पवनीत सिंह चड्ढा – इंडियन एक्स्प्रेस
टॉलीवूड निर्माता के पी चौधरी म्हणजेच शंकरा कृष्णा प्रसाद चौधरीने वयाच्या ४४ व्या वर्षी गोव्यात भाड्याच्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
तेलंगणातील ४४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती सिओलिम पोलीस चौकीला मिळाली होती. याप्रकरणी आता पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.
“प्राथमिक माहितीवरून असे दिसून येते की, चौधरी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून फ्लॅटमध्ये एकटे राहत होते. आज सकाळी त्यांनी फोन कॉल आणि मेसेजला प्रतिसाद न दिल्याने त्यांचे मित्र चिंतेत पडले होते. यामुळेच चौधरींच्या मित्रांनी फ्लॅट मालकाशी संपर्क साधला, याच फ्लॅट मालकाला चौधरींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील बोनाकल येथील रहिवासी असलेल्या के पी चौधरीने मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक पदवी प्राप्त केली आहे. तो पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’मध्ये ऑपरेशन्स डायरेक्टर म्हणून काम करत होता. २०१६ मध्ये त्याने ‘कबाली’ चित्रपटाची निर्मिती केली होती. या सिनेमाने तब्बल ६५० कोटी कमावले होते. याशिवाय ‘सरदार गब्बर सिंग’ आणि ‘सीताम्मा वकित्लो सिरीमल्ले चेट्टू’ या दोन तेलुगू चित्रपटांचे वितरण हक्क तसेच तामिळ चित्रपट ‘कानितान’चे वितरण हक्कही त्याने मिळवले होते.
२०२३ मध्ये ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली झालेली अटक
के पी चौधरी चित्रपट निर्मितीच्या काळात या सिनेविश्वातील विविध सेलिब्रिटींशी जोडला गेला, याचदरम्यान तो गोव्यात आला आणि याठिकाणी त्याने एक क्लब सुरू केला, असा पोलिसांचा दावा आहे.
जून २०२३ मध्ये के पी चौधरीला सायबराबाद पोलिसांनी ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. चौधरीला त्याच्या व्यवसायात तोटा झाला आणि त्याचवर्षी एप्रिलमध्ये गोव्याहून परतताना त्याने एका नायजेरियन ड्रग्ज तस्कराकडून कोकेनच्या १०० पाउच घेतल्या होत्या असा दावा करत सायबराबाद पोलिसांनी के पी चौधरीला ताब्यात घेतलं होतं.