मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत ‘परंपरा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र  सरकारच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे या परंपरा महोत्सवाला सहकार्य लाभले आहे. सांताक्रुझ कलिना येथील विद्यानगरी संकुलातील राज्यशास्त्र विभागातील फिरोजशहा मेहता सभागृहात सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवताळे यांच्याहस्ते होणार आहेत. त्यावेळी ज्येष्ठ गायक शंकर महादेवन, ज्येष्ठ गायिका इला अरूण, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव कुमार खैरे, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक शैलेंद्र दशोरा तसेच बुजुर्ग अभिनेत्री सुलोचना चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान विद्यापीठ व महाविद्यालये विकास मंडळाचे संचालक डॉ. राजपाल हांडे हे भूषविणार आहेत.
या महोत्सवात लोकगायन, लोकनृत्य, लोकनाटय़, असा त्रिवेणी संगम होणार असून राजस्थानचे चक्री नृत्य, गुजरातचे सिध्दी धमाल नृत्य, महाराष्ट्रातील उत्पातांचे लावणी गायन, राजस्थानचे भपंग, झेबा बानो यांचे सुफी गायन, छत्तीसगढ मधील सीमा कौशिक यांचे भरतारी गायन आदी  सादर होणार आहे. लोककलांवरील आधारित लोकनाटय़ांची आगळी पर्वणी लाभणार असून डॉ. तुलसी बेगेरे प्रस्तुत दशावतार, जांभूळ आख्यान आदी लोकनाटय़े सादर होणार आहेत. या महोत्सवाचा समारोप ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. कमलाकर सोनटक्के, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी अशोक फळणीकर, व्ही.एफ. तायडे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे यांनी दिली. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश खुला असून अधिक संर्पकासाठी रसिका चव्हाण (कलावंत समन्वयक, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ) यांच्याशी ९९२०३९३९४३ किंवा २२८७१७८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.