हिंदी सिनेसृष्टीत एखाद्या अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे वावरलेला अभिनेता म्हणजे दिलीप कुमार. या अभिनेत्याला जुनी-नवी पिढी कधीही विसरणार नाही इतका त्यांचा प्रभाव सिनेरसिकांवर आजही कायम आहे. ११ डिसेंबर म्हणजेच आजच त्यांचा ९५ वा वाढदिवस आहे. ९५ वर्षातील सुमारे ६० वर्षे त्यांनी सिनेमासाठी दिली. त्यांचे हे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अभिनयात झोकून देणं म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावरही दिलीप कुमार यांचा प्रभाव होता. किंग खान असे बिरुद मिरवणारा शाहरुख खानही त्यांच्या शैलीची नक्कल करताना दिसला आहे. दिसायला सुंदर सोज्ज्वळ असा नट म्हणजे दिलीप कुमार. त्यांचे मूळ नाव मोहम्मद युसुफ खान सिनेसृष्टीतील त्यांची ओळख ‘ट्रॅजिडी किंग’ अशी आहे.
‘ज्वार भाटा’ या सिनेमातून १९४४ मध्ये त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तो काळ सिनेमच्या कोटीच्या कोटी उड्डाणांचा नव्हता. आवड म्हणून, गरज म्हणून नट सिनेमात काम करत. अगदी पगारावरही काम करत. सिनेमात काम करणारा नट हा आपल्यापैकीच कोणीतरी आहे ‘एक्स्ट्रा ऑर्डिनरी’ किंवा ‘लार्जर दॅन लाईफ’ आहे ही त्यावेळच्या सिनेमांची गरज नव्हती. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवले आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’ अशा कितीतरी सिनेमांची नावे घेतला येतील.
‘मुगल-ए-आझम’ या सिनेमातील सलीम हा तर त्यांनी अजरामर केला. जी बाब सलीमची तिच ‘देवदास’चीही! देवदास ही बंगाली लेखक शरतचंद्र यांची कादंबरी. बालमैत्रीण पारोवर प्रेम असूनही तिच्याशी लग्न न करता आलेला आणि त्यानंतर दारूच्या नशेत आकंठ बुडालेला, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पारोचा ध्यास घेतलेला ‘देवदास’ दिलीप कुमार यांनी ज्या तन्मयतेने रंगवला त्याला खरोखरच जवाब नाही. पारोच्या प्रेमात देवदासचे विझत जाणे त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावातून दाखवले. हा सिनेमा पाहताना आपण दिलीप कुमार यांना न पाहता देवदासलाच पाहतो आहोत असेच वाटते. हा देवदास आपल्याला भावतो, त्याचे पारोसाठी झुरणे मान्य करायला लावतो ते फक्त दिलीप कुमार यांच्या सशक्त अभिनयामुळे. या सिनेमाच्या आधी सैगल यांनीही देवदासची भूमिका साकारली होती. तसेच संजय लीला भन्साळी यांनी शाहरुख खानला घेऊनही देवदास सिनेमा बनवला. पण अर्थातच दोन्ही सिनेमांची तुलना दिलीप कुमार यांनी साकारलेल्या देवदाससोबत झाली. सैगल यांचा देवदास सिनेमा काहीसा संथ होता. तर शाहरुखचा देवदास दिमाखादार सेट आणि गाण्यांमध्ये हरवून गेला होता. मनावर परिणाम करणारा ठरला तो दिलीप कुमार यांचाच देवदास! ‘होश से कह दो कभी होश ना आने पाये’ किंवा ‘कौन कंबख्त बर्दाश्त करने को पिता है’ या संवादफेकीतून दिलीप कुमार यांनी देवदासचे दुःख किती आपलेसे केले होते, अभिनयात भिनवून घेतले होते हे दाखवून दिले.
‘मुगल-ए-आझम’ हा त्यांचा सिनेमा आला आणि लोक प्रदीप कुमारांनी साकारलेला सलीम विसरुन गेले. ‘अनारकली’ नावाचा एक सिनेमा १९५३ मध्ये रिलिज झाला होता. या सिनेमात प्रदीप कुमार यांनी सलीमची भूमिका साकारली होती तर बीना राय यांनी अनारकलीची भूमिका साकारली होती. या सिनेमातील गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत. मात्र सिनेमा काहीसा विस्मरणात गेला. त्याला कारण ठरले ते म्हणजे या सिनेमानंतर सात वर्षांनी म्हणजेच १९६० मध्ये ‘मुगल-ए-आझम’ हा सिनेमा आला. या सिनेमात दिलीप कुमार (सलीम), मधुबाला (अनारकली) पृथ्वीराज कपूर (अकबर), दुर्गा खोटे(जोधाबाई) अशी तगडी स्टारकास्ट होती. के. आसिफ यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर पुढची अनेक वर्षे अधिराज्य केले. दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी साकरलेल्या भूमिका इतक्या जिवंत वाटल्या होत्या की लोक दिलीप कुमार यांनाच सलीम आणि मधुबाला यांना अनारकली समजू लागले होते असे किस्से ऐकिवात आहेत. ‘मुगल-ए-आझम’ हा त्या दशकातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. नौशाद यांनी या सिनेमाला संगीत दिले होते. या सिनेमातील ‘शीश महल’ ची चांगलीच चर्चा रंगली होती. ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे आजही सिनेरसिकांच्या तोंडी आहे. या सिनेमाचा प्रभाव इतका प्रचंड राहिला की २००४ मध्ये हा सिनेमा डिजिटली रंगवून पुन्हा रिलिज करण्यात आला. सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या या सिनेमात दिलीप कुमारांची महत्त्वाची भूमिका होती.
