित्रपटांचे प्रोमोज् पाहून त्याबद्दल बऱ्याच अपेक्षा असतात. परंतु अशा अपेक्षा पूर्ण करण्यात चित्रपट अपयशी ठरतो तेव्हा प्रेक्षक नाराज होतात. असेच काहीसे ‘टाइमपास’ या चित्रपटाबाबत म्हणता येईल. विशेषत: दिग्दर्शकाच्या आधीच्या गाजलेल्या चित्रपटामुळे निर्माण झालेल्या अपेक्षा आणि औत्सुक्य याबाबतीत हा चित्रपट फसतो. अल्लड वयातील मुला-मुलींचे प्रेम हा खरे तर आतापर्यंत फारसा न मांडलेला विषय या चित्रपटाद्वारे काही प्रमाणात मांडला गेला आहे. संगीतमय पण फिल्मीगिरीसारखा चित्रपट झाला आहे.
या चित्रपटाची सरळसाधी पौगंडावस्थेतील मुलगा-मुलगीची प्रेमकथा असा विषय आहे. प्राजक्ता लेले आणि दगडू परब या १५-१६ वर्षांच्या मुला-मुलींचे प्रेम जुळते. प्रेम म्हणजे काय हे न समजणारे नकळते वय असताना दगडूचे मित्र त्याला टाइमपास समजतात, कुणी आपणसुद्धा मुलगी ‘पटवू’ शकतो हे दाखविण्यासाठी, कधी धमाल म्हणून मुलींच्या मागे लागतात. दगडूचं मात्र तसं नाही, प्राजक्तालाही तसे वाटत नाही. पण दगडू आणि प्राजक्ता हे दोन वेगवेगळ्या स्तरातील आहेत, दोन वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वाढलेले आहेत. प्राजक्ता अभ्यासात, गाण्यात हुशार तर दगडू दहावीची परीक्षा अनेकदा देऊनही नापास झालेला, गरीब घरातला.. दोघांची भाषा वेगळी आहे. परंतु त्यांचे प्रेम जुळते.
गरीब नायक, त्यापेक्षा वरच्या आर्थिक स्तरातील नायिका, दोघांच्या घरून प्रेमाला असलेला विरोध, समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील याची भीती हे चित्रपटात खूप वेळा दाखविले गेले आहे. अल्लड वयातील प्रेमकथेला संगीताची चांगली जोड मिळाली आहेत. सगळी गाणी श्रवणीय आहेत. ‘मोन्टाज’चा वापर गाण्यांमध्ये केला आहे. अडनिडय़ा वयात अनेक जणांनी प्रेम केलेले असते. अनेकदा ते एकतर्फी असते. क्वचित प्रेम जुळलेच तरी यालाच प्रेम म्हणतात का, हे मुलगा-मुलगी दोघांनाही समजतेच असे नाही. कधी ते निव्वळ आकर्षण असते. चोरून भेटण्यातले ‘थ्रिल’ असते, चोरून भेटण्यासाठी ठिकाण ठरविल्यानंतर चुकामूकही अनेकांची झालेली असते. कोवळ्या वयातील प्रेम दाखविताना अशा अनेक बारीकसारीक गोष्टी दाखविणे अपेक्षित होते. लेखक-दिग्दर्शकांनी चित्रपटात काळ कोणता दाखवायचा आहे, आजचा की दहा-वीस वर्षांपूर्वीचा, ते स्पष्ट केलेले नाही. दगडू आणि त्याचे मित्र नेहमी भेटतात त्या पाइपलाइनवर ‘दयावान’ चित्रपटाविषयी काही लिहिल्याचे प्रेक्षकाला दिसते. चित्रपटात कुठेही मोबाइल अजिबात वापरलेला नाही. त्यामुळे मोबाइलचा भारतात वापर सुरू होण्यापूर्वीचा काळ आहे असे प्रेक्षकाला समजावे लागते. दगडू-प्राजक्ता सोडले तर दगडूचे मित्र आजच्या काळातील वाटतात. वास्तविक दगडूसारखी टपोरी मुले आजच्या काळातली वाटतात. परंतु प्राजक्तासारख्या आज्ञाधारक मुली जुन्या काळातील वाटतात. वाटतात म्हणजे कथानकात कुठेही काळ कोणता आहे याचे स्पष्टीकरण होत नाही म्हणून ‘वाटतात’ असे म्हणावे लागते.
ज्या प्रोमोज्मुळे चित्रपटाची चर्चा होतेय ते सगळे क्षण मध्यंतरापर्यंत आहेत. त्यानंतर चित्रपट थोडे वेगळे वळण घेतो. मुलीच्या सांगण्यामुळे मुलगा बदलतो, बदलू शकतो हे मात्र दिग्दर्शकाने सकारात्मक पद्धतीने दाखविले आहे. फिल्मीगिरी पद्धतीने चित्रपटाची मांडणी आहे असे जाणवते. थोडे चुटपुटीत संवाद, भरपूर गाणी, काही भावनाविवश करणारे क्षण अशा पद्धतीची मांडणी आहे. परंतु ती पहिल्या प्रेमातील गंमत, अल्लड वयातील शारीरिक आकर्षण, कोवळ्या वयातील प्रेमातली गंमत फारशी दाखविलेली नाही. त्याचबरोबर चित्रपट रंजक असला तरी खासकरून मध्यांतरानंतर खूप संथ गतीने पुढे सरकतो. त्यामुळेही अपेक्षित परिणाम साधू शकत नाही. केतकी माटेगावकर, प्रथमेश परब व अन्य सर्व मुलामुलींनी तसेच प्रमुख कलावंतांनी अभिनय उत्तम केला आहे. त्यासाठी दाद नक्कीच द्यायला हवी.
टाइमपास
निर्माते – नितीन केणी, निखिल साने, मेघना जाधव.
कथा-दिग्दर्शक – रवी जाधव.
पटकथा-संवाद – रवी जाधव, प्रियदर्शन जाधव.
छायालेखन – वासुदेव राणे.
संगीत – चिनार-महेश.
कलावंत – केतकी माटेगावकर, प्रथमेश परब, वैभव मांगले, भाऊ कदम, मेघना एरंडे, उर्मिला कानिटकर, भूषण प्रधान, मनमीत पेम, ओंकार राऊत, जयेश चव्हाण.
अल्लड फिल्मीगिरी
विषय वैविध्य, उत्तम कलावंत, श्रवणीय संगीत आणि वेगळी दिग्दर्शकीय मांडणी असलेल्या काही चित्रपटांकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा असतात.
आणखी वाचा
First published on: 05-01-2014 at 01:43 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Timepass film review filmy style