काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या आगामी ‘टोटल धमाल’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. या फोटोमध्ये अजयच्या खांद्यावर एक माकडीण ऐटीत बसल्याचं साऱ्यांनी पाहिलं. या माकडीणीच्या याच थाटामुळे ही माकडीण नक्की कोण असावी असा प्रश्न साऱ्यांनाच पडल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर ही माकडीण साधीसुधी नसून हॉलिवूडमधील नावाजलेलं अॅनिमल सेलिब्रिटी असल्याचं समोर आलं.
‘टोटल धमाल’च्या फर्स्ट लूकमध्ये दिसत असलेली ही माकडीण हॉलिवूडमध्ये ‘क्रिस्टल’ या नावाने प्रसिद्ध आहे. गेल्या २३ वर्षांपासून तिचा कलाविश्वामध्ये वावर आहे. ‘क्रिस्टल’ कॅपुचिन या जातीची असून सध्या ती हॉलिवूडमधील नावाजलेली अॅनिमल अॅक्ट्रेस आहे. तिने आतापर्यंत अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं असून ‘टोटल धमाल’च्या माध्यमातून ती पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
क्रिस्टल एक ट्रेंड मंकी असून ती सर्वसामान्य माणसांप्रमाणे वावरते. इतकंच नाही तर दैनंदिन जीवनातली कामही ती सराईतपणे करताना दिसते. विशेष म्हणजे तिला माणसांनी बोललेल्या गोष्टींचं आकलन होऊन त्यावर ती तिची प्रतिक्रियाही देत असते. तिच्या याच वैशिष्ट्यामुळे अमेरिकेतील अनेक न्युज चॅनेल्सने तिची मुलाखत घेतली आहे.
क्रिस्टलने ‘हँग ओव्हर २’, ‘जॉर्ज ऑफ जंगल’, ‘नाईट अॅट ए म्युझिअम’ या साऱ्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या चित्रपटामध्ये उत्तम अभिनय केल्यामुळे ती लोकप्रिय झाली आहे. तिच्या याच लोकप्रियतेमुळे ती एखाद्या आघाडीच्या अभिनेत्रींप्रमाणेच मानधन घेत असून आठ वर्षापूर्वी क्रिस्टलने एका मालिकेच्या प्रत्येक भागासाठी सात लाखाहून अधिक मानधन घेतल्याचं ‘टीव्ही गाईड मॅगझीन’मध्ये म्हटलं होतं. यावरुनच तिच्या आताच्या कमाईचा अंदाज बांधता येईल.