हॉलीवूड अभिनेता टॉम हॉलंड आणि झेंडाया हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या अनेक वर्षांपासून येत आहे. ‘स्पायडरमॅन होम कमिंग’ या सिनेमात या दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. २०१७ मध्ये ‘स्पायडरमॅन: होमकमिंग’ या चित्रपटाच्या सेटवर भेट झाल्यानंतर डेटिंग सुरू करणाऱ्या या जोडप्याच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये चर्चा सुरु असतात . आता या जोडप्याने साखरपुडा केल्याच्या चर्चा आहेत.
झेंडाया आणि टॉम हॉलंड यांनी त्यांचे नाते पुढील टप्प्यावर नेण्याचा निर्णय घेतला असून, स्पायडरमॅन स्टारने अभिनेत्री झेंडायाला प्रपोज केल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सूत्रांनी ‘टीएमझेड’ला दिली आहे. झेंडायाच्या कुटुंबियांच्या अमेरिकेतील एका घरात टॉमने हा प्रपोज ख्रिसमस आणि नववर्षाच्या दरम्यान रोमँटिक आणि खासगी वातावरणात केला.
हे प्रपोज अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आले. टॉमने मोठा आणि लक्षवेधी सोहळा न करता झेंडायाबरोबर शांततेत एक खासगी क्षण निवडला. विशेष म्हणजे, त्यावेळी दोघेही एकटेच होते आणि कुटुंबातील कुणीही हा क्षण पाहण्यास उपस्थित नव्हते. असे या रिपोर्टनुसार सांगण्यात आले आहे.
झेंडाया गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर दिसल्यानंतर त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले. झेंडाया तिच्या बर्न्ट ऑरेंज सॅटिन ड्रेसमुळे चर्चेत राहिली होती. मात्र, यावेळी लोकांचे लक्ष तिच्या डाव्या हातातील मोठ्या डायमंड रिंगने वेधून घेतले. झेंडाया, जी अनेकदा एका लक्झरी ब्रँडची दागिने परिधान करते, यावेळी तिच्या हातातील अंगठी त्या ब्रँडची नव्हती. ती लंडनमधील प्रसिद्ध ज्वेलर्सने बनवलेली एंगेजमेंट रिंग असल्याचे समोर आले.
हेही वाचा…तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
साखरपुडा झाल्यानंतरही, त्यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या तयारीसाठी त्यांनी अजून वेळ घेतला आहे. झेंडाया आणि टॉम सध्या त्यांच्या अनेक हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असल्यामुळे ते एवढ्यात लग्न करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
झेंडाया आणि टॉमच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून आनंदाने स्वीकारली जात आहे. सोशल मीडियावर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हॉलीवूडमधील सर्वात गोंडस आणि प्रतिभावान जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टॉम आणि झेंडायाच्या नात्याची नेहमीच चर्चा झाली आहे.
हेही वाचा…विवियन डिसेनाने दुसरं लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारला? पत्नी म्हणाली, “आमच्या धर्मात स्त्रिया…”
टॉम हॉलंड आणि झेंडाया यांनी आजवर ‘स्पायडरमॅन होमकमिंग’, ‘स्पायडरमॅन फार फ्रॉम होम’, ‘स्पायडरमॅन नो वे होम’, या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे. झेंडाया आणि टॉम लवकरच क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात मॅट डॅमन, अॅनी हॅथवे, रॉबर्ट पॅटिन्सन, लुपिता न्योंगो आणि चार्लिझ थेरॉन यांसारख्या तारे मंडळींचा समावेश आहे.