अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या कलाकरांच्या यादीमध्ये अभिनेता सलमान खान याचं नाव कायम अग्रस्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. सलमान एखाद्याला मदत करताना वेळकाळ पाहत नसल्यामुळे चंदेरी दुनियेत त्याने अनेक मित्र कमावले आहेत. मात्र या मित्रांबरोबरच त्याचे शत्रूदेखील कमी नसल्याचं पाहायला मिळतं. शीघ्रकोपी असलेल्या सलमानच्या रागाचा आतापर्यंत अनेकांनी सामना केला आहे. परंतु काही व्यक्ती अशा आहेत ज्या सलमानच्या हिटलिस्टवर असून त्यांच्याशी परत मैत्री करणं सलमानला मान्य नाही. त्यामुळे सलमानशी नक्की कोणत्या कलाकारांनी वैर घेतलं आहे ते पाहू.
१. विवेक ओबेरॉय – सलमान आणि विवेक यांच्यातील वाद सर्वांनाच ठावूक असून या दोघांच्या वादाला अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान-ऐश्वर्या रिलेशनमध्ये असताना विवेकची ऐश्वर्याबरोबरची जवळीकता वाढत असल्यामुळे सलमान आणि विवेकमध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे या प्रकरणानंतर सलमान अपरात्री फोन करुन मला त्रास देत असल्याचं विवेकने एका मुलाखतीत सांगितलं होतं. दरम्यान, या प्रकरणाला बरीच वर्ष उलटल्यानंतरही या दोघांमधील वाद अद्यापही कायम आहेत.
२. अर्जुन कपूर – बॉलिवूडमध्ये कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेला अभिनेता अर्जुन कपूर हा जरी बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांमध्ये लोकप्रिय असला तरी सलमानच्या हिटलिस्टमध्ये त्याचा समावेश झाला आहे. सलमानचा मोठा भाऊ अरबाज खान आणि त्याची पत्नी मलायका अरोरा खान यांच्या घटस्फोटाला अर्जुन जबाबदार असल्याचं मानत आहे. अर्जुनची मलायकाबरोबर जवळीकता वाढल्यामुळे अरबाज आणि तिच्या नात्यात दुरावा आला. यामुळेच सलमान आणि अर्जुनमध्ये शत्रूत्व आलं आहे.
३. सरोज खान- बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान या साऱ्यांनाच ठावूक आहे. सरोज खान यांनी आतापर्यंत आपल्या तालावर अनेक कलाकारांना नाचवलं आहे. मात्र याच डान्समुळे सलमान आणि सरोज यांचं चांगलंच वाजल्याचं पाहायला मिळालं. ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात सरोज खान एक गाणं दिग्दर्शित करीत होत्या. मात्र यागाण्यातील स्टेप्स सलमानला पसंत पडत नसल्यामुळे त्यांच्यात वाद झाल्याचं दिसून आलं.
४. अरिजीत सिंह – युथ आयकॉन असलेला युवा गायक अरजीत सिंह याचदेखील सलमानबरोबर खटकल्याचं पाहायला मिळालं. एका पुरस्कार सोहळ्यामध्ये एका विनोदादरम्यान या दोघांमध्ये तू तू मैं मैं झाली आणि या दोघांनी पुन्हा एकमेकांचं तोंड पाहण्यास नकार दिला. इतकंच नाही तर सलमानने या रागाची परिसिमा गाठत सुल्तान चित्रपटातील गाणंही अरिजीतकडून काढून घेतलं.
५. प्रियंका चोप्रा – देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणाऱ्या प्रियांकाने नुकतंच सलमानबरोबर वैर घेतलं आहे. सलमानच्या बहुचर्चित भारत चित्रपटामध्ये प्रियांका झळकणार असल्याचं सांगण्यात येत होती. मात्र ऐनवेळी प्रियांकाने या चित्रपटात झळकण्यास नकार दिल्यामुळे तिने सलमानच्या नाराजीला आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे सलमानची बहीण अर्पिता हिच्यामुळे प्रियांकाला भारत चित्रपट मिळाला होता. मात्र तिने भारतचं चित्रीकरण सुरु होण्यापूर्वीच नकार दिल्याचं दिसून आलं.