रवी जाधव दिग्दर्शित ‘बालक पालक’ अर्थात ‘बीपी’ने १० कोटींची कमाई करत मराठी चित्रपट व्यावसायिक यशही मिळवू शकतात, याचा सुखद धक्का दिला होता. आता त्यांच्याच ‘टाइमपास’ने अवघ्या पाच दिवसांत दहा कोटी आणि आठवडय़ाभरात साडेतेरा कोटींचा गल्ला जमवत नवा विक्रम नोंदवला आहे. ‘टाइमपास’ला चांगले यश मिळणार हे अपेक्षितच होते. पण, इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असे वाटले नव्हते. या यशाचे श्रेय सध्या मराठी चित्रपटांना डोक्यावर घेणाऱ्या तरूण पिढीचे आहे, असे रवी जाधव यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
‘टाइमपास’साठी हिंदी चित्रपटांचे खेळ काढून मल्टिप्लेक्स चित्रपटगृह मालकांना वाढीव शो दाखवावे लागले. नवीन वर्षांच्या पहिल्याच आठवडय़ात, पहिल्याच शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत ५ कोटी, पाच दिवसांत १० कोटी आणि आठवडय़ाभरात साडेतेरा कोटींची कमाई करत आधीच्या सर्व मराठी चित्रपटांचे विक्रम मोडित काढले आहेत.
‘टाइमपास’ची गोष्ट अतिशय साधी आहे. पण, पहिले प्रेम ही जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी नाजूक गोष्ट आहे. त्यामुळे चित्रपटातील दगडू आणि प्राजक्ताची गोष्ट कुठे ना कुठेतरी प्रत्येकालाच त्याच्या त्या सुंदर विस्मृतीत गेलेल्या आठवणीशी जोडून घेईल, याची खात्री होती. त्यामुळे हा चित्रपट यशस्वी होणार याचा शंभर टक्के विश्वास होता, असे रवी जाधव यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा