पाकिस्तानी कलाकारांवर घातलेल्या बंदीचं बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी समर्थन केलं आहे. आता या बंदीच्या समर्थनार्थ अभिनेत्री विद्या बालनदेखील पुढे आली आहे. कला आणि कलाकारांना कोणतंही बंधन नसतं. सीमा, राजकारण कलेच्या आड येऊ शकत नाही या विचारांची मी आहे मात्र आता आपण ठोस अशी भूमिका घेतली पाहिजे असं विद्या म्हणाली.

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. बॉलिवूडनं या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक संघटनांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली आहे. या बंदीचं अजय देवगन, कंगाना रणौत यांसारख्या कलाकारांनी समर्थन केलं आहे. आता विद्या बालननं देखील या  बंदीचं समर्थन केलं आहे.

‘गाणं, कविता, नृत्य, नाटक, चित्रपट आणि इतर कला या व्यक्तींना एकत्र आणतात. कलेला सीमेचं बंधन नसतं. कलेचं राजकारण करु नये असं मला व्यक्ती म्हणून वाटतं. पण आता आपण थांबलं पाहिजे. काही निर्णय कितीही कठीण असले तरी ते घेतले पाहिजे. आता ठोस पावलं उचलण्याची वेळ आली आहे’ अशा शब्दात विद्यानं या बंदीचं समर्थन केलं आहे.

‘आयएफटीडीए घेतलेला निर्णय योग्य आहे. पाकिस्तानी कलाकारांवर घातलेली बंदी योग्य असून माझा याला पाठिंबा आहे’ असं म्हणत अभिनेता अजय देवगननंही या बंदीला पाठिंबा दिला होता.

 

Story img Loader