सिनेसृष्टीतील सेकंड इनिंगमध्येही दिलीप कुमार यांच्या सिनेमांची घोडदौड सुरुच होती. ‘क्रांती’, ‘विधाता’, ‘शक्ती’, ‘मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ असे एकाहून एक सरस सिनेमा दिलीप कुमार यांनी साकारले. त्यातील वेगळेपणा आपल्या अभिनयातून जपला. ‘मशाल’मध्ये तर त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती. या सिनेमात वहिदा रहमान यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका केली. या सिनेमात वहिदा रहमान यांचा अपघात होतो असा एक प्रसंग आहे. त्या अपघातानंतर अस्वस्थ झालेला माणूस आणि पत्नीला रूग्णालयात नेण्यासाठी त्यांचे सैरभैर होणे हे ज्या उत्कटतेने साकारले तसा अभिनय त्यानंतर कधीही कोणाला जमला नाही.
शक्ती या सिनेमात दोन अभिनय सम्राटांची जुगलबंदी होती. एक होते दिलीप कुमार आणि दुसरे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची आणि एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका दिलीप कुमार यांनी साकारली. हा सिनेमाही चांगलाच चर्चिला गेला होता. या सिनेमातील डायलॉग्ज अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. त्यानंतर आला तो सौदागर या सिनेमातही राज कुमार आणि दिलीप कुमार यांच्यातील डायलॉगबाजी त्या काळात हिट ठरली होती.
दिलीप कुमार यांना मिळालेले पुरस्कार हादेखील चर्चेचा विषय आहे. कारण त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारांची नोंद गिनिज बुकात झाली आहे. ८ फिल्मफेअर पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), एनटीआर पुरस्कार (१९९७), पाकिस्तान सरकारतर्फे निशान-ए-इम्तियाझ पुरस्कार (१९९८), जीवनगौरवर पुरस्कार फिल्मफेअर, पद्म विभूषण पुरस्कार (२०१५), सीएनएन आयबीएन जीवन गौरव पुरस्कार (२००९) अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. फिल्मफेअर पुरस्कारात १९ वेळा नामांकने मिळवणारेही ते एकमेव अभिनेते आहेत. गंगा-जमुना या त्यांच्या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. या सिनेमाची कथा, निर्मिती आणि पटकथा लेखनही दिलीप कुमार यांनीच केले होते.
अभिनय सम्राटाच्या व्यक्तीगत आयुष्यातही काही समस्या होत्या. तराना सिनेमाचे शूटींग करताना दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सात वर्षे ते एकमेकांसोबत होते. मात्र नया दौर सिनेमच्या वेळी एका कोर्ट खटल्यामुळे हे नाते संपुष्टात आले. त्यानंतर वयाने २२ वर्षांनी लहान असणाऱ्या सायरा बानो यांच्याशी १९६६ मध्ये विवाह करून दिलीप कुमार यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर त्यांनी हैदराबादच्या सॉलिसिटर आस्मा साहिबा यांच्याशीही १९८१ मध्ये लग्न केले होते. मात्र त्यांचा दुसरा विवाह फार काळ टिकला नाही. अवघ्या दोन वर्षातच हे दोघेही विभक्त झाले. त्यांची पहिली पत्नी अर्थात सायरा बानो या मात्र अजूनही त्यांची काळजी घेत आहेत.
आपल्या अभिनयाचे विद्यापीठ उभे करणाऱ्या दिलीप कुमारांचा ९५ वा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा होतो आहे. मात्र या ‘ट्रॅजिडी किंग’ कडून पुढच्या अनेक पिढ्या अभिनयाचे धडे गिरवत राहतील यात शंका नाही. दिलीप कुमार यांना चांगले आरोग्य लाभो आणि ते येणाऱ्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरो याच शुभेच्छा!
समीर चंद्रकांत जावळे
sameer.jawale@indianexpress.com