नवीन वर्ष आलं म्हटल्यावर सेलिब्रेशन आणि रिझोल्यूशन (संकल्प) या गोष्टी ओघाने येतातच. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वांनी काहीना काही तरी प्लॅन्स केले असतील आणि त्याच्या बरोबरीने नवीन वर्षामध्ये काय करायचे याचा संकल्पही केला असेल. याला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद ठरणारे नाहीत. संकल्प हे पूर्ण होतातच असे नाही. पण तरीही ते केले जातातच! बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान यानेसुद्धा नवीन वर्षात काही संकल्प केले आहेत.
२०१८ हे वर्ष सरताना आमिरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. नवीन वर्षासाठी चाहत्यांना शुभेच्छा देत असतानाच त्याने केलेले पाच संकल्प त्या पोस्टमध्ये लिहिल्या.
१. पुन्हा सर्वोच्च स्थानावर येणे
२. २०१८ मध्ये ज्या चुका घडल्या त्यातून धडा घेणे
३. माझा सर्वोत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणे
४. काहीतरी नव्या गोष्टी शिकणे
५. पत्नी किरण, आई आणि माझ्या मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवणे
https://www.instagram.com/p/BsDj4nMgySd/
आमिरने हे पाच संकल्प सांगत असतानाच कळत नकळत कोणाला दुखावल्यास त्यांची माफीही मागितली आहे. २०१८च्या अखेरीस आमिरचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण बॉक्स ऑफीसवर तो दणक्यात आपटला. त्यामुळेच कदाचित चुकांमधून शिकण्याचा संकल्प आमिरने केला असावा असा अंदाज नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांमध्ये व्यक्त केला आहे.