बाहुबलीच्या तुफान यशानंतर टॉलिवूड सुपरस्टार प्रभासची लोकप्रियता कमालीची वाढली. फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रभासचे चाहते आहेत. विशेषतः जपानमध्ये त्याचे प्रचंड चाहते आहेत. बिग बजेट ‘साहो’ चित्रपटासाठी प्रभास सध्या जोरदार तयारी करत आहे. जगभरातून प्रभासला मिळणारे प्रेम त्याने कायमच आनंदाने स्वीकारले आहे. नुकतंच जपानमधील त्याच्या काही चाहत्यांनी भारताला भेट दिली. त्यांच्या आवडत्या अभिनेत्याच्या शहरालाही त्यांनी आवर्जून भेट दिली. प्रभाससाठी वेड्या असणाऱ्या या तरुणींनी त्याच्या घराबाहेर खास पोझमध्ये फोटोही काढला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला प्रभासला जपानमधील त्याच्या चाहत्यांनी पत्र पाठवली होती. या पत्रांचे उत्तर म्हणून प्रभासने स्वतःची स्वाक्षरी केलेल्या काही गोष्टी त्यांना पाठवल्या होत्या. त्या पात्रांमध्ये प्रभासचे फोटो आणि जपानी भाषेतील मजकूर होता. जपानी चाहत्यांनी या पत्रांद्वारे प्रभासला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. एस.एस.राजामौलीच्या ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ दोन चित्रपटांनी भारतीय सिनेसृष्टीत वेगळाच इतिहास घडवला होता. या चित्रपटांनी प्रभाससोबत इतर कलाकारांनाही जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

‘साहो’ या चित्रपटातून अभिनेत्री श्रद्धा कपूर टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘साहो’ चित्रपटासाठी दिग्दर्शक सुजीत यांनी ३०० कोटींची गुंतवणूक केली आहे. तसेच चित्रपटातील स्टंटसाठी हॉलिवूड दिग्दर्शक केनी बेट्स यांची नेमणुक करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच येईल अशी अपेक्षा आहे. हा चित्रपट १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.