‘विकी डोनर’ चित्रपटानंतर अभिनेत्री यामी गौतमीचा दुसरा चित्रपट आणि तिच्या जोडीला पाकिस्तानी गायक-अभिनेता अली जफर यांचा ‘टोटल सियप्पा’ हा नेहमीच्या प्रेमकथांपेक्षा थोडा वेगळा आणि हटके चित्रपट आहे. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील संबंधांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे, असे या चित्रपटाची जोडी यामी आणि अली यांनी ‘स्क्रीन प्रिव्हू’च्या निमित्ताने बोलताना सांगितले. या चित्रपटाबद्दल उत्सुकता असण्याचे आणखी एक कारण म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शन ई. निवास यांनी केले असले तरी निर्मिती ही ‘अ वेनस्डे’ फेम दिग्दर्शक नीरज पांडे यांची आहे.
एक भारतीय तरुणी पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडते, अशी या चित्रपटाची कथा आहे. मुळात, ‘विकी डोनर’नंतर दुसरा चित्रपट घेण्यासाठी यामीने बराच वेळ घेतला. त्यामुळे दुसऱ्या चित्रपटासाठी ‘टोटल सियप्पा’ का करावासा वाटला..यावर यामीचे उत्तरही ‘नीरज पांडे’ असेच होते. ‘मी पहिल्यांदा या चित्रपटासाठी नीरजला भेटले. मला त्याचा ‘अ वेनस्डे’ हा चित्रपट खूप आवडला होता. त्यामुळे त्याच्याच दुसऱ्या चित्रपटाची पटकथा या उत्साहानेच मी ती वाचायला घेतली. विमानातल्या एका प्रवासाची ती संपूर्ण कथा मी वाचून काढली. जसजशी मी ती वाचत गेले. मला ती आवडत गेली आणि चित्रपट करायचा निर्णय पक्का झाला’, असे यामीने सांगितले.
तर स्वत: पाकिस्तानी असलेल्या अलीसाठी चित्रपटातही पाकिस्तानी अमनची भूमिका करणे फारसे अवघड नव्हते. इथे पाकिस्तानी मुलगा आणि भारतीय मुलीची प्रेमकथा म्हटल्यावर ती अधिक गंभीरतेने यायला हवी, असे कोणालाही सहज वाटले असते. मात्र, ‘टोटल सियप्पा’मध्ये तसे काहीही घडत नाही. मला वाटतं, ज्या दिवशी आशा अमनला आपल्या घरी पहिल्यांदा आईवडिलांना भेटायला घेऊन जाते तो दिवस, त्यांची त्यावरची प्रतिक्रिया आणि मग उडणारा गोंधळ यांतून समाजाचे नेमके काय विचार आहेत ते सहज प्रतिबिंबित होतात आणि हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे, असे अलीने यावेळी बोलताना सांगितले.
‘विकी डोनर’मध्ये चित्रपटातला सगळा गमतीचा जोर हा आयुष्यमानवर होता. मी बऱ्यापैकी गंभीर भूमिकेत होते. पण, ‘टोटल सियप्पा’त जो वेडेपणा आहे त्यात माझी महत्त्वाची भूमिका आहे, ही गोष्ट मला जास्त आवडली, असे यामीचे म्हणणे होते. तर आजवर मी विनोदी चित्रपटच केलेत. पण मला त्यात अडकून पडायचे नाही, असे सांगणाऱ्या अलीने आपला आगामी ‘किल दिल’ हा चित्रपट मात्र अॅक्शनपट असल्याचे सांगितले. त्याच्या पाकिस्तानी असण्यावरून बॉलीवूडमध्ये किंवा एकंदरीतच त्याला लोकांकडून शेरेबाजी ऐकायला मिळते का?, या प्रश्नावर लोक जे ऐकतात, पाहतात त्यावरून ते निष्कर्ष काढतात. त्याचा त्यांनी फार गांभीर्याने विचार केलेलाच असतो असे नाही, असे अली म्हणतो. सध्या सोशल साइट्स आणि माध्यमांमधून जे काही चालले आहे त्यात फारसा अर्थ नाही. या दोन गोष्टी सोडल्या तर दोन्ही देशांमध्ये थेट संवाद नाही, असेही त्याने स्पष्ट केले. अली मूळचा गायक आहे. पण, चित्रपट करायला लागल्यापासून त्याने स्वत:चे अल्बम्स करणेच सोडून दिले. यावर तो म्हणतो की एकेकटा गायक आणि त्याच्या अल्बम्सना सध्या आदर मिळत नाही. गाण्यांचे महत्त्व हे आजकाल चित्रपटांच्या माध्यमातून वाढले आहे. त्यामुळे एक अल्बम करायला लागणारा वेळ, खर्च सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आज पॉप संगीताला काहीही किंमत दिली जात नाही, असे त्याने स्पष्ट के ले. पण, तरीही जेव्हा स्वतंत्रपणे अल्बम काढण्याची इच्छा होईल तेव्हा मात्र मी नक्की त्यावर लक्ष केंद्रित करेन, असे अलीने यावेळी बोलताना सांगितले.
भारत-पाक संबंधावरचा विनोदी ‘टोटल सियप्पा’
‘विकी डोनर’ चित्रपटानंतर अभिनेत्री यामी गौतमीचा दुसरा चित्रपट आणि तिच्या जोडीला पाकिस्तानी गायक-अभिनेता अली जफर यांचा ‘टोटल सियप्पा’ हा नेहमीच्या प्रेमकथांपेक्षा थोडा वेगळा आणि हटके
First published on: 09-03-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Total siyappa review it could have been hilarious