‘धूम’ स्टाईलने दुचाकी चालविणे अशी जणू तरुणाईमध्ये अहमहमिका लावणाऱ्या ‘धूम’ चित्रपटाचा तिसरा सीक्वेलपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘धूम थ्री’मध्ये तिसऱ्यांदा अभिषेक बच्चन जय दीक्षित ही व्यक्तिरेखा सादर करणार आहे, परंतु तिसऱ्यांदा ही भूमिका करीत असतानाही कंटाळा आला नाही आणि प्रेक्षकांनाही कंटाळा येणार नाही याची काळजी घेणे आणि त्या पद्धतीने नव्याने एसीपी जय दीक्षित साकारणे हे मात्र आव्हान होते, असे अभिनेता अभिषेक बच्चनने म्हटलेय.
आमिर खान ‘धूम थ्री’मध्ये आहे. त्याच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगताना अभिषेक म्हणाला की, सेटवर आमिर खान एखाद्या लहान मुलासारखा वावरत होता. त्याच्यासोबत काम करताना त्याच्याकडून शिकायला मिळाले. खरे पाहिले तर सहकलाकारांसोबत काम करताना प्रत्येकाकडून शिकण्यासारखे काही ना काही असतेच. किंबहुना अभिनय करताना सहकलाकारांकडून तुम्ही काही नवे शिकला नाहीत तर ते चुकीचेच ठरेल, असेही अभिषेकने आवर्जून नमूद केले. उदय चोप्रा पुन्हा एकदा अली साकारणार आहे आणि कतरिना कैफही यात आहे. फक्त जॉन अब्राहम नाही. परंतु, जॉनसोबत ‘दोस्ताना’च्या सीक्वेलपटात आपण एकत्र आहोत, अशी माहिती अभिषेकने दिली.
यशराज फिल्म्स बॅनरच्या या बिग बजेट चित्रपटात आमिर खान असून विजय आचार्य यांनीच तिसऱ्यांदा लेखन-दिग्दर्शन केले आहे. आमिर खान असल्यामुळे ‘धूम थ्री’बद्दल बरीच चर्चा केली जात असून गेल्या काही वर्षांत आमिर खानने अशा पद्धतीचा चित्रपट केलेला नाही. झुरिचपासून अनेक देशांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येत आहे. २५ डिसेंबर रोजी ‘धूम थ्री’ प्रदर्शित केला जाणार आहे.

Story img Loader