हिंदी चित्रपटांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जुन्या चित्रपटांचे रिमेक आणि सीक्वेलपट करण्याची पद्धत सुरू झाली. मर्डर चित्रपटांची मालिका, डॉन या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेकपासून ते साहिब, बिवी और गुलाम, वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई, साहिब बिवी और गँगस्टर, फिर हेराफेरी अशा असंख्य चित्रपटांचे सीक्वेल आणि जुन्या चित्रपटांचे रिमेक आले, येत आहेत. ज्याप्रमाणे ‘मुगल ए आझम’ काही वर्षांपूर्वी पुन:प्रदर्शित करण्यात आला होता त्याप्रमाणे अन्य मूळ चित्रपट प्रदर्शित करण्याची प्रथा सुरू झाली नाही. परंतु, आता मीरा नायर दिग्दर्शित ‘सलाम बॉम्बे’ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला हिंदी चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. आता ‘मकबूल’ हा विशाल भारद्वाज दिग्दर्शित चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचे बेत आखले जात आहेत, असे समजते.
मीरा नायर यांचा ‘सलाम बॉम्बे’ हा हिंदी चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला होता. बरोबर २५ वर्षांनंतर पीव्हीआर सिनेमाच्या सहकार्याने तो प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाच्या लेखिका सूनी तारापोरवाला यांनी सिनेमाच्या पुन:प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला. २५ वर्षांनंतरही या ‘सलाम बॉम्बे’ मध्ये हाताळण्यात आलेला विषय आजही ताजा आहे. रस्त्यावरील मुलांचे आयुष्य आजही तसेच आहे. नाना पाटेकर, रघुवीर यादव, अनिता कंवर, इरफान खान, संजना कपूर आदींनी यात भूमिका केल्या आहेत.
विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘मकबूल’ २००३ मध्ये प्रदर्शित झाला. शेक्सपीअरच्या ‘मॅकबेथ’ या नाटकावर आधारित आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डची पाश्र्वभूमी असलेला  पकंज कपूर, इरफान खान, तब्बू, ओम पुरी यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट समीक्षकांनी गौरविला होता. आता गेल्या दहा वर्षांत चित्रपट पाहिलेल्यांकडून पुन्हा प्रदर्शित करण्याबाबत विचारणा करण्यात येत असून त्यामुळेच विशाल भारद्वाज ‘मकबूल’ पुन्हा प्रदर्शित करण्याचे बेत आखण्यात येत असल्याचे समजते. मकबूल चित्रपटात मियाँ मकबूल ही प्रमुख व्यक्तिरेखा इरफान खानने साकारली होती तर मूळ नाटकाप्रमाणे लेडी मॅकबेथ अर्थात निम्मी ही व्यक्तिरेखा अभिनेत्री तब्बूने साकारली होती. जहांगीर खान ऊर्फ अब्बाजी या व्यक्तिरेखेसाठी अभिनेता पंकज कपूरला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. दहा वर्षांपूर्वी मकबूल हा चित्रपट समीक्षकांनी गौरविला असला तरी प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली होती. आता बॉलीवूडमध्ये वेगळ्या विषय-आशयाच्या चित्रपटांची संख्या वाढते आहे. ‘पानसिंग तोमर’, ‘विकी डोनर’, ‘गँग्स ऑफ वासेपुर’ यांसारख्या वेगळ्या पठडीतील चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दर्शविल्यामुळे कदाचित ‘मकबूल’लाही प्रेक्षकांचा नव्याने प्रतिसाद लाभेल या हेतूने निर्माता-दिग्दर्शक विशाल भारद्वाज पुन:प्रदर्शनाचे बेत आखत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Story img Loader