– दिलीप ठाकूर
हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाची काही खास वैशिष्ट्ये आहेत, ती कदाचित योगायोगाने देखील असतील… १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर नवीन चित्रपट प्रदर्शित करणे हे देखील तसे खासच वैशिष्ट्य आहे. बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘नया दौर ‘(१९५७) पासून अनेकदा तरी ही खासीयत साध्य झालीय. आणि काही वेळा विशेष उल्लेखनीय यशही लाभलयं. ‘नया दौर ‘ या चित्रपटाचे कथानकच या १५ ऑगस्ट रोजी तो प्रदर्शित करावा असा होता. वाढते औद्योगिकीकरण आणि त्यामधून वाढणारी संभाव्य बेकारी या सूत्राभोवती हा चित्रपट आहे. ग्रामीण भागातील रिक्षांचा व्यवसाय मोटारबस आल्याने मोडकळीस येईल याचा संभाव्य धोका या चित्रपटात साकारलाय. तो काळ तर अनेक ठिकाणी माणूसच रिक्षा ओढतोय याचा होता ( ‘दो बिघा जमीन ‘ आठवा.) ‘नया दौर ‘मध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचे सामर्थ्य आहे. दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या यामध्ये प्रमुख भूमिका आहेत. आणि हा सर्वकालीन क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. कदाचित आज आश्चर्य वाटेल, पण या चित्रपटाची कल्पना चोप्रासाहेबांनी चित्रपटसृष्टीतील काही जाणकारांना ऐकवली तेव्हा त्यानी हा माहितीपटाचा विषय आहे असं म्हटलं, पण ते या विषयावर ठाम विश्वास ठेवून राहिले आणि त्याचे त्याना यशही मिळून ते योग्यच विचार करत असल्याचे सिध्द झाले.
१५ ऑगस्ट आणि चित्रपट म्हटलं की जी. पी. सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले ‘( १९७५) हा चित्रपट हमखास आठवतोच. तात्कालिक चित्रपट समीक्षकांनी प्रचंड टीका केलेला हा चित्रपट रसिकांच्या अनेक पिढ्या ओलांडूनही आपला दबदबा कायम ठेवून आहे. हिंदी चित्रपटाच्या भाषेत सांगायचे तर, मारनेवाले से बचानेवाला बडा होता है… हिंदी चित्रपटाच्या इतिहासावर ‘फोकस ‘ टाकताना ‘शोले ‘पूर्वीचा आणि नंतरचा हिंदी चित्रपट असा केला जातो, यावरुन या चित्रपटाचे महात्म्य लक्षात येते. पण तो प्रदर्शित झाला तेव्हा मात्र असा काही इतिहास रचला जाणार आहे असे कोणीही भविष्य वर्तवले नव्हते. आजही काही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय बातम्यांच्या संदर्भात ‘शोले ‘ असतोच. कोणी तरी पाण्याचा टाकीवर चढून आत्महत्या करण्याची धमकी देतो आणि ‘शोले ‘चा उल्लेख येतोच. तब्बल ४३ वर्षे या चित्रपटाचे संदर्भ उपयोगी पडतात हे विशेषच. १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटात याचे स्थान वेगळे आणि वरचे. याच्या संवादाचीही ध्वनिफित गावागावात लोकप्रिय झाली.
तशी या तारखेला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची सूची बरीच आहे. डॅनी डेन्झोपा दिग्दर्शित ‘फिर वही रात ‘(१९८०) पासून बरीच नावे आहेत. तसे पाहिले तर दर पाच वर्षांनी १५ ऑगस्टला शुक्रवार म्हणजे नवीन चित्रपट प्रदर्शित करण्याचा वार येतो. १९८१ साली अर्थात १४ ऑगस्टला शुक्रवार आला ( प्रत्येक वर्षी तारीख एक दिवस पुढे सरकते) आणि या दिवशी यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला ‘ झळकला. या चित्रपटाला शनिवारच्या १५ ऑगस्टच्या रजेचा फायदा झालाच. इतर अनेक चित्रपटाना तो मधल्या वर्षात झालाच.
याच १५ ऑगस्टलाच प्रदर्शित होत खणखणीत यश मिळवून या दिवसाचा विश्वास वाढवलेला चित्रपट म्हणजे, राज कपूर निर्मित आणि दिग्दर्शित ‘ राम तेरी गंगा मैली ‘(१९८५). हा काळ व्हिडीओच्या वाढत्या क्रेझने चित्रपटगृहाची गर्दी ओसरत असल्याने फिल्मवाल्यांची चिंता वाढवणारा होता, अशातच १५ ऑगस्टचा राष्ट्रीय सणाचा मूड या चित्रपटाला लाभला. राज कपूरने या चित्रपटात तात्कालिक भ्रष्ट सामाजिक व्यवस्था आणि आपले कथानक याचा मेळ यात घातला. त्याच्या शैलीचे हे मनोरंजन होते, पण त्याच्या दर्जाचा हा चित्रपट नव्हता, पण याचे यश खरे होते, तेच तर महत्त्वाचे असते. याची गाणी आजही सुपरहिट आहेत.
या १५ ऑगस्टला बुधवार आहे म्हणजेच शुक्रवारच्या अगोदरच ‘सत्यमेव जयते ‘ आणि ‘गोल्ड ‘ हे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत, आणि विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांची थीम अर्थात कथा कल्पना देशभक्तीशी निगडित आहे, असा योग क्वचितच येतो. आजची आजूबाजूची काहीशी गोंधळलेली सामाजिक स्थिती पाहता देशभक्तीचे चित्रपट खूपच चांगला आणि मोठा मानसिक /भावनिक /बौध्दिक आधार ठरु शकेलही. अर्थात १५ ऑगस्टला नवीन चित्रपट प्रदर्शित झाला म्हणजे हमखास यश, यात त्या चित्रपटाची गुणवत्ताही खूप महत्त्वाची असतेच. पण या निमित्ताने या परंपरेचा वेध घेण्याचा हा फिल्मी प्रयत्न होय….