|| मंदार गुरव, आरती बोराडे

प्रतिभाशाली, कोटय़धीश, प्लेबॉय, परोपकारी टोनी स्टार्क उर्फ ‘आयर्नमॅन’ हा जणू माव्‍‌र्हल सिनेमॅटीक युनिव्हर्सचा हुकूमी एक्काच. मात्र सध्या त्यांचा हा हुकु मी एक्का आता थकला आहे. त्यामुळे त्याने आपली कवच कुंडले उतरवून कायमस्वरुपी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. रुपेरी पडद्यावर टोनी स्टार्क साकारणारा अभिनेता रॉबर्ट डाऊ नी ज्युनिअरचा करिश्मा व माव्‍‌र्हलचे जनक स्टॅन ली यांच्या कथानकांनी ‘आयर्नमॅन’ या व्यक्तिरेखेला एका वेगळ्याच उंचीवर नेले. परिणामी आज इतिहासातील सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेंपैकी एक म्हणून टोनी स्टार्ककडे पाहिले जाते. गेल्या १० वर्षांंत एक-दोन नव्हे तर तब्बल २२ सुपरहिट चित्रपट माव्‍‌र्हलने केवळ टोनी स्टार्क या व्यक्तिरेखेभोवती गुंफले आहेत. यावरुनच रॉबर्ट डाऊ नी ज्युनिअरच्या अभिनयाची ताकत आपल्या लक्षात येते. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ प्रदर्शित होण्यापूर्वीच आयर्नमॅनने आपली निवृत्ती जाहीर केली होती, मात्र या व्यक्तिरेखेवर चाहत्यांचे इतके प्रेम आहे की काही झाले तरी ते ही गोष्ट मान्य करायला तयारच नाहीत. आणि त्यामुळेच ‘अ‍ॅव्हेंजर्स :  एण्डगेम’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा उलटला असला तरी टोनी स्टार्क उर्फ आयर्नमॅन याच्याविषयीच्या चर्चा संपायचे नावच घेत नाहीत. उलट, चित्रपटामुळे या चर्चेला आणखी एक नवा विषय मिळाला आहे..

‘अ‍ॅव्हेंजर्स :  एण्डगेम’ पाहिलेल्या आणि न पाहिलेल्या दोन्ही प्रकारच्या चाहत्यांनी पुढे काय?, हे खणून काढायला सुरूवात केली आहे. आयर्नमॅन चित्रपट मालिका नव्याने येणार का, याचाही शोध ही मंडळी घेत आहेत. आणि त्याला कारण ठरला आहे तो त्याचा या चित्रपटातील एक संवाद. ‘अ‍ॅव्हेंजर्स एण्डगेम’मध्ये टोनी स्टार्कने ‘आय लव्ह यू ३०००’ हे वाक्य म्हटले आहे. चित्रपटात हे वाक्य टोनी एकूण तीन वेळा आपल्या मुलीसाठी उच्चारतो. आपल्या मुलीप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने हे वाक्य उच्चारले होते. मात्र या वाक्यामागे एवढाच अर्थ असावा हे मान्य करायला चाहते तयार नाहीत. त्यांच्या मते गेल्या १० वर्षांत टोनी स्टार्कने अशीच चित्रविचित्र विधाने करुन चाहत्यांना आश्चर्याचे धक्के दिले आहेत. परिणामी या वाक्यामागेही काही गूढ अर्थ असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

‘माव्‍‌र्हल सिनेमॅटीक युनिव्हर्स’चे चित्रपट आपल्या पोस्ट क्रेडिट सीन्ससाठी ओळखले जातात. त्यांनी ‘अ‍ॅव्हेंजर्स’ चित्रपट मालिका तयार करताना एका लांबलचक कथानकाचे तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर एकूण २२ चित्रपट विणले होते. यांतील प्रत्येक चित्रपटाची पटकथा एकमेकांपेक्षा वेगळी होती. त्यातील नायक व खलनायक वेगळे होते तरीही हे सर्व चित्रपट एका मोठय़ा कथानकात अगदी पद्धशीरपणे त्यांनी बसवले होते. आणि या चित्रपटांची उत्सूकता वाढवण्यासाठी त्यांनी पोस्ट क्रेडिट सीन्सचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला होता. एका चित्रपटाची कथा दुसऱ्या चित्रपटाशी जोडण्यासाठी काही संदर्भ वापरले जातात, त्यालाच आपण माव्‍‌र्हलच्या भाषेत पोस्ट क्रेडिट सीन्स असे म्हणतो. यामुळे चित्रपट मालिकेत सहजता येते.

‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनीटी वॉर’मध्ये टायटन ग्रहावर थेनॉस विरुद्ध झालेल्या भीषण युद्धात टोनी जबर जखमी झाला होता. अन्नपाण्यावाचून तो अंतराळात भटकत होता. हे दृश्य पाहून चाहते इतके भावूक झाले होते की त्यांनी आयर्नमॅनला वाचवण्यासाठी थेट ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ उर्फ नासाशी संपर्क साधला होता. हेच चाहते आता पुन्हा एकदा सैरभैर झाले असून ते पुढच्या संदर्भाची शोधाशोध करत आहेत. मात्र, ‘अ‍ॅव्हेंजर्स :  एण्डगेम’ या चित्रपटाला माव्‍‌र्हलने पहिल्यांदाच पोस्ट क्रेडिट सीन टाकलेला नाही. त्यामुळे निराश झालेल्या चाहत्यांच्या हातात टोनीच्या तोंडचे ‘आय लव्ह यू ३०००’ हे वाक्य लागले आहे. या वाक्याचा अर्थ काय? आयर्नमॅन नक्की कुठला संदर्भ देऊ इच्छितो, या वाक्यामध्ये त्याच्या कोणत्या आयर्न आर्मरचा संदर्भ आहे का?, ही चर्चा जगभरातील सुपरहिरो चाहत्यांमध्ये रंगू लागली. शेवटी ही चर्चा इतकी मोठी झाली की माव्‍‌र्हल स्टुडिओला ‘आय लव्ह यू ३०००’ च्या रहस्यावरील पडदा उचलावा लागला.

‘अ‍ॅव्हेंजर्स’ चित्रपटमालिकेची सुरवात २००८ साली ‘आयर्नमॅन’ या सुपरहिरोपटापासून झाली. तिथून ‘अ‍ॅव्हेंजर्स : एण्डगेम’पर्यंत प्रदर्शित झालेल्या प्रत्येक चित्रपटाची लांबी काढून त्यांची बेरीज केली तर २ हजार ८९० मिनिटे असे उत्तर येते. म्हणजेच ३ हजाराला ११० मिनिटे कमी. आता येत्या काही महिन्यात प्रदर्शित होणारा ‘स्पायडरमॅन फार फ्रॉम होम’ हा चित्रपट ‘अ‍ॅव्हेंजर्स’ मालिके च्या तिसऱ्या टप्प्यातील शेवटचा चित्रपट असल्याची घोषणा माव्‍‌र्हल स्टुडिओचे प्रमुख केव्हिनी फायगी यांनी केली आहे. हा चित्रपट ११० मिनिटांचा आहे. म्हणजे या चित्रपटाचा कालावधी जोडला तर उत्तर ३ हजार मिनिटे असे येते. ‘अ‍ॅव्हेंजर्स’ मालिकेतील एकूण २२ चित्रपटांमध्ये प्रत्येक चित्रपटात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आयर्नमॅनचा संदर्भ आलेला आहे. याचा मतितार्थ असा की चाहत्यांनी आपल्या आयुष्यातील ३ हजार मिनिटे टोनी स्टार्कच्या सहवासात घालवली आहेत. कुठलीही तक्रार न करता त्याच्या चांगल्या-वाईट प्रत्येक प्रसंगात त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल व त्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्याला लढण्याची प्रेरणा दिल्याबद्दल आयर्नमॅनने ‘आय लव्ह यू ३०००’ च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिलेले हे एक प्रकारचे धन्यवाद आहे, असा निष्कर्ष आयर्नमॅनच्या चाहत्यांनी काढला आहे. अर्थात, त्यांच्या या निष्कर्षांत काही वावगे नसले तरी  हे कुठल्याही प्रकारचे पोस्ट क्रेडिट वाक्य नाही. तर आयर्नमॅनने आपल्या अनोख्या शैलीत चाहत्यांना दिलेले धन्यवाद आहे. आयर्नमॅन साकारणारा अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर यांची खरी मुले त्यांना ‘आय लव्ह यू ३०००’ म्हणत आपले प्रेम व्यक्त करतात. रॉबर्ट डाऊनी यांनी ही माहिती चित्रपटाची पटकथाकार जोडगोळी ख्रिस्तोफर मार्कस आणि स्टीफन मॅकफिली यांना दिल्यावर त्यांनी तो संवाद पटकथेत समाविष्य केला. ही माहितीही या लेखक द्वयींनी स्वत:च आयर्नमॅनच्या चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे आता निदान ‘आय लव्ह यू ३०००’ या संवादावरची चर्चा थांबेलही कदाचित.. पण आयर्नमॅनविषयीच्या चाहत्यांच्या गप्पा आणि त्यांचे प्रेम हेही ‘इन्फिनिटी’ असल्याने त्यांच्या मनातील ‘वॉर’ सुरूच राहणार यात शंका नाही.

Story img Loader