टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विंसलेट तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. कोणत्याही विषयावर रोखठोक मत मांडायला ती मागेपुढे पाहात नाही. आता केटने हॉलिवूडमधील समलिंगी अभिनेत्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. समलिंगी अभिनेत्यांना वाटत असलेल्या भीतीवर तिने थेट मत व्यक्त केले आहे.
‘मी कित्येकदा समलिंगी अभिनेत्यांशी संवाद साधला आहे. त्यांनी मला त्यांना वाटत असलेल्या भीतीबद्दल सांगितलं आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्यांमध्ये काही प्रसिद्ध अभिनेते देखील आहेत तर काहींनी नुकतंच आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. ते आपलं लैंगिक आयुष्य उघडपणे सांगण्यास घाबरतात. कारण त्यांना भीती आहे की त्यांचं करिअर संपून जाईल आणि त्यांना हॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद होईल’, असा खुलासा अभिनेत्री केट विंसलेट यांनी केला आहे.
(वाचा: “माझ्यातलं टॅलेंट अजून नीट समोरच आलेलं नाही”- श्रेयस तळपदे)
‘खरं तर अभिनेत्यांना हॉलिवूडमध्ये आपला हुद्दा टिकवणं कठीण असतं. त्यात जर त्यांनी लैंगिक आयुष्याबाबत खुलासा केला तर मात्र त्यांना चांगली भूमिका मिळणं कठीण होईल. अशी अवस्था कमीत कमी चार अभिनेत्यांची आहे. त्यांना वाटणारी भीती खरंच वेदनादायी आहे.’, असंही केटने पुढे सांगितलं.
केट विंसलेटची भूमिका असलेला टायटॅनिक चित्रपटाच्या कथानकाला संपूर्ण जगाने दाद दिली. टायटॅनिक चित्रपटातील ‘रोझ’ ही भूमिका कायम स्मरणात आहे. केट विंसलेट सध्या ‘मेअर ऑफ ईस्ट टाऊन’ या वेब सीरिजमध्ये गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. तिची ही भूमिका चाहत्यांच्या पसंतीला पडत आहे. केटही आपली भूमिका अधिक प्रभावी व्हावी यासाठी मेहनत घेत आहे.
केटने हॉलिवूडमधील समलिंगी अभिनेत्यांबाबत खुलासा केल्यानंतर आता हे अभिनेते कोण? याबबात दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.