नाटक हे मराठी माणसाचे वेड समजले जाते. नाटकांचे विषय, त्याच्या तालमी आणि प्रत्यक्ष रंगमंचावर प्रेक्षकांसमोर ते सादर करत असताना विंगेमध्ये कलाकारांबरोबरच बॅकस्टेज कलाकारांचाही रंगणारा रोजचा नवा प्रयोग अनुभवण्यात जे दंगले ते या वेडापासून कधीही दूर जाऊ शकत नाही. नवीन नाटक, त्याचे परीक्षण या नेहमीच्या परिघाबाहेर शिवाजी मंदिरच्या बुकिंग काऊंटरपासून शिवाजी पार्कवरच्या कट्टय़ापर्यंत, खाण्याच्या अड्डयांपर्यंत जिथे जिथे म्हणून नवं नाटक जन्माला येतं त्याची कथा काही वेगळीच असते. या परिघाबाहेरच्या नाटय़ाचा दर आठवडय़ाला एक नवा अंक ‘विंग–बिंग’ या सदरातून रंगणार आहेत.
.. तो मी नव्हेच, असं म्हणत लखोबा लोखंडेने काही वर्षांपूर्वी बऱ्याच जणांना गंडा घातला होता. विविध व्यक्तिरेखा साकारत प्रभाकर पणशीकर यांनी जवळपास साऱ्यांनाच चकित केलं होतं. पणशीकरांनंतर ‘तो मी नव्हेच’ हे नाटक काही नटांनी सादर केलं, पण त्याला जास्त प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये एकाच नाटकात विविध भूमिका असणाऱ्या दोन नाटकांचं पुनरुज्जीवन झालं. त्यातलं एक म्हणजे ‘हसवाफसवी’ आणि दुसरं ‘तू तू मी मी’. गेल्या वर्षी जस्ट ‘हलकं-फुलकं’ या नाटकातही विविध भूमिका सागर कारंडे आणि अनिता दाते या कलाकारांनी साकारल्या होत्याच. भरत जाधवने ‘सही रे सही’मध्ये रेखाटलेल्या व्यक्तिरेखांचं सर्व स्तरांत कौतुक झालं. ‘हसवाफसवी’मध्ये आता पुष्कर श्रोत्री आणि ‘तू तू मी मी’मध्ये संतोष पवार विविध व्यक्तिरेखा रेखाटत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. विविध व्यक्तिरेखा साकारताना कलाकाराला स्वत:ची ओळख विसरून काम करावं लागतं तरच हे प्रयोग यशस्वी ठरतात.
‘हसवाफसवी’ दिलीप प्रभावळकरांनी एक काळ फार गाजवलं. त्याचे ७५० प्रयोग झाले. प्रत्येक गोष्टीला ‘एक्स्पायरी डेट’ असते या प्रभावळकरांच्या नियमानुसार त्यांनी ऐन भरात असलेलं हे नाटक बंद केलं. आता हेच नाटक पुष्कर करतोय.
‘‘या नाटकात स्विच ऑफ-स्विच ऑन होण्यासाठी माझ्याकडे फुरसतच नसते. कधी कधी पहिल्या व्यक्तिरेखेचे संवाद विंगेत बोलत किंवा कपडे घालत मी तयार होत असतो. हे सारं स्विच ऑफ-स्विच ऑनच्या पलीकडचं आहे. या व्यक्तिरेखा साकारताना त्यामध्ये पुष्कर किंवा दिलीपजी कुठेही दिसता कामा नयेत, हे सर्वात महत्त्वाचं. जेव्हा मी चिनी व्यक्तिरेखा बदलून कोंबडीवाला साकारतो, तेव्हा मला दीड मिनिट मिळतं. यामध्ये मोठा वाटा रंगभूषाकार आणि बॅकस्टेजचे कलाकार यांचा आहे. त्यांचं श्रेय मी नाकारूच शकत नाही, मी एकटा हे सारं करूच शकत नाही,’’ असं पुष्कर सांगत होता.
‘हसवाफसवी’ नाटकाचे रंगभूषाकार कमलेश बीच यांनीही पडद्यामागची गंमत सांगितली, ‘‘पडद्यामागे युद्धपातळीवर आम्ही काम करत असतो. कलाकार एकदा विंगेत आल्यावर आमच्याकडे फक्त एक किंवा दोन मिनिटं असतात. त्यामध्ये त्यांची पूर्ण रंगभूषा आणि वेशभूषा बदलायची असते. प्रत्येकाला आपलं काम चोख करावं लागतं, एक सेकंदही उशीर झाला तर त्याचा विपरीत परिणाम नाटकावर होऊ शकतो. त्यामुळे हा माझा पहिलाच प्रयोग आहे, हे डोक्यात ठेवूनच मी काम करत असतो. कामामध्ये क्षणाचीही उसंत नसते.’’
‘तू तू मी मी’, हे नाटक तिसऱ्यांदा रंगमंचावर आलंय. पूर्वी विजय चव्हाण यामध्ये १४ भूमिका करायचे. आता या भूमिका लेखक-दिग्दर्शक आणि हरहुन्नरी अभिनेता संतोष पवार करतोय. ‘‘दिग्दर्शक असल्यामुळे नवीन मुलांना मी प्रत्येक व्यक्तिरेखा करून दाखवतो. हे नाटक यापूर्वी आल्यामुळे ते नेमकं काय आहे, हे मी समजू शकलो. व्यक्तिरेखेनुसार चेहरा, चाल, शरीराची ठेवण, हातवारे, बोलण्याचा वेग, भाषेचा लहेजा सारे काही बदलते. काही वेळा विंगेत आल्यावर ते माझ्या अंगावरचे कपडे ओरबाडले जातात. एक जण मला शर्ट आणि दुसरा पँट घालत असतो. तिसरी व्यक्ती मेकअप करत असते आणि त्यामध्ये काही वेळा मी संवादही म्हणत असतो, असं सारं एकाच वेळी करावं लागतं. बॅकस्टेज कलाकारांशिवाय हे नाटक होऊच शकत नाही,’’ असं संतोष सांगत होता.
‘‘विविध भूमिका करत असताना पहिल्यांदा नाटकाचा विचार मी करतो. त्यानंतर मी प्रत्येक भूमिकेचा अभ्यास करतो. एखादी व्यक्तिरेखा चांगली होत असेल तर ती ताणण्याचा मी प्रयत्न करत नाही. आपणच व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडतो, पण त्यापेक्षा नाटक महत्त्वाचं असतं. व्यक्तिरेखेची भाषा, ढब, लकब आत्मसात करता आली पाहिजे. लोकांपर्यंत प्रत्येक व्यक्तिरेखा पोहोचवता यायला हवी. बॅकस्टेजच्या कलाकारांचं हे र्अध नाटक असतं. एका कलाकारामागे चार बॅकस्टेज आर्टिस्ट असतात. रंगमंचावर गेल्यावर आमचं कौतुक होतं, पण त्याचे हकदार बॅकस्टेज आर्टिस्टही असतात,’’ असं सागर कारंडे सांगत होता.
‘हलकं-फुलकं’ नाटकाचे वेशभूषाकार श्रीकांत कडू सांगत होते की, ही सारी धावपळ शब्दात सांगता येणार नाही, तर ती विंगेतून अनुभवायलाच हवी, असं म्हणत आपला अनुभव त्यांनी सांगितला. ‘‘आम्ही फक्त वेशभूषा करत नाही, तर पूर्ण नाटक आम्हाला पाठ असावं लागतं. कोणता कलाकार काय संवाद बोलून कधी विंगेत येणार आणि त्यानंतर तो कोणती व्यक्तिरेखा साकारणार, याचं भान कायम ठेवावं लागतं. प्रत्येक गोष्ट अचूक करण्यावर आमचा भर असतोच, पण धावपळीत काही गमतीजमतीही घडतात, त्या नाटकाचाच एक भाग असतात.’’
‘‘विविध भूमिकांचा स्वतंत्र विचार करावा लागतो. प्रत्येक व्यक्तिरेखेचे बारकावे हेरावे लागतात. कारण प्रत्येक व्यक्तिरेखेचं या नाटकात वय वेगळं होतं. पण हे सारं सांघिक काम आहे. माझ्याबरोबरचे कलाकार आणि बॅकस्टेज कलाकार यांचाही यामध्ये मोलाचा वाटा असतो. त्यामुळे हे फक्त माझं आहे, हे सारं निघून जातं. रंगमंचावर मी, समोरचे कलाकार आणि प्रेक्षक अशी तीन पात्रं होतात, हा अनुभव मला बरंच शिकवून गेला,’’ असं अनिता सांगत होती.
कलाकाराला स्वत:ची ओळख हवी असते. आपल्याला साऱ्यांनी ओळखावं, यासाठी काही नट बरेच प्रयत्न करत असतात. पण या प्रकारच्या नाटकात कलाकारांना स्वत:ची प्रतिमा विसरावी लागते. पहिली व्यक्तिरेखा साकारल्यावर दुसरी व्यक्तिरेखा वठवताना आपण यापूर्वी रंगमंचावर आलोच नव्हतो, असा आभास निर्माण करावा लागतो. ती अमुक भूमिका साकारणारा मी नाहीच, हे प्रत्येक कलाकाराला आत्मसात करावं लागतं, तरच हा विविध व्यक्तिरेखांचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो.