‘टायटॅनिक’फेम हॉलिवूड अभिनेत्री केट विन्स्लेट लवकरच एका ‘इंडो-वेस्टर्न’ चित्रपटात पंजाबी गाण्यावर भांगडा करताना दिसणार आहे. भारतीय कोरिओग्राफर राजीव खिनची हा केटला पंजाबी गाण्यावरचा भांगडा शिकवणार असून ‘गोल्डन स्पॅरो’ नावाच्या या चित्रपटात केटबरोबर एका भारतीय अभिनेत्रीचाही समावेश असणार आहे. याआधी हॉलिवूड अभिनेत्री निकोल किडमन हिने ‘मुलीन रग’ या चित्रपटासाठी उर्मिला मातोंडकरच्या ‘छम्मा छम्मा’ या गाण्यावर नृत्य केले होते.
हॉलिवूडपटांमध्ये मुळातच गाण्यांची वानवा असते त्यामुळे नृत्यावर किंवा संगीतावर आधारित चित्रपट असल्याशिवाय तिथे नृत्याला शिरकावच नाही. हॉलिवूडच्या अभिनेत्रींचा पार्टीत संगीताच्या तालावर नायकाबरोबर गोल गोल फिरण्याशिवाय नृत्याशी काही संबंध येत नाही. त्यामुळे केटला मुळात नृत्य करता येते का? आणि तिला येत असले तरी तिला थेट पंजाबी गाण्यावर भांगडा करायला लावणे ही जरा अवघडच जबाबदारी झाली. पण, राजीव खिनचीला यात वेगळे काही वाटत नाही. हिंदी चित्रपटांची नृत्यशैली आणि जाझ यात पारंगत असलेल्या राजीवने ‘गोल्डन स्पॅरो’साठी केटला भांगडा शिकवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. गेले काही आठवडे लॉस एंजेलिसध्ये मुक्काम ठोकून असणाऱ्या राजीवने या चित्रपटातील गाण्यांवर तपशीलवार काम केले आहे.
‘गोल्डन स्पॅरो’ हा इंडो-वेस्टर्न चित्रपट असून यात हॉलिवूड कलाकारांबरोबर बॉलिवूड कलाकारांचाही समावेश असल्याचे समजते. एवढेच नव्हे तर केट विन्स्लेटबरोबर एका भारतीय अभिनेत्रीचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, तिच्या नावाविषयी सध्यातरी निर्मात्यांनी मौन बाळगले आहे. पुढच्या वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून सध्या त्याची प्राथमिक तयारी चालू असल्याचे समजते. हॉलिवूड अभिनेत्रींनी हिंदी गाण्यांवर नृत्य करण्याचा प्रसंग एखादाच आहे. याआधी निकोल किडमनने ‘मुलीन रग’ या चित्रपटात हिंदी गाण्यावर नृत्य केले होते. ‘चायना गेट’ चित्रपटातील उर्मिला मातोंडकरच्या ‘छम्मा छम्मा’ गाण्यावर निकोलने ताल धरला होता. आता केट पंजाबी भांगडा कसा क रेल, हे पाहणे मोठे गमतीचे ठरणार आहे